इंजिनिअर आणि देशी गाय

By Admin | Published: July 21, 2016 04:42 PM2016-07-21T16:42:52+5:302016-07-21T16:42:52+5:30

सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेला एक तरुण.शेती करतोय आणि शेतकऱ्यांना सांगतोय की, देशी गाय घ्या...

Engineer and native cow | इंजिनिअर आणि देशी गाय

इंजिनिअर आणि देशी गाय

googlenewsNext

सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेला एक तरुण.
शेती करतोय
आणि शेतकऱ्यांना सांगतोय की,
देशी गाय घ्या,
आता प्रयोगशील शेती करा!

सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यावर चांगली नोकरी, उत्तम करिअर, आरामदायी जगणं हे सारं सहज चालून येतं. पण विदर्भातल्या चंद्रपूर इथला चेतन राऊत मात्र इंजिनिअर झाल्यावर एका वेगळ्याच ध्येयामागे पळत सुटला. त्याच्या डोळ्यासमोर स्वप्न होतं ते आत्महत्त्येच्या विचारांनी दुबळ्या झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात हिमतीनं उभं करण्याचं, त्यांच्या गाठीला चार पैसे मिळतील असा पर्याय शोधण्याचं. आणि हा पर्याय शेतीला डावलून नाही, तर शेतीशी नाळ जोडूनच शोधता येईल याची चेतनला खात्री होती.

चेतन जरी सॉफ्टवेअर इंजिनिअर असला तरी त्याचे वडील एकेकाळी शेतीच करायचे. शरद जोशी यांच्या विदर्भातल्या शेतकरी आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. पण त्यांच्या शेतीनं त्यांना फायदा कधी दाखवलाच नाही. आणि मग त्यांचं शेतीवरचं मन आणि विश्वास दोन्ही उडालं. इतकं की आपल्या मुलानं शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागावं, पण शेतकरी होऊ नये ही त्यांची इच्छा होती. चेतनलाही त्यांनी हाच पाठ पढवला होता. पण असं असलं तरी वडील शेतीवर बोलायला लागल्यावर किती पोटतिडकीनं बोलायचे हेही त्यानं पाहिलं होतं.

चेतन नागपूरच्या कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हाही त्याचं मन मात्र शेतातच घुटमळत होतं. शेतकऱ्यांसाठी काही करायला हवं असं त्याला मनापासून वाटत होतं. त्याच दरम्यान तो ‘विदर्भ युथ आॅर्गनायझेशन’ या संस्थेचा कार्यकर्ता झाला. या संस्थेच्या माध्यमातून त्याचा विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आला. त्यांच्या समस्या कळल्या.
इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘विदर्भ युथ आॅर्गनायझेशन’च्या माध्यमातून तो आणि त्याचे मित्र महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अभ्यास दौऱ्यावर गेले. शेतीचे विविध प्रयोग करणाऱ्या अनेकांना तो भेटला.

अधिक समजून घ्यायचं म्हणून त्यानं २०११मध्ये मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्सेसमध्ये ‘सोशल आंत्रप्रिनरशिप’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा अभ्यास करताना चेतन मध्य प्रदेशातल्या झाबुआ या आदिवासी प्रदेशात गेला. महिनाभर राहिला. आणि तिथे त्याला शेतीचं प्राचीन रूप जवळून अनुभवायला मिळालं. गाय आणि शेती यांचा घनिष्ठ संबंध त्यानं पाहिला आणि हाच प्रयोग त्यानं आपल्या गावात करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं चंद्रपुरातल्या विचोडा हे आपल्या मामाचं गाव निवडलं. इथे त्यानं देशी गाय आणि शेती यांचं समीकरण जुळवायचं ठरवलं. देशी गाय सांभाळण्याचा खर्च कमी, ती कमी आजारी पडते, शिवाय तिच्या दुधाबरोबरच गोमूत्र आणि शेणाचा उपयोगही शेतीसाठी करता येतो. शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर त्याच्या गोठ्यात एक देशी गाय असायलाच हवी हा चेतनचा आग्रह होता. 

