पंढरपूर : राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र १५ डिसेंबरपर्यंत महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत़ तब्बल ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.
कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी सोमवारी ते पंढरपुरात आले. पाटील म्हणाले, रोजगार हमी योजनेंतर्गत नागरिकांना काम मिळावे म्हणून रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. मात्र ही रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याची कबुली त्यांनी दिली.
१५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नाही. याआधी बांधकाम विभागाकडे पाच हजार किलोमीटर महामार्गाचे रस्ते होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे त्यात वाढ होऊन सध्या २२ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यासाठी १ लाख ६ हजार कोंटींचा निधी मंजूर केला आहे. जमीन भूसंपादनाअभावी कामे पूर्ण होण्यास वेळ लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
अवैध वाळू उपश्याबाबत मौन
अवैध वाळू उपश्यामुळे चंद्रभागा वाळवटांत पडलेल्या खड्ड्यात पडून गवळी समाजातील चार बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. वाळू उपश्यामुळे मृत्यू झाला नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी पाठविला आहे. त्यावर हा विषय मला माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. गवळी समाजाचे निवेदन घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ करीत नंतर त्यांनी ते घेतले.

मंदिर समितीचा सहअध्यक्ष वारकरीच
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सहअध्यक्षपद हे वारकरी संप्रदायाकडेच असेल, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, समितीवर आणखी तीन सदस्य वारकरी संप्रदायातील असतील़.

तीन लाख भाविक
कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून तीन लाख भाविक पंढरपुरात आले आहेत. दर्शनासाठी भाविकांना १८ ते १९ तास लागत आहेत. मंदिर समितीतर्फे ८९ सीसीटीव्ही कॅमेºयातून संपूर्ण वारीवर नजर ठेवून आहेत.