परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:20 PM2018-06-26T16:20:53+5:302018-06-26T16:21:31+5:30

रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

Farmers' fasting for Crop Insurance in Parabhani | परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

Next

परभणी : रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातील शेतकरी परभणीत दाखल झाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालयाच्या सांख्यिकी विभागाने पीक विम्याचा घटक मंडळ ऐवज तालुका गृहित धरल्याने जिल्ह्याचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या अविश्वासामुळे क्षेत्रसुधार गुणांक  लावल्याने ५४ कोटी २४ लाख ४२ हजार ३०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. 

पीक कापणी प्रयोगात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने हलगर्जीपणा केला. तर रिलायन्स पीक विमा कंपनीने बेकायदेशीररित्या हस्तक्षेप करुन कृषी विभागाने दिलेले आकडे न मानता मनमानी पद्धतीने निर्धारित उत्पन्नाच्या आकड्यांचा आधार घेऊन ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांचे नुकसान केले. 

या सर्व प्रकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०५ कोटी ८० लाख ३ हजार ५६८ रुपयांची फसवणूक शासनाने केली आहे. त्यापैकी १४ महसूल मंडळातील ९० हजार शेतकऱ्यांची ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांची फसवणूक विमा कंपनीकडून झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. 
या प्रकरणात आंदोलनकर्त्यांकडून पुरावेही सादर करण्यात आले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या नुकसानी प्रकरणी जिल्हा प्रशासन रिलायन्स कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या आंदोलकांमार्फत करण्यात आली. जि.प.सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर, उद्धवराव काळे यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

Web Title: Farmers' fasting for Crop Insurance in Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.