शेताच्या बांधावर उभं राहून अशी शेती करा, अशी गाय पाळा असे कोरडे उपदेश केले तर एकाही शेतकऱ्याला आपलं म्हणणं पटणार नाही याची चेतनला जाणीव होती. आणि म्हणूनच त्यानं स्वत: शेती करायचं ठरवलं. त्यानं आपल्या गोठ्यात चार देशी गायी आणल्या आणि तो कामाला लागला.
तो सांगतो, ‘शेतकऱ्यांना माझा विचार समजावून सांगणं सोपं नव्हतंच.

तीन ते चार शेतकऱ्यांना देशी गायीचं महत्त्व पटवून द्यायला दीड ते दोन वर्षं लागली. पण आज तीन वर्षांनंतर विचोडा आणि याच गावाच्या शेजारचं छोटा नागपूर ही दोन गावं मिळून सहा शेतकरी आमच्यासोबत आहेत.’ या सहा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला आणि ही शेती करण्यासाठी देशी गाईही पाळल्या. हे शेतकरी गायींचं दूध काढतात. चेतन या दोन गावातल्या शेतकऱ्यांकडून दूध संकलित करतो आणि चंद्रपुरात नेऊन विकतो. चंद्रपुरात जवळ जवळ १२० घरांना चेतन दूध पुरवतो. आणि यातून आलेला फायदा तो या शेतकऱ्यांना देतो.

चेतननं आपल्या गोठ्यातल्या गायींच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर करून शेतासाठी खतं आणि कीटकनाशकंही बनवली आहेत. त्याचा वापर तो आपल्या सेंद्रिय शेतीसाठी आणि इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं प्रोत्साहन देण्यासाठी करतो. 

चेतनला आपल्या देशी गायींच्या चळवळीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यायचं आहे. तसेच त्याला नंदीशाळा उभी करायची आहे. शेती उत्तम करण्यासाठी उत्तम वाणाचे बैल हवेत तसेच देशी गायींसाठी उत्तम बीज हवं म्हणून चेतनला हा नंदीशाळेचा प्रकल्प उभा करायचा आहे.
चेतन जेव्हा आपल्या देशी गायीचा प्रयोग मामाच्या गावी उभा करत होता तेव्हा घरातून त्याला पूर्ण विरोध होता. इंजिनिअर झालेला मुलगा हे काय करतोय म्हणून त्याला घरातले परावृत्त करत होते. आजीनं तर त्याला ठामपणे विचारलं की, तुला गायींचं दूध काढायचं होतं तर मग दहा वर्ष शिक्षणात कशाला घालवले? पण चेतननं आजीच्या टीकेला विरोध केला नाही. पण त्यानं आपल्या अभ्यासातून कमावलेलं ज्ञान, माहिती आपल्या प्रयोगात ओतली.

चेतन म्हणतो, ‘मी एक सामाजिक उद्योजक आहे. अशा उद्योजकांना बाहेरून प्रेरणा मिळण्याची शक्यता अगदीच कमी असते. जी काही ताकद एकवटायची असते ती स्वत:चीच स्वत:ला. आणि म्हणून या देशी गायींच्या चळवळीत मीच माझी प्रेरणा झालो. माझा स्वार्थ लोकांना विशेषत: शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे. तो स्वार्थ माझ्या चळवळीतून साधला जातोय याचा आनंद आज मला कोणत्याही भौतिक सुखातून मिळाला नसता !’ 

आता चेतनची आईही त्याच्या पाठीशी उभी आहे. तीही चेतनला त्याच्या या प्रयोगात मदत करते आहे. एका नव्या प्रयत्नानं आकार घ्यायला सुरुवात केली आहे. 

- माधुरी पेठकर
( लेखिका लोकमतच्या नाशिक आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: Engineer and native cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.