कुठं घाटनांदूर, कुठं मुंबई-औरंगाबाद

By admin | Published: April 19, 2017 03:28 PM2017-04-19T15:28:42+5:302017-04-19T15:42:40+5:30

घाटनांदूर गावात वडिलांचं चहाचं दुकान.परिस्थिती जेमतेम.पण त्यांनी साथ दिली आणिआयटीआय, डिप्लोमा करतऔरंगाबाद-गोवा-मुंबईकरून आता मीऔरंगाबादला स्थिरावलोय..

Where is Ghantandoor, Where is Mumbai-Aurangabad | कुठं घाटनांदूर, कुठं मुंबई-औरंगाबाद

कुठं घाटनांदूर, कुठं मुंबई-औरंगाबाद

Next

- संतोष दत्तात्रय अरसुडे

घाटनांदूर गावात वडिलांचं चहाचं दुकान.
परिस्थिती जेमतेम.
पण त्यांनी साथ दिली आणि
आयटीआय, डिप्लोमा करत
औरंगाबाद-गोवा-मुंबई
करून आता मी
औरंगाबादला स्थिरावलोय..
काही स्वप्नं पूर्ण झाली,
काही आता नव्यानं पाहतोय..


मी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर गावचा. तीन मोठ्या बहिणी. मी आणि एक लहान भाऊ असे आम्ही पाच भावंडं. वडिलांचं चहाचं हॉटेल.
शाळेच्या वेळेनंतर मी गिऱ्हाईकांना चहा पोचवण्याचं काम करायचो. एका हातात
काचेचे ग्लास ठेवलेली जाळी आणि दुसऱ्या हातात अ‍ॅल्युमिनिअमची चहाची किटली असा
काहीसा अवतार. अभ्यासात जास्त रस नसल्याने दहावीत जेमतेम ४८ टक्के मिळाले. अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला. कॉलेजचं वातावरण उत्साही होतं. प्रत्येकाची
वेगवेगळी स्वप्नं होती. इतर मुलांची धडपड बघून मी अस्वस्थ व्हायचो. विचार करू
लागलो, चालू परिस्थितीत बदल घडवायचा कसा? अभ्यासाला लागलो. परीक्षा दिली. बारावीचा निकाल लागला. ७२ टक्के मिळाले. आता लवकर नोकरी मिळेल, कुटुंबाला हातभार लागेल या हेतूने डी.एड. करायची इच्छा होती. पण तसं झालं नाही. काही मार्कांनी अ‍ॅडमिशन गेली.
वडिलांनी तिन्ही बहिणींची लग्नं स्वत:च्या हिमतीवर केली. मी तिथंच. बारावीनंतर पुढं काय? मी ट्रॅक बदलायचं ठरवलं. तालुक्याच्या आयटीआयला प्रवेश घेतला. 
घर सोडून राहायची पहिलीच वेळ.
तिथे गावातल्याच मित्राची एक खोली रिकामी होती. तिथे राहायची सोय झाली. पहिला दिवस चांगला गेला. पण दुसऱ्या दिवशी घरच्या सर्वांचीच खूप आठवण येत होती. 
कसाबसा तो दिवस काढला. दुसऱ्या दिवशी कॉलेजनंतर सरळ गावची बस धरली. एक दिवस गावी राहून परत आलो. अभ्यासात लक्ष केंद्रित केलं. आयटीआयमधला एक मित्र सोबत रहायला आला. त्याला स्वयंपाकातलं सगळं जमायचं. त्याच्याकडून थोडं मीही शिकलो.
आयटीआयची दोन वर्षे संपली. चांगल्या मार्कांनी पास झालो होतो. अ‍ॅप्रेंटीससाठी औरंगाबादच्या एका मोठ्या कंपनीत निवड झाली. पहिल्यांदा गावापासून एवढ्या दूर राहायला जायचं होतं. 
पण मोठा चुलतभाऊ तिथेच राहायचा. तो तिथे एम.कॉम. आणि सोबत पार्टटाइम जॉब करायचा. 
काही दिवस त्याच्याकडे राहिलो. पण कंपनी तिथून बरीच लांब असल्यानं कंपनीच्या जवळ राहायला गेलो. तिथूनही कंपनी सात किमी दूर होती. इतर कामगारांसारखं मीही सायकलने जाऊ लागलो. घरी पैसे मागायचे नाहीत असं ठरवलं होतं. 
स्टायपेंड म्हणून दरमहा पंधराशे रुपये मिळायचे. त्यातच सर्व खर्च भागवायचा. कधी पैसै कमी पडलेच तर मित्रांकडून घ्यायचो. कंपनीत बऱ्याच टेक्निकल गोष्टी शिकायला मिळाल्या. सोबत हेही शिकलो की मोठं होण्यासाठी आणखी शिक्षण घेणं गरजेचं आहे.
