नाशिक ते पंढरपूर तिनं कशी केलं एकटीनं सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 03:26 PM2018-07-26T15:26:51+5:302018-07-26T15:29:44+5:30

नाशिकची ईशिता. फक्त 15 वर्षाची. दहावीत शिकते. अलीकडेच ती नाशिक ते पंढरपूर 370 किलोमीटर सायकल वारी करून आली. तिही नॉन गिअर सायकलवर. तेही घरातलं वडीलधारं कुणी सोबत नसताना. एकटीनं. कसं जमलं? तेच ती सांगतेय.

her adventurous journey- Nashik to Pandharpur - on bicycle | नाशिक ते पंढरपूर तिनं कशी केलं एकटीनं सायकल वारी

नाशिक ते पंढरपूर तिनं कशी केलं एकटीनं सायकल वारी

Next
ठळक मुद्देआता वाटतंय, बरेचदा आपल्यालाच माहीत नसतं की आपण काय करू शकतो. पण करायचं ठरवलं तर जमतं.

- ईशिता मराठे

फेब्रुवारी महिन्यात मी सायकल घेतली. तिही नॉन गिअर. शाळेव्यतिरिक्त फार कुठं चालवलीही नव्हती. दोन-तीन किलोमीटर रोज शाळेत सायकलवर जायचे, पण तेवढंच. आणि आता जुलै महिन्यात मी चक्क 370 किलोमीटर सायकल चालवली, थेट नाशिक ते पंढरपूर, सायकलवारी! 
धक्का बसला ना? 
मलाही बसला होता. मी फार कधी सायकलिंग केलं नव्हतं. माझा बाबा बरेचदा 100-150 किलोमीटर राइडला जातो. नेहमी नॉन गिअर सायकलवरच सगळ्या राइड्स करतो. त्याच्याकडूनच मला पंढरपूर सायकल वारीविषयी समजलं. दरवर्षी नाशिक ते पंढरपूर ही सायकल वारी जाते. हे या वारीचं सातवं वर्ष होतं. पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच वाटलं की बापरे, 370 किलोमीटर अंतर जायचं. सायकलवर. तेही साधारण 28 तासांत! मी तर स्वत: जाण्याचा विचारही केला नव्हता. बाबाला विचारलं की तू जाणारेस का, तर तो हो म्हणाला! त्यानं मलाही विचारलं येतेस का, मी थोडा विचार करून म्हणाले जाऊदे, जाऊन ये तूच. त्याच्याबरोबर आपणही जावं, असं ठरलं.
पण जून महिन्यातच राइड करताना बाबा सायकलवरून पडला आणि त्याचा हात फ्रॅक्चर होऊन गळ्यात आला. एव्हाना सर्वानीच सायकल वारीचा विचार मनातून काढून टाकला होता. मीही ते सहज विसरले. जुलै महिन्यात सहज म्हणून नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनतर्फे आयोजित 40 किलोमीटर राइडमध्ये मी भाग घेतला. राइडदरम्यान मला बर्‍याच जणांनी दोन प्रश्न आवजरून विचारले, बाबा कसे आहेत? आणि पंढरपूरला येते आहेस ना? 

