युती-आघाडीत जागा बदलावरून पेच, अंतर्गत मतभेदातून दोन्हीकडे बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:19 AM2019-07-18T04:19:46+5:302019-07-18T04:19:54+5:30

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील काही जागांची आदलाबदल करण्यावरुन शिवसेना- भाजप युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत पेच निर्माण झाला

Alliance-backed scarcity of seats, the possibility of rebellion in both the internal differences | युती-आघाडीत जागा बदलावरून पेच, अंतर्गत मतभेदातून दोन्हीकडे बंडखोरीची शक्यता

युती-आघाडीत जागा बदलावरून पेच, अंतर्गत मतभेदातून दोन्हीकडे बंडखोरीची शक्यता

Next

- अभिमन्यू कांबळे
परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील काही जागांची आदलाबदल करण्यावरुन शिवसेना- भाजप युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत पेच निर्माण झाला असून, या प्रकरणात वरिष्ठांमार्फत जरी हस्तक्षेप झाला तरी बंडखोरी अटळ आहे. लोकसभा निवडणुकीत १९९१ पासून ८ पैकी ७ वेळा शिवसेनेने विजय मिळविला असला तरी विधानसभेला बदल झाल्याचे पहावयास मिळाले आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत १ लाख २७ हजार मतांनी शिवसेनेने विजय मिळविल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ६ पैकी केवळ एका जागेवर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविता आला होता.

तर दोन जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. या दोन्ही जागा कायम ठेवण्यासाठी राष्टÑवादीला कसरत करावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीतील कामावरुन जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. गंगाखेडचे आ. डॉ. मधुसूदन केंद्रे आणि लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांचे समर्थक थेट मुंबईतील बैठकीतच भिडल्याने पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. विधानसभेला पक्षाची उमेदवारी या आशेवर गंगाखेडचे माजी आ. सीताराम घनदाट यांनी लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार विटेकर यांचे काम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान आ. डॉ. केंद्रे यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. यातून निर्माण झालेले मतभेद अद्यापही कायम आहेत.
गंगाखेड मतदारसंघ युतीत रासपकडे आहे. या पक्षाचे उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे हे कर्ज फसवणूक प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. ही संधी साधून भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. दुसरीकडे शिवसेनाही या जागेवर लढण्याची तयारी करीत आहे. वंचित आघाडीचीही येथून तयारी सुरु आहे. याशिवाय पाथरी विधानसभा मतदारसंघातही युती आणि आघाडीत बेबनाव आहे. आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला होती; परंतु, आता राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांच्याशी ही जागा मागितली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची अडचण झाली आहे. युतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे; परंतु, येथून अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. मोहन फड हे शिवसेनामार्गे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुुळे ही जागा शिवसेनेकडून सोडून भाजपकडे घ्यावी, यासाठी ते आपली ताकद पणाला लावत आहेत. दुसरीकडे आ. फड यांनी लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे खा. बंडू जाधव हे ही जागा भाजपला सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हा पेच मुंबईहूनच सुटू शकतो.
जिंतूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीचे आ. विजय भांबळे हे करीत आहेत. यावेळीही त्यांच्यासमोर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे आव्हान असेल. २०१४ च्या निवडणुकीत बोर्डीकर हे काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपमध्ये आले आहेत. युतीच्या जागा वाटपानुसार जिंतूरची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडायला शिवसेना नेते तयार नाहीत. सेनेचे जि.प.तील गटनेते राम खराबे यांनी गेल्यावेळी येथून निवडणूक लढविली होती. यामुळे युतीत या जागेवरुनही टिष्ट्वस्ट कायम आहे. या मतदारसंघात काँग्रेसची फारसी ताकद नाही. वंचित बहुजन आघाडीकडून मात्र येथे अनेक जण इच्छूक आहेत. परभणी मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी एमआयएमचे उमेदवार सय्यद खालेद सय्यद साहेबजान यांचा पराभव केला होता; परंतु, भाजपचे उमेदवार आनंद भरोसे यांनी तिसऱ्या क्रमांकाची लक्षणीय मते मिळविली होती. आता पुन्हा एकदा भरोसे यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यावरुन शिवसेना-भाजपमध्ये गेल्या महिन्यात आरोप-प्रत्यारोप झाले. विशेष म्हणजे येथे आ़ डॉ़ पाटील व खा़ जाधव यांच्यात टोकाचे मतभेद आहेत़ दुसरीकडे आघाडीतील जागा वाटपावरुन परभणीची जागा काँग्रेसकडे आहे; परंतु, राष्ट्रवादीने या जागेची मागणी वरिष्ठांकडे लावून धरली आहे. शिवाय परभणी मनपात काँग्रेस सत्ताधारी आहे तर राष्ट्रवादी सभापतीपद मिळवत विरोधी पक्षात आहे. त्यामुळे आघाडीतील बेबनाव कायम आहे. परिणामी परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीत मतभेद असल्याने विधानसभा निवडणुकी दरम्यान बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यातीलच काही जण वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत.
>सर्वाधिक मताधिक्याने विजय
जिंतूर : विजय भांबळे (राष्ट्रवादी): २७,३५८
सर्वात कमी मताने विजय
गंगाखेड : डॉ. मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी) २,२८९

Web Title: Alliance-backed scarcity of seats, the possibility of rebellion in both the internal differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.