परभणीत बर्ड फ्लू; मुरुंबा येथील पोल्ट्रीफार्ममधील २७ जणांचे घेतले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:42 PM2021-01-11T19:42:02+5:302021-01-11T19:43:26+5:30

Bird Flu : मुरुंबा येथे बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.

Bird flu in Parbhani; Swabs taken from 27 people at a poultry farm in Murumba | परभणीत बर्ड फ्लू; मुरुंबा येथील पोल्ट्रीफार्ममधील २७ जणांचे घेतले स्वॅब

परभणीत बर्ड फ्लू; मुरुंबा येथील पोल्ट्रीफार्ममधील २७ जणांचे घेतले स्वॅब

Next
ठळक मुद्देदोघांचे रक्तजल नमुने घेतलेघाबरु नका, काळजी घ्या

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने सोमवारी गावात दाखल होऊन पोल्ट्रीफॉर्म चालक व मालक अशा २७ जणांचे स्वॅब नमुने घेतले असून, ते पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

मुरुंबा येथे बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे गावात जलद सर्वेक्षण करण्यात आले. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे एक पथक गावात ठाण मांडून असून, दररोज दहा दिवस नागरिकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्याचप्रमाणे तापीच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले असून, या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गावात बॅरिकेटस्‌ लावून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांचा एक व्हॉटस्‌ॲप ग्रुप तयार करण्यात आला असून, संशयित रुग्णांना लक्षणे दिसल्यास तत्काळ माहिती कळविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गावात थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटरच्या साह्याने तपासणी करुन सारी, आयएलआयचे रुग्ण शोधण्याचे काम केले जाणार आहे.

दोघांचे रक्तजल नमुने घेतले
गावातील दोन रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते हिवताप व डेंग्यूच्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जिल्हा हिवताप कार्यालयाने गावात सवर्क्षेण केले आहे. या पथकाने ९ जानेवारी रोजी ५२ घरांना भेट देऊन पाहणी केली. त्यात ३ दूषित भांडी आढळली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानेही ९ व १० जानेवारी रोजी गावात कंटेनर सर्व्हे केला आहे. त्यात ५१८ भांड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ७ दूषित भांडे आढळले. गावात ३.१९ आणि १० जानेवारी रोजी १.३३ हाऊस इंडेक्स आढळल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

घाबरु नका, काळजी घ्या
बर्ड फ्लू हा आजार पक्ष्यांमधून मानवाला होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. आरोग्य विभाग, हिवताप विभाग आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी- कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राहणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळली तर आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Bird flu in Parbhani; Swabs taken from 27 people at a poultry farm in Murumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.