परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 03:03 PM2017-11-20T15:03:11+5:302017-11-20T15:08:04+5:30

खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे.

40 percent cotton inhibited in parabhani district | परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित

परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित

googlenewsNext
ठळक मुद्दे १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडपहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंदरी बोंडअळीने (गुलाबी बोंडअळी) घेरल्याचे दिसत आहे. ४० टक्के पिकावर प्रादुर्भाव असल्याची चर्चाही कृषी विभागातील तज्ज्ञांकडून ऐकावयास मिळाली.

परभणी : खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. कृषी विभागाने आता प्रादुर्भावाचे सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षणाअंतीच या संकटाचे गांभीर्य समोर येणार आहे. दरम्यान, तक्रारी वाढू लागल्यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कुठे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीेचे नियोजन झाले होते. त्यापैकी २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित होते. प्रत्यक्षात १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. बहुतांश भागात कापसाची पहिली वेचणी झाली असून, सर्वसाधारणपणे चार वेचण्या होतात. मात्र पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंदरी बोंडअळीने (गुलाबी बोंडअळी) घेरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्व भागामध्ये बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. एकही क्षेत्र प्रादूर्भावापासून बचावले नाही. त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. कृषी विभागाबरोबरच प्रशासनालाही या संकटाची चाहूल लागल्यानंतर आता उपाययोजनेची कामे सुरु झाली आहेत. 

बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील अनेक भागांमधून कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रादूर्भाव किती, या विषयीची पाहणी कृषी विभाग सुरू केली आहे. कृषी विभाग आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहाय्याने सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टरवरील कापसापैकी ४० टक्के पिकावर प्रादुर्भाव असल्याची चर्चाही कृषी विभागातील तज्ज्ञांकडून ऐकावयास मिळाली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आयसीआरचे अधिकारी परभणीत आले होते. या अधिका-यांनी प्रायोगिक तत्वावर परभणी तालुक्यातील झरी आणि टाकळी कुंभकर्ण परिसरात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्लॉटची पाहणी केली, तेव्हा १० बोंडापैकी ६ बोंडावर अळीचा प्रादूर्भाव आढळून आला, अशी माहिती मिळाली आहे. यास कृषी विभागातून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी एकंदर ४० ते ५० टक्के प्रादूर्भाव झाल्याचा अंदाज आहे. 

कृषी विभागातील अधिका-यांनी जिल्ह्यात गावनिहाय सर्व्हेक्षणाला सुरुवात केली आहे. हे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर बोंडअळीच्या प्रादूर्भावाचा प्रत्यक्ष आवाका समोर येणार आहे. सध्या तरी बोंडअळीमुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, बोंडअळीच्या प्रादूर्भावासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे कृषी विभाग या संदर्भात काय उपाययोजना करीत आहे, या विषयीची माहिती मिळू शकली नाही.

कृषी विभागाचे आवाहन
जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळल्यानंतर आता कृषी विभागाने आवाहने करण्यास सुरुवात केली आहे. या प्रादूर्भावाच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन १० इसी १० मि.मी. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रादूर्भाव वाढण्याची कारणे
शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बोंडअळीची प्रतिकार क्षमता वाढणे हे एक कारण आहे. मागील दोन वर्षात योग्य काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्येकवर्षी हळूहळू बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढत गेला आणि आता तो अधिक झाल्याचे कृषी  शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात फरदड घेऊ नये, किमान २-३ वर्षे नॉन बिटी कापूस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु, नॉन बिटीचे प्रमाण कमी राहिले. परिणामी प्रादूर्भाव वाढतच गेला. सध्या जिल्ह्यातील शेतकरी या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत आहेत. ऐनवेळी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन काढणीच्या वेळी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या अळीचे नियंत्रण करतानाही शेतक-यांसमोर अडचणी येत आहेत. एकंदर या बोंडअळीमुळे शेतक-यांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे.

नॉन बिटी बियाणांची लागवड करावी
पुढील वर्षी शेतक-यांनी शक्यतो फरदड टाळावी, नॉन बिटी बियाणांची लागवड करावी. ज्या भागात प्रादूर्भाव आढळला आहे. तेथे कामगंध सापळे लावावेत. 
- डॉ.पी.आर. झंवर, कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख 

२० टक्के हा प्रादूर्भाव आहे
जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला आहे. प्राथमिक अंदाजानुसार २० टक्के हा प्रादूर्भाव आहे. आम्ही बोंडअळीच्या प्रादूर्भावाचे सर्व्हेक्षण करीत आहोत. हे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतरच नेमका प्रादूर्भाव किती, ते सांगता येईल.
- आर.टी. सुखदेव, उपविभागीय कृषी अधिकारी

Web Title: 40 percent cotton inhibited in parabhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.