मी स्पर्धा परीक्षा देऊ का?

By admin | Published: May 28, 2015 03:16 PM2015-05-28T15:16:50+5:302015-05-28T15:16:50+5:30

काहीच जमत नाही ना, मग चला स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत परीक्षा द्याव्यात का? अटेम्प्टवर अटॅम्प्ट करत रहायचे की थांबायचे हे कसं ठरवायचं? आलेली नोकरी लाथाडून बडय़ा पदाची वाट पाहायची का? या स्पर्धा परीक्षांचं नक्की करायचं काय?

Will I give competition exams? | मी स्पर्धा परीक्षा देऊ का?

मी स्पर्धा परीक्षा देऊ का?

Next
>स्पर्धा परीक्षा देऊ का? कुठवर अॅटॅम्प्ट करतच राहू?
 
आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते. आणि प्रयत्न टोकदार असतील तर यशही मिळतंच!
स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होतं. अनेकांना वाटतं आपल्याला अमुक क्षेत्रत करिअरला संधी नाही, आपल्याला तमुक जमणार नाही तर मग स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे. त्यांना हरकत नसेल पण माझी मोठी हरकत आहे. आपल्याला काहीच येत नाही, काहीच जमत नाही, निदान स्पर्धा परीक्षा तरी देऊच असं म्हणत, या परीक्षांकडे वळू नका. कारण तसं केलं तर पुढे यशाची वाट सापडणं अशक्यच!
आपण स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, याचं उत्तर आधी स्वत:कडे तयार ठेवा!
 
मला कशातच रस नाही, काहीच जमत नाही, आता नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देऊन पहाव्यात असं वाटतं? देता येतील का? या स्पर्धा परीक्षेला कुणीही बसलं तर चालतं का?  
आपल्याला काहीच जमत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षांकडे मुळीच वळू नये. स्पर्धा परीक्षाच काय खरं तर एकूणच  जीवनातही असा नकारात्मक दृष्टिकोन असता कामा नये. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्या परीक्षा त्यातलं करिअर हाच आपला फस्र्ट चॉइस असला पाहिजे. बाकी काही नाही म्हणून या परीक्षा देऊ असं म्हणणा:यांनी या न देणंच योग्य असं माझं मत आहे. 
हे खरंय की, स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी विशिष्ट शाखेच्या डिग्रीची आणि विशिष्ट टक्क्यांची गरज नसते. कुठल्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे बाकी काही अटी नसल्या तरी पण सकारात्मक दृष्टिकोनाची खूप गरज असते. खोलात जाऊन, नियमित आणि शिस्तशीर अभ्यास, न थकता सराव करण्याची तयारी आणि प्रत्येक अनुभवातून स्वत:मध्ये सुधारणा करण्याची तयारी आणि इच्छा असलेल्यांनी स्पर्धा परीक्षा अवश्य द्याव्यात. त्याचबरोबर अभ्यास करण्याचा आणि योग्य परिणामांसाठी प्रयत्न करत वाट बघण्याचा संयमही त्यांच्याकडे असणं फार गरजेचं.
अनेकजण म्हणतात की, स्पर्धा परीक्षेत कसं यश मिळेल हे काही सांगता येत नाही. कधी तुक्का लागेल याची खात्री नाही. सगळंच अनिश्चित असतं. हे मत चुकीचं आहे असं नाही. पण स्पर्धा परीक्षांचं असंच असतं. तुम्ही ठरवलेलं ध्येय कधी गाठाल आणि गाठाल की नाही याची या क्षेत्रत अजिबात शाश्वती नाही. 
मात्र स्पर्धा परीक्षा देतानाच जर तुमचं ध्येय निश्चित आणि पक्कं असेल, योग्य दिशेनं मेहनत केली असेल तर या क्षेत्रतल्या अनिश्चिततेचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे आपलं लक्ष्य एकदा नक्की करा आणि मगच या वाटेनं चालायचं ठरवा!
 
