चोळ मिश्री मार हुक्का

By Admin | Published: March 26, 2015 09:19 PM2015-03-26T21:19:05+5:302015-03-26T21:19:05+5:30

जी तंबाखू जनावरं खात नाहीत, ती तंबाखू माणसं का खातात? आणि स्वत:चं का शरीर पोखरतात?

Chole Misri Mar Hukka | चोळ मिश्री मार हुक्का

चोळ मिश्री मार हुक्का

googlenewsNext
>आनंद पटवर्धन
 
जी तंबाखू जनावरं खात नाहीत, ती तंबाखू माणसं का खातात? आणि स्वत:चं  का शरीर पोखरतात? 
---------
मुळात तंबाखूत असं काय असतं की, जे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असताना, इतरांना मरताना, कर्करोगापुढं हरताना पाहत असूनही  माणसं तंबाखू सोडत नाहीत? 
मला प्रश्न पडला होता. 
मी मुक्तांगणमधल्या वायंगणकरसरांना भेटलो, त्यांना म्हटलं मला अजून माहिती गोळा करायची आहे.
ते म्हणाले, माधवसर आहेत, ते एकदम परफेक्ट माहिती देतील. त्यांनी फोन लावला. माधवसर म्हणाले, थोड्या वेळानं भेटतो.
दरम्यान, मग मी मुक्तांगणमधल्या  पु. ल. देशपांडे ग्रंथालयात गेलो. तिथे ‘व्यसन तंबाखूचे’ ही छोटी पुस्तिका सापडली. त्या छोट्याशा पुस्तिकेत मला अगदी नवीन असलेली माहिती मिळाली. 
त्यात लिहिलं होतं, तंबाखू सेवनाचे तीन मुख्य प्रकार आहेत. विडी किंवा सिगरेट ओढणं, तंबाखूची प्रक्रि या केलेली पानं चुना लावून खाणं किंवा मिश्री म्हणून हिरड्यांना चोळून लावणं. हे मुख्य प्रकार. काही प्रमाणात तंबाखूची पूड प्रक्रिया करून तपकीर हुंगली जाते. हुक्का, चिरूट, सिगरेट हे प्रकार काय किंवा जाफरानी पत्ती, किवाम, मावा, गुटखा किंवा तंबाखूच्या पातळ कागदाच्या वेष्टनात बांधलेल्या पुड्या ही त्याची पुढची पावलं असतात.
तंबाखू मूळची भारतातली नाही. पोर्तुगीजांनी  सोळाव्या शतकात भारतात आणली आणि ते पीक इतकं फोफावलं की, तंबाखू उत्पादनात भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. जगात सर्वात जास्त तंबाखू निर्यात करणारा देश म्हणून अग्रस्थानी आहे.
तंबाखूच्या शेतीला सर्वात सुरक्षित शेती मानली जातं. खतपाणी दिलं की ते पीक वाढतं आणि प्रचंड नफा मिळवून देतं. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखूच्या शेताला कुंपणाची अजिबात गरज नसते. ना जनावरं पीक  खातात ना पक्षी तोंड लावतात. या पृथ्वीतलावर माणूस हा तंबाखू सेवन करणारा एकमेव सजीव प्राणी आहे. (तंबाखू खाणं अपायकारक आहे हे जनावरांना समजतं ते सर्वात विकसित झालेल्या माणसाच्या मेंदूला समजत नसावं हे जगातलं आश्‍चर्य आहे)
तंबाखूमध्ये सुमारे साडेचार हजार वेगवेगळी रसायनं असतात आणि बहुतांशी सर्व रसायनं शरीराच्या दृष्टीने त्रासदायक असतात. त्यातलं निकोटिन हे द्रव्य सर्वात घातक मानलं जातं. खरं तर ते विषंच! कारण त्याचा उपयोग प्रामुख्याने कीटकनाशक म्हणून केला जातो. तंबाखूच्या गाळातून निकोटिन सल्फेट नावाचं रसायन बनतं आणि ते रसायन अनेक कीटकनाशकांचा मोठा हिस्सा असतं.
ही सारी माहिती मला अगदी नवीन होती; पण ही निकोटिनयुक्त तंबाखू शरीरावर कसकसा परिणाम घडवून आणते त्याबद्दल विशेष माहिती नव्हती.
तेच समजून घ्यायला मी माधवसरांकडे गेलो.
मुक्तांगणने प्रकाशित केलेली पुस्तिका मी चाळली आहे. पण,  मला अजून काही प्रश्न आहेत असं सांगितल्यावर ते म्हणाले,‘ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. व्यसनी माणसे असतात ना त्यांना जास्त माहिती दिली तर त्या माहितीची चिरफाड करतात. आता निकोटिनचा वापर अल्झायमरसाठी उपचार म्हणून होऊ शकतो असे काही त्यांना कळले तर मला अल्झायमर होऊ नये म्हणून मी तंबाखू खात राहीन असं तिरपं डोकं ते चालवू शकतात. म्हणून काही गोष्टी आम्ही आपणाहूनच सांगण्याचे टाळतो.’’
‘‘ पण मला सांगाल न?’’ मी हसत विचारले.
प्रश्नच नाही माझी निकोटिन विषयावर पीएचडी झाली आहे. फक्त अधिकृत पदवी मिळायची बाकी आहे आणि माझ्या पीएचडीला स्वत: वीस वर्षे निकोटिन वापरण्याचा जबरा अनुभव आहे.’’ डोळे मिचकावत त्यांनी एक स्माइल दिलं.
‘‘ त्याचं काय होतं निकोटिन लगेच रक्तात मिसळतं. आणि अँड्रेनल ग्रंथींना उत्तेजित करतं. त्यामुळे एपिनेफ्रीन या हार्मोन्सचं स्त्रवण करतं. एपिनेफ्रीन मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. श्‍वासावर परिणाम होतो आणि हृदयाची धडधड वाढते.’’
‘‘त्यातून निकोटिनची जी सवय होते, ती सुटता सुटत नाही. आणि म्हणून अनेकजण समजूनही या व्यसनातून बाहेर पडत नाही. पण, हे सारंच जीवघेणं आणि वेळीच बाहेर पडलं नाही, तर आयुष्याचा घात होणारच!’’
ते बोलत होते आणि मला माझ्या अवती-भोवती गुटखा-तंबाखू-मावा खाणारे तरुण चेहरे आठवत होते.
 
(सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे.)

Web Title: Chole Misri Mar Hukka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.