बाबा सोबत नसल्यानं मी जाणार नव्हतेच. ती राइड संपल्यावर एण्ड पॉइंटला आई-बाबा आलेले होते. सर्व लोकांनी बाबाला सांगितलं की लेकीला पंढरपूरला पाठवा, तिची काळजी आम्ही घेऊ. बाबानं तर लगेचच उत्साहाने होकार दिला. आईला जरा काळजी होती, तिचा जरा नकार होता.
बघता बघता चक्क 13 तारखेची पहाट झाली. 5.30 वाजता आम्ही साडेपाचशे सायकलिस्ट आमच्या फ्लोरोसेंट रंगाच्या जर्सीमध्ये नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सायकलींवर हजर होतो. सगळे पूर्ण तयारीनिशी आलेले होते. तिथेच विठ्ठलाचं कीर्तनही सुरू होतं. जय हरी विठ्ठल! असा गजर झाला आणि आमची सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली. सगळेच प्रचंड उत्साहात होते. सायकल वारीला चाललो म्हणून सर्वजण एकमेकांना ‘माउली’ म्हणत होते. पहिल्या दिवशी 170 कि. मी. अंतर कापायचं होतं. त्या साडेपाचशे जणांमध्ये केवळ एकच नॉन गिअर सायकल होती, ती म्हणजे माझी. साधारण 70 साकलिस्ट महिला होत्या. 
आम्ही निघालो. प्रत्येक 30-35 किमीवर एक हायड्रेशन आणि स्नॅक पॉइंट होता. या पॉइंट्सवर थांबत, मजल-दरमजल करत आम्ही संध्याकाळी 5 वाजेर्पयत अहमदनगरला पोहोचलो. अंतर 170 किलोमीटर. मी प्रत्येक पॉइंटला थांबल्यानंतर बाबाला फोन करून अपडेट देत होतेच. अहमदनगरला एका मंगल कार्यालयात मुक्कामाची व्यवस्था होती. तिथल्या खोल्यांमध्ये अस्वच्छता, पाली, डास असं सर्वकाही होतं. दिवसाच्या उत्साहाच्या भरात आम्ही झपाझप अंतर कापलं तर खरी, पण इथं थांबल्यानंतर लक्षात आलं की शरीराचं चांगलंच पाणी झालेलं आहे. घाम आल्याने शरिरावर मीठ साचलं होतं, सॅडल सोअर झालं होतं. पायात गोळे येऊन ते कडक झाले होते. अंग चांगलंच दमलेलं होतं. पण ते पाय दुखणंही सुखद वाटत होतं.  सर्वानाच चांगली झोप येत होती तरी जेवणानंतर चक्क विठ्ठलाच्या गीतांवर, सिनेमाच्या गाण्यांवर आम्ही सर्व सायकलिस्ट अंगदुखी विसरून मनापासून नाचत होतो! त्यानंतर मात्र रूममध्ये जाऊन गादीवर पडल्यापडल्या अगदी शांत झोप लागली. इतक्या गैरसोयी असताना, घरच्यासारखं वातावरण नसताना घरच्यापेक्षाही सुंदर झोप मला तिथं लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता सगळे जमलो. निघण्यापूर्वी आम्हाला सांगितलं गेलं की, आजचा 150 किमीचा रस्ता खडतर आहे. रस्ता कच्चा व खडीमातीचा असेल. समोरच्या दिशेने येणारा जोरदार वारा, तीन घाट आणि संपूर्ण रस्त्यानं चढ असेल. ट्रक, टेम्पो, कंटनेर अशी मोठमोठी वेगानं येणारी अवजड वाहनं असतील.  ज्यांना खरंच खातरी असेल की आपण पूर्ण करू शकतो त्यांनीच या, बाकीच्यांनी सायकली ट्रकमध्ये टाकून बॅकअप व्हॅन किंवा बसने या. मलाही ते ऐकून धास्तीच बसली. बर्‍याच लोकांनी सायकली ट्रकमध्ये टाकून दिल्या. मी बाबाला फोन करून विचारलं की मी काय करू. बाबा म्हणाला की हा तुझाच निर्णय आहे. पण मला तरी वाटतंय की तू करू शकतेस. तुलाही तसं वाटत असेल तरच कर. 
मी जरा वेळ विचार केला आणि म्हटलं जे होईल ते बघितलं जाईल. राइड तर पूर्ण करायचीच. आता बघूच की आपल्यात किती दम आहे! मी राइडला जायचा निर्णय घेतला. अतिशय खडतर आणि खड्डय़ांचे रस्ते होते. पण वेग मात्र कमी होऊ द्यायचा नव्हता. रस्त्याने जाताना बाकीचे सायकलिस्ट प्रोत्साहन देत होते. सगळे घाट, चढ वारा खात मी चढून गेले. संध्याकाळी 5 वाजता आम्ही ढेमुर्णीला पोहोचलो. हाडं चक्क खिळखिळी झाली होती. मान, पाठ मोडली होती. पण केवळ जिद्दीच्या जोरावर तो खडतर रस्ता पार केल्याचं पुरेपूर समाधान होतं. दुसर्‍या दिवशीही पलंगावर पडल्या पडल्या डोळे लागले. 
तिसर्‍या दिवशी पहाटे पुन्हा विठ्ठलाचं नाव घेत आम्ही वारी सुरू केली. त्या दिवशी 60 किमी जायचं होतं. 9 वाजता आम्ही पंढरपूरला पोहोचलोही! रस्त्यात खूप वार्‍या दिसल्या. ती हजारो माणसे पांडुरंगाचं नाव घेत भक्तिमय होऊन एकीने पुढे चालली होती. आम्हीही त्या वारकर्‍यांना जाऊन भेटलो. प्रेमाभावाच्या नात्यातून पंढरपूरला आलेल्या शेकडो वार्‍यांतील हजारो माणसे आपलीच जिवाभावाची माणसे आहेत अशी भावना निर्माण झाली होती. पांडुरंगाच्या दारी पोहोचल्यावर आम्ही त्याचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, मिळून-वाटून खाल्ला. सायकलीचं रिंगण केलं, विठ्ठलाची पूजा केली. आमची ही वारी अतिशय सुंदररीत्या पार पाडली. 
या साहसी व अविस्मरणीय अनुभवातून मला स्वत:वर विश्वास निर्माण झाला. राइडदरम्यान कितीदातरी वाटलं की आता सोडून द्यावं, पण सोडलं नाही. आता वाटतंय, बरेचदा आपल्यालाच माहीत नसतं की आपण काय करू शकतो. पण करायचं ठरवलं तर जमतं. या अनुभवामुळे मी कोणत्याही परिस्थितीत स्वतर्‍ला कसं सामावून घ्यायचं ते शिकले. मलाही माहीत नव्हतं की माझ्यात एवढा स्टॅमिना असेल. यातून मला स्वत:च्या मर्यादा तपासून क्षमता जोपासता आल्या. अनोळखी लोकांमध्येही किती जिव्हाळ्याचं नातं असतं, एकीची ताकद व एकमेकांचा आधार असतो हे समजलं. यातून मला आत्मविश्वासच नाही तर माझ्यातली जिद्दही सापडली. मी या राइडदरम्यान जो स्वसंवाद केला त्यातून मी स्वत:ला अजून ओळखत गेले. हा वेळ मी स्वत:शी, माझ्या सायकलीशी एकरूप होण्यात वापरला. एखादी गोष्ट पूर्ण जिद्दीने पूर्ण करण्यात काय मजा असते हे घाम गाळल्यावरच कळलं.


(ईशिता यंदा दहावीत आहे, नाशिक-पंढरपूर 370 किलोमीटरची सायकल वारी तिनं नुकतीच नॉन गिअर सायकलवर यशस्वीरीत्या पूर्ण केली.)

Web Title: her adventurous journey- Nashik to Pandharpur - on bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.