किती अॅटॅम्प्ट करायचे? ठरवायचं कसं की आता थांबायला हवं? वय वाढतं पण नोकरी नाही अशी अवस्था अशावेळी काय करायचं?
कितीदा प्रयत्न करायचे? किती वेळा परीक्षा द्यायच्या? - असाही प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं आपापलं ठरवावं. कारण हे उत्तरच अत्यंत व्यक्तिगत आहे, प्रत्येकासाठी वेगळंही आहे. एक नक्की, लवकर धीरही सोडू नये. वय हाताशी आहे, जोमानं सराव करण्याची चिकाटी आहे, पहिल्या अपयशी अनुभवातून स्वत:चं काय चुकतंय हे लक्षात घेऊन स्वत:मध्ये सुधारणा करण्याची तयारी शाबूत असेल तर ‘नेव्हर गिव्ह अप’  म्हणत दोन-तीन काय पाच-सहा प्रयत्नांनंतरही प्रयत्न चालू ठेवावेत. आपण कधी थांबायचं आणि कुठवर रेटायचं याचा निर्णय आपला. स्वत:कडून अतीच अपेक्षा ठेवत जास्त ताणू नये आणि उतावीळ होऊन प्रय}च न करता लवकर धीरही सोडू नये, हे तारतम्य ज्याचं त्यानं बाळगावं. पण सतत अपयश येतंय म्हणून स्पर्धा परीक्षांचा नाद सोडून द्यावा असं मात्र नाही.  ‘थांबला तो संपला’ ही म्हण स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. 
 
र्
स्पर्धा परीक्षा देत असताना एखादी परीक्षा पास होऊन एखादी नोकरी मिळाली तर ती घ्यावी, की बडय़ा पदासाठी प्रय} म्हणून नोकरी न करता पुढच्या परीक्षेची तयारी करावी?
 
स्पर्धा परीक्षा देत असताना जर करिअरची दुसरी एखादी संधी सापडली तर तीही सोडू नये.  उगाच स्पर्धा परीक्षा देऊ की मिळालेल्या उत्तम संधीच्या मागे जाऊ अशा कात्रीत स्वत:ची कोंडी न करता दुसरा मार्ग स्वीकारला तरी चालतो. एखाद्या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि गरज असेल तर ते पद स्वीकारून पुढच्या पदासाठीच्या परीक्षेची तयारी करण्यातही काही कमीपणा नाही. शेवटी स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत असंही घडतं की, परीक्षा पास होतो, नोकरीची संधी चालून येते पण दुसरी परीक्षा व त्यातून मिळू शकणारी संधीही खुणावत असते. अशा वेळेस डोळे मिटून आपल्या ध्येयाकडे लक्ष एकाग्र करावं. जे ध्येय मनात ठरवलंय ते प्राप्त केलंय का, हे तपासावं. तसं नसेल तर मग पुढच्या परीक्षा द्याव्यात. पण अनेकांच्या बाबतीत असंही होतं की, घरातली आर्थिक परिस्थिती एकदम बेताची असते. लहान भावंडांची शिक्षणं, लग्न हे सर्व बाकी असतं. मिळालेली नोकरी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळेस सरळ ती नोकरी स्वीकारावी आणि ती करता करता पुढच्या परीक्षांच्या तयारीला लागावं. 
जे कोणी मनापासून या स्पर्धा परीक्षांकडे वळतात ना ते परिस्थितीपुढे सहजासहजी नमत नाहीत. स्पर्धा परीक्षांमुळे संघर्ष करण्याची चिकाटी तयार होते आणि हीच चिकाटी ठरवलेलं ध्येयही गाठून देते. 
फक्त कधी हे निश्चित सांगता येत नाही. 
प्रयत्न मात्र चालू ठेवावेच लागतात!
 
- अविनाश धर्माधिकारी
 

Web Title: Will I give competition exams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.