विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित

By मारोती जुंबडे | Published: December 29, 2023 07:20 PM2023-12-29T19:20:08+5:302023-12-29T19:20:36+5:30

जि.प.च्या सीईओनी काढले आदेश; मुख्याध्यापक, शाखा अभियंत्याचा समावेश

laziness in developing Sankalp Yatra campaign; Five people including Gram Sevak suspended from service | विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित

विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित

परभणी: केंद्र शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम जिल्ह्यात गत महिन्यापासून सुरू आहे. परंतु या कार्यक्रमात अनुपस्थित व कामात हलगर्जीपणा केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शाखा अभियंता व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना २९ डिसेंबर रोजी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात २६ जानेवारी २०२४ पर्यंत ‘ग्रामस्वराज्य अभियान’ राबविले जाणार आहे. या संकल्प यात्रा कालावधीत अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने ही विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. ही संकल्प यात्रा महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्व ७०४ ग्रामपंचायत क्षेत्रात जाणार आहे. त्याठिकाणी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार करत आहे. तसेच या यात्रेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध योजनेचे लाभदेखील देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यात या संकल्प यात्रेनिमित्त प्रत्येक दिवशी दोन ग्रामपंचायती यानुसार यात्रेचे दैनंदिन वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी सुरू आहे. संकल्प यात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती असलेल्या ६ एलईडी व्हॅन जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानुसार प्रसार आणि प्रचार सुरू आहे. परंतु, मागील काही दिवसापासून ही विकसित यात्रा जिल्ह्यात वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कधी गोंधळ तर कधी धक्काबुकी असे प्रकार घडत आहेत. त्यातच आता सेलू तालुक्यातील गव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेत अंगणवाडी पर्यवेक्षिकासह मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शाखा अभियंता व आरोग्य सेवक हे अनुपस्थित व कामात हलगर्जीपणा केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी २९ डिसेंबर रोजी एका आदेशान्वये या पाच जणांना निलंबित केले आहे.

आदेशात या पाच जणांचा समावेश
सेलू तालुक्यातील गव्हा येथे आयोजित विकास विकसित संकल्प यात्रा मोहीम कार्यक्रमात अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती राजुरकर, आरोग्य सेवक वैजनाथ गलांडे,शाखा अभियंता रामनाथ माने हे अनुपस्थित राहिल्याने व ग्रामसेवक माधव जाकापूरे,मुख्याध्यापक पी.जी. लंगोटे हे उपस्थित राहून कामात हलगर्जी केल्याने सिईओंनी शुक्रवारी त्यांना निलंबित केले.

Web Title: laziness in developing Sankalp Yatra campaign; Five people including Gram Sevak suspended from service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.