‘लोकमत’मध्ये नांदेडच्या एका पॉलिटेक्निक कॉलेजची जाहिरात वाचली. दुसऱ्याच दिवशी अ‍ॅडमिशनच्या चौकशीसाठी नांदेड गाठलं. निघताना चुलतभावाने हजार रुपये माझ्या खिशात घातले होते.
कॉलेजला पोचलो. चौकशी केल्यावर समजलं की आयटीआय केल्यामुळे डायरेक्ट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळेल. पण फी जास्त होती. वडिलांकडे पैसे नसणार याची जाणीव होती.
पण तरीही त्यांना ही गोष्ट कळवली. त्यांनी गावाकडं ये, मी बघतो असं सांगितलं. 
मी गावी पोचलो. वडिलांनी नातेवाइकांकडून उसनवारीने पंधरा हजार जमा करून दिले आणि एकदाचं अ‍ॅडमिशन झालं. कॉलेजमध्ये नवीन मित्र भेटले. कुणी गणितात हुशार, कुणी कॉम्प्युटरमध्ये. तर कुणाला फिजिक्स सोपं जायचं. 
तसं मलाही इलेक्ट्रॉनिक्स चांगलं जमायचं. सगळे मराठी माध्यमातून आलेले असल्यानं कॉलेजात इंग्रजीत शिकवलेलं अवघड वाटायचं म्हणून आपल्याला समजलेला विषय आम्ही एकमेकांना समजावून सांगायला लागलो. त्यामुळे सर्वांनाच फायदा झाला. 
२००९ मध्ये आम्ही सर्वजण चांगल्या मार्कांनी पास होऊन बाहेर पडलो.
पॉलिटेक्निक झाल्यानंतर औरंगाबादच्या एका छोट्या फर्ममध्ये काही महिने काम केलं. नंतर एका मोठ्या टेलिकॉम कंपनीत कामाची संधी मिळाली. हे काम गोव्यात होतं. पगार कमी होता. पण नवीन काही शिकायला मिळणार म्हणून मी खूश होतो. फिरतीचं काम असल्यानं गोव्यातली सगळी ठिकाणं फिरून झाली.
महिनाअखेर पगार हातात पडल्यावर समजलं की, ग्रॉस आणि नेट सॅलरीमध्ये बराच फरक असतो. फिरतीचं काम असल्यानं जेवणाचा खर्च जास्त व्हायचा. 
सात महिन्यांनी ही नोकरी सोडली आणि मुंबईला आलो.
नवीन कंपनीतही काम फिरतीचंच होतं. यावेळी पगार जुनाच पण ‘क्लस्टर इंजिनिअर’ नावाचं मोठं पद मिळालं होतं. काम तसं चांगलं होतं, पण घरी पाठवण्याएवढे पैसै मिळत नव्हते. घराची जबाबदारी अजून वडीलच रेटत होते. 
माझी अस्वस्थता वाढत होती. असंच वर्ष निघून गेलं. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यातच आकाशवाणी (बीड) आणि एका शासकीय महारत्न कंपनीची (इंडियन आॅइल कॉर्पोरेशन) जाहिरात आली. मी दोन्ही नोकरीसाठी अर्ज केला. परीक्षा झाली, आकाशवाणीचा निकाल लागला. आश्चर्याचा धक्काच बसला. त्यात मी पहिल्या क्र मांकावर होतो. इंटरव्ह्यूची तारीख अजून मिळाली नव्हती. 
काही दिवसांनी महारत्न कंपनीच्या परीक्षेचा निकाल लागला. इंटरव्ह्यूनंतर त्यात माझी निवड झाली. काही दिवसांत आॅर्डर मिळाली आणि मी कंपनीच्या औरंगाबादच्या कार्यालयात रु जू झालो. आकाशवाणी कार्यालयाच्या इंटरव्ह्यूमध्येही माझं सिलेक्शन झालं, पण मी तिकडे गेलो नाही.
आज मी औरंगाबादमध्येच आहे. महारत्न कंपनीत काम करतोय. आई, वडील आणि लहान भाऊ आता माझ्यासोबतच राहतात. लहान भावाला त्याच्या आवडीचं दुकान सुरू करायला मदत केली.
आता सगळं मनासारखं झालंय.
पण अजून खूप पुढं जायचंय..

 

Web Title: Where is Ghantandoor, Where is Mumbai-Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.