परभणी जिल्ह्यात ४१ रास्तभाव दुकानांचे परवाने दिले जाणार नव्याने  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 04:40 PM2017-12-06T16:40:37+5:302017-12-06T16:43:04+5:30

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत किरकोळ केरोसीन आणि रास्तभाव दुकानांचे ४१ परवाने नव्याने दिले जाणार असून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नवीन परवाना धारकांची निवड करण्यात येईल.

41 ration shops will be issued licenses in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ४१ रास्तभाव दुकानांचे परवाने दिले जाणार नव्याने  

परभणी जिल्ह्यात ४१ रास्तभाव दुकानांचे परवाने दिले जाणार नव्याने  

googlenewsNext
ठळक मुद्देपरभणी जिल्ह्यामध्ये १ हजार ४९१ किरकोळ केरोसीन परवानाधारक आणि १ हजार १८७ रास्तभाव परवानाधारक आहेत़ मागील वर्षभरात जिल्ह्यातील ४१ परवाने रिक्त होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने १४ आॅगस्ट २०१७ रोजी जिल्ह्यातील पात्र संस्थांकडून अर्ज मागविले

परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत किरकोळ केरोसीन आणि रास्तभाव दुकानांचे ४१ परवाने नव्याने दिले जाणार असून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नवीन परवाना धारकांची निवड करण्यात येईल.

परभणी जिल्ह्यामध्ये १ हजार ४९१ किरकोळ केरोसीन परवानाधारक आणि १ हजार १८७ रास्तभाव परवानाधारक आहेत़ या परवानाधारकांमार्फत रास्तभाव दराने अन्नधान्य आणि केरोसीनचे वितरण केले जाते़ सार्वजनिक वितरण प्रणालीत काम करीत असताना त्यात अनियमितता आल्याने जिल्हा पुरवठा अधिका-यांमार्फत परवानाधारकांवर कारवाई करण्यात येते.  

अनेक वेळा सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा गैरव्यवहार झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत़ अशा प्रकरणात चौकशी समितीकडून परवानाधारकांची चौकशी केली जाते़ चौकशीत दोषी आढळल्यानंतर परवानाधारकास निलंबित करणे, परवाना रद्द करणे अशी कारवाई केली जाते़ या कारवाईमध्ये परवाना निलंबित झाला असेल तर सदर परवानाधारकास कालांतराने परवान्याचे नूतनीकरण करून काम करण्याची संधी मिळते़ मात्र परवाना रद्द झाला असेल तर त्या जागी नवीन परवानाधारकाची निवड करण्याची तरतूद आहे़

शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात रद्द झालेल्या आणि राजीनामे दिलेल्या परवानाधारकांच्या जागी नवीन परवाने देण्याचे सूचित केले होते़ मागील वर्षभरात जिल्ह्यातील ४१ परवाने रिक्त होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने १४ आॅगस्ट २०१७ रोजी जिल्ह्यातील पात्र संस्थांकडून अर्ज मागविले होते़ हे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले असून, ७ डिसेंबर रोजी नवीन परवानाधारकांची निवड केली जाणार आहे़ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कक्षात अर्जदारांनी मोठी गर्दी केली होती़ या सर्वांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत़ आता गुरुवारी सकाळच्या सत्रात केरोसीन आणि दुपारच्या सत्रात रेशन परवान्यासाठी मुलाखती होणार आहेत़ 

जिल्हा निवड समिती घेणार निर्णय
नव्याने रास्तभाव दुकानांचे परवाने आणि किरकोळ परवाने देण्यासाठी जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली आहे़ जिल्हा पुरवठा अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून, त्यात   महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी, प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महापालिकेतील प्रभाग अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे सदस्य राहणार असल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली.

लाभार्थ्यांची गैरसोय होणार दूर
परभणी जिल्ह्यातील ४१ परवाने कार्यरत नसल्याने या लाभार्थ्यांची गैरसोय होत होती़ प्रशासनाने लाभार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली असली तरी त्या तुलनेत अन्नधान्य उपलब्ध होत नव्हते़ या ठिकाणी आता नव्याने परवाने दिले जाणार आहेत़ तसेच या परवानाधारकांनाही आॅनलाईन वितरण बंधनकारक असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे़ 

केरोसीन परवान्यासाठी ४७ अर्ज
किरकोळ केरोसीनचे जिल्ह्यातील २८ परवाने रद्द व रिक्त असल्याने या परवान्यांसाठी अर्ज मागविले होते़ त्यानुसार प्रशासनाला ४७ अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यात परभणी तालुक्यात ५, पालम ३, मानवत ३, सोनपेठ ८, पाथरी ४, जिंतूर १८, गंगाखेड ५ आणि सेलू तालुक्यातून १ अर्ज दाखल झाला आहे़ रास्तभाव दुकानांच्या परवान्यांसाठी देखील अर्ज मागविण्यात आले़ १३ नवीन परवाने दिले जाणार असून, यासाठी ६३ अर्ज प्राप्त झाले आहेत़ परभणी तालुक्यातून ३२, पालम ४, पाथरी ८, गंगाखेड १६ आणि मानवत तालुक्यातून ३ अर्ज प्राप्त झाले आहेत. नव्याने अर्ज दाखल करताना शासनाच्या निर्देशानुसार बचत गट, सहकारी संस्थांना प्राधान्य दिले जाणार असून, या अर्जदारांकडूनच अर्ज मागविण्यात आले आहेत़ 

Web Title: 41 ration shops will be issued licenses in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.