चांडक यांची लाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार; मानवतमध्ये कुरघोडीच्या राजकारणाचा नवा अध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 06:13 PM2018-04-25T18:13:43+5:302018-04-25T18:13:43+5:30

कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना  कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला. 

Complaint against lad by chandak; New Chapter of politics in Manavat | चांडक यांची लाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार; मानवतमध्ये कुरघोडीच्या राजकारणाचा नवा अध्याय

चांडक यांची लाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार; मानवतमध्ये कुरघोडीच्या राजकारणाचा नवा अध्याय

Next

मानवत (परभणी ) :  कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना  कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच पालिका निवडणूकीनंतर तब्बल दिड वर्षानंतर डॉ. अंकुश लाड आणि कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्यातील राजकीय वाद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. 

पालिका निवडणुकीच्या तोंडावर  डॉ. अंकुश लाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणुकीत १० नगरसेवकासह नगराध्यक्ष निवडून आणले. याचवेळी कॉंग्रेसचे बालकिशन चांडक यांनी प्रचारात डॉ. लाड यांनाच टार्गेट केल्याने ही पालिका निवडणूक चांगलीच गाजली होती. यावेळी पालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गाला राखीव होते. निवडणुकीत शिवसेनेकडून शिवकन्या स्वामी या विजयी झाल्या.मात्र,  चांडक यांच्या गटाच्या माजी नगरसेवकाने स्वामी यांच्या जात प्रमाण पत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी चांडक हेच याचिका करणाऱ्या माजी नगरसेवकाला रसद पुरवत असल्याचा आरोप लाड गटाकडून सतत केला जात होता.

याच प्रकरणातून झाला वाद 
या वादातुनच डॉ.लाड यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता चांडक यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही याचिकाकर्त्याला मदत करत आहात असे म्हणत शिवीगाळ करून धमकावले. यानंतर रात्री उशिरा चांडक यांनी डॉ. लाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाने चांडक - लाड हा राजकीय कुरघोडीचा संघर्ष उघड सुरु झाल्याची चर्चा शहरात आहे. 

माजी नगरसेवकाचाही तक्रार 
डॉ. लाड यांनी आपणास शिवीगाळ केल्याची तक्रार माजी नगरसेवक विजयकुमार दलाल यांनी पोलीस निरिक्षक प्रदीप पालिवाल यांना एका अर्जाद्वारे केली आहे. 

विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही 
कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी प्रतिनिधी तथा माजी जिल्हा अध्यक्ष बालकिशन चांडक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे, धमकावुन व शिवीगाळ करुन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही असे म्हटले आहे. यासोबतच पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांनी लक्ष घालुन शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Complaint against lad by chandak; New Chapter of politics in Manavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.