ल्होत्सेवर चढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:06 AM2018-05-31T10:06:19+5:302018-05-31T10:06:19+5:30

साताऱ्याची प्रियांका मोहिते. बंगळुरूत एका बायोटेक कंपनीत संशोधक म्हणून काम करते. आणि मोठमोठ्या पहाडांतून येणा-या हाकांचं आव्हान पेलत ती नवी शिखरं सर करायला निघते. माउण्ट एव्हरेस्ट सर करणा- या प्रियांकानं नुकतंच अत्यंत अवघड ल्होत्से शिखरही सर केलं आहे.

Lhotsevar climbing | ल्होत्सेवर चढाई

ल्होत्सेवर चढाई

Next

- कुलदीप घायवट
लहानपणी साताऱ्याच्या अजिंक्यतारा गडाच्या निमित्ताने तिला गिरीभ्रमंतीचा छंद जडला आणि आता जगभरातील उंच शिखरं तिला खुणावू लागली आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे २०१३ साली तिनं माउण्ट एव्हरेस्टला गवसणी घातल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न होताच. मग माउण्ट ल्होत्सेला हाक मारू लागलं. ८ हजार ५१६ मीटर उंचीचं हे शिखर तसं जगातलं चौथ्या क्रमांकाचं उंच शिखर. मात्र चढाई भलतीच कठीण. एव्हरेस्टनंतर पुढच्या वर्षी ल्होत्से सर करायचं तिनं ठरवलं; पण बदलणाºया हवामानानं ती संधी दिली नाही. अखेर चार वर्षांनंतर तिनं ल्होत्से सर केलं. या कठीण शिखरावर तिरंगा फडकावला. ल्होत्से सर करणारी सर्वांत तरुण महिला असा विक्रमही तिच्या नावे नोंदला गेला.
साताराच्या प्रियांका मोहितेची ही कथा. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी ही मुलगी नृत्यातही पारंगत. अजिंक्यतारा गड तिला हाका मारायचा. बालपणाची अजिंक्यताराची सैर करता करता गिर्यारोहणाचा छंद जडून गेला. सातवीतच प्रियांकानं ट्रेकिंगला सुरुवात केली. रोज सकाळी लवकर उठणं, व्यायाम, योगासन, धावणं, ट्रेकिंग असा दिनक्रमच बनून गेला. जोडीला अभ्यास आणि नृत्याचा क्लास होताच. सातारच्याच यशवंत चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून तिनं बी.एस्सी. केलं. सुरुवातीला साताºयातील गड-किल्ल्यांची ट्रेक केली. मग इतर जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचा अभ्यास आणि भेटी सुरू झाल्या. कैलास बागल सरांनी किल्ला कसा पहायचा, ट्रेकिंग कसं करायचं हे शिकवलं. प्रत्येक गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घेताना हा गड आपल्याशी संवाद साधतोय, त्याचं सौंदर्य पाहण्यासाठी आपल्याला खुणावतोय, असं नेहमी वाटायचं असं ती सांगते.
एव्हरेस्ट सर केलं त्या आठवणींविषयी प्रियांका सांगते,
‘माझी ट्रेकिंगची आवड पाहून क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम, ज्येष्ठ गिर्यारोहक ऋषिकेश यादव यांनी हिमालयात ट्रेक करण्याचा सल्ला दिला. मग मीही धाडस केलं. त्यासाठी बेसिक आणि अ‍ॅडव्हॉन्स माउण्टिंगचा कोर्स केला. उत्तर काशी येथील नेहरू हिस्ट्री माउण्टिंग या संस्थेत एव्हरेस्ट शिखराबद्दल इत्थंभूत माहिती मिळाली. इतर अनेक विषयांचं ज्ञानही याच संस्थेत झाले. त्या जोरावर एव्हरेस्ट सर करण्याची संधी मिळाली. कर्नल निरोज राणा यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांचा चमू ४ एप्रिल ते ४ जून २०१३ दरम्यान हिमालय सर करणार होता. त्यात मीही सामील झाले. एव्हरेस्ट मोहिमेचे चार टप्पे होते, त्याला आम्ही कॅम्प म्हणतो. कॅम्प तीनपर्यंत म्हणजे साधारण ७ हजार ४०० उंचीपर्यंत आॅक्सिजनचा पुरवठा असतो. तिथून पुढे मात्र कृत्रिम आॅक्सिजन वापरावा लागतो. एव्हरेस्ट मोहिमेसाठी ट्रेकिंग बूट, सूट, हेल्मेट, गॉगल, सॉक्स, हार्मर, झोपण्यासाठी बॅग, आॅक्सिजन सिलिंडर वगैरे सात ते आठ किलोचं वजन सोबत घेऊन संपूर्ण तयारीनिशी चढाईला सुरुवात होते. कॅम्प दोनच्या चढाईपर्यंत जेवण पुरवलं जातं. त्यानंतर पुढे स्वत:च शिजवून खावं लागतं. हिमालयातील बर्फ वितळून पाणी करायचं मग, त्यातच मॅगी, सूप असे गरम पदार्थ शिजवायचे, जोडीला भूक मिटविण्यासाठी चॉकलेट, सुकामेवा, एनर्जी ड्रिंक असायचं. या मोहिमेत उणे ४० अंश सेल्सिअस तापमान, हिमवादळांचा सामना करत वयाच्या २१व्या वर्षी जगातील सर्वाेच्च अशा माउण्ट एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकवला. अभिमान आणि आनंदाची भावना होती. आपसूक छत्रपती शिवरायांचा जयघोष झाला.’
मात्र एव्हरेस्टनंतर तिनं अत्यंत अवघड म्हणून ओळखलं जाणारं माउण्ट ल्होत्सेवर मोहीम काढायचा निश्चय केला. हवामानातील बदलामुळे काही वर्षं शांत बसावे लागले. अखेर यावर्षी २०१८ला माउण्ट ल्होत्से सर करण्याची संधी मिळाली. माउण्ट ल्होत्सेच्या मोहिमेत पोलंड आणि तैवानमधील दोन मुली तिच्या सोबत होत्या. शिवाय प्रत्येक गिर्यारोहकासोबत शेरपा (मार्गदर्शक) होताच. एव्हरेस्ट आणि ल्होत्सेच्या वातावरणात खूप तफावत आहे. ताशी १०० ते १५० कि.मी. वेगानं वाहणारे वादळी हिमवादळं, उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सिअस तापमान, त्यामुळे हिमदंशाचा सततचा धोका. पायाखालील छुप्या हिमद-यांची बेफाम दहशत तर डोक्यावर सतत होणारा दगडराशींचा वर्षाव, अशा भीषण प्रतिकूल परिस्थितीत तब्बल ८० ते ८५ अंशातली भयंकर चढाई. यात पिण्याच्या पाण्याची समस्या, आॅक्सिजनचा अपुरा पुरवठा असं सारंही होतंच. मात्र यासा-यावर मात करत तिनं १६ मे २०१८ रोजी ल्होत्सेवर अभिमानाने देशाचा तिरंगा फडकविला. एक नवीन शिखर सर करायला आता ती सज्ज होते आहे..

प्रियांका आता बंगळुरूत एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून कामही करते. यापुढे आठ हजार मीटर उंचीची जगातील सर्वच शिखरं सर करायची आहेत. येत्या आॅक्टोबर महिन्यात मनसलू किंवा मकालू शिखर सर करण्याचा मानस आहे, असं ती सांगते.


(कुलदीप लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.  kuldeep.raje1@gmail.com)

Web Title: Lhotsevar climbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.