बाइक रायडिंग : वेगावर स्वार होण्याची ही झिंग कुठं नेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:30 AM2019-01-17T06:30:00+5:302019-01-17T06:30:07+5:30

कॉलेजला पाय लागले की वाटतं, आपल्याकडे बाइक असावीच. ही बाइक मग तारुण्याची मैत्रीण होते, वेगाची चटक लावते आणि त्या वेगावर स्वार होत देशाची टोकं पालथी घालत तरुण मुलं निघतात सुसाट!

Bike Riding: addiction of speed -safe or dengerous? | बाइक रायडिंग : वेगावर स्वार होण्याची ही झिंग कुठं नेणार?

बाइक रायडिंग : वेगावर स्वार होण्याची ही झिंग कुठं नेणार?

Next
ठळक मुद्देतरणेबांड, स्टायलिश, हॅन्डसम तरुण तितक्याच ‘मॅनली’ बाइक्सवर स्वार होऊन पडद्यावर आणि माध्यमांमध्ये झळकू लागले. त्याचाही परिणाम म्हणून तरुणांनी अलगद या बाइक्स उचलल्या आणि ते सुसाट झाले. 

 समीर मराठे  

वेगाचं तुम्हाला आकर्षण असेल, वार्‍यावर स्वार होण्याची झिंग  असेल, भन्नाट वेगानं वाहणारा तो वारा केवळ कानातच नव्हे, तर मनात, मेंदूत आणि काळजातही घुमत असेल, तर बाइक रायडिंगचा हा थरार केवळ तुमच्यासाठीच आहे!.
त्या वेगाची झिंग चढतेच. ती उतरता उतरत नाही. 
**
भल्या सकाळची वेळ.
सुनसान रस्ता.
आणि तशात कानठळ्या ठोकणारे, एकामागे एक येणारे ते आवाज.
ब्रूम... ब्रूम... झू... म!
आवाजापाठोपाठ भयानक वेगानं येणारे बाइक रायडर्स.
त्या नुसत्या आवाजानंच आपल्याला धडकी भरते, उरात धस्सùù होतं.
डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तेवढय़ात हे रायडर्स नजरेच्या टप्प्याच्याही बाहेर, पार कुठल्या कुठे पोहोचलेले असतात.
अनेक शहरांत आज हे दृश्य सर्रास पाहायला मिळतं. 
त्याचा छोटा आणि हादरवणारा अवतार आपल्याला बर्‍याचदा दिसतो तो वेगवेगळ्या शहरांत जिथं कॉलेजेस असतात त्या रस्त्यांवर! बाइकवरचे तरुणांचे स्टंट, पहिल्या-दुसर्‍या गिअरवरचा तुफानी वेग, कर्कश आवाज आणि कसरती करत क्षणात त्यांचं अदृश्य होणं. पाहणार्‍यांच्या काळजाचा ठोका चुकतोच.
कॉलेजगोइंग तरुणाईत बाइक रायडिंगचा हा थरार पावलोपावली दिसतो. 
शाळा ‘सुटली’, कॉलेजला पाय लागले की स्वातंत्र्याची आणि बाइकची ओढ तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. आपण ‘मोठे’ झाल्याची जाणीव, स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम झाल्याची भावना, उसळतं रक्त आणि वेगाची उपजत झिंग त्यांना सुपरबाइक्सकडे खेचून नेते. 
आजची शाळकरी मुलं तारुण्यात येतात तीच या गाडय़ांचा वेग आणि थरार पाहून. त्यावर स्वार झालेल्या तरुणांचं इम्प्रेशन आणि त्याचं गारूड या मुलांवर पाहताक्षणी पडतं. त्यापासून मग ती दूर कशी राहणार? 
अडीचशे-तीनशे सीसीपासून तर त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या या स्टायलिश शिवाय ‘मॅनली’ बाइक्सचे अनेक पर्याय तरुणाईसमोर आज अगदी सहजपणे खुले आहेत. हातात जर पैसाही असेल तर मग कुठलंही बंधन या तरुणांना बांधून ठेवू शकत नाही. उपजत आकर्षणातून आपोआपच बाइकवर ते मांड ठोकतात. 
अनेक तरुण या सुपरबाइक्स तर घेतात, पण शोरूममधून त्या जातात, ते थेट ‘स्पेशलाइज्ड’ गॅरेजवर! इथे त्या गाडय़ा मुळातूनच बदलल्या जातात, त्यांचा मेकओव्हर होतो आणि नवं रुपडं घेऊन, मॉडीफाय होऊन आणखी स्टायलिश रूपात त्या रस्त्यावर येतात. या बाइक्सची आणि त्यांच्या रायडर्सची शान मग व्हच्यरुअल जगातही धुमाकूळ घालायला लागते.
पूर्वी अशा बाइक्स आणि असे रायडर्स नव्हते का?
होते; पण त्याला खूपच मर्यादा होत्या.
तुम्ही कितीही बडे बाप के बेटे असा, तुमच्या खिशात कितीही नोटा खुळखुळत असोत, आज ज्या बाइक आपल्याला रस्त्यावर पळताना दिसतात, तितकी गाडय़ांची चंगळ तेव्हा नव्हतीच. एक बुलेट सोडली तर एवढय़ा जास्त क्षमतेच्या बाइक कोणतीही कंपनी तयारही करत नव्हती. या बाइक्स पाहायला मिळायच्या त्या फक्त गुळगुळीत परदेशी इंग्रजी मॅगझीन्समध्ये आणि हॉलिवूडच्या सिनेमांत! 
आज तरुणाईत बाइकची एवढी क्रेझ का आहे, त्यासाठी ती का वेडी झाली आहे, याबाबत नाशिकचा रायडर जयेश भंडारीची काही निरीक्षणं आहेत.  जयेश स्वतर्‍ उत्तम रायडर तर आहेच, पण आपल्या ‘द हायकर क्लब’तर्फे लेह, लडाख इत्यादी ठिकाणी बाइकवर तरुणांच्या ट्रिप्सही तो अरेंज करतो. 
जयेश सांगतो, तरुणाईला वेगाची आणि नावीन्याची झिंग उपजतच असते. त्या वेगावर मांड ठोकण्याचं थ्रिल उसळत्या रक्ताच्या तरुणाईवर कायमच गारूड करीत असतं. त्याच संधीची ते वाट पाहत असतात. क्षणोक्षणी बदलत जाणार्‍या आजच्या जमान्यात ही संधी त्यांच्यापुढे खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी ही संधी तरुणांपुढे फारशी नव्हतीच. कारण जास्त सीसीच्या गाडय़ाच तयार होत नव्हत्या.
1991 नंतरच्या इंडस्ट्रिअल रिव्होल्यूशननंतर परिस्थिती बदलायला लागली. 2005नंतर तर परदेशी कंपन्यांच्या बाइकही ढिगानं भारतात येऊ लागल्या. त्यांचा लूक, 300, 400, 500 क्षमतेच्या या बाइक्सचा थाट आणि त्यांच्यावर न ठरणारी नजर. तरुणांच्या मनाचा त्यांनी पाहताक्षणीच कब्जा घेतला. दरम्यानच्या काळात भारतीय रस्त्यांचं रंगरूपही पालटायला लागलं. चांगले गुळगुळीत रस्ते बायकर्सना साद घालू लागले.  
जास्त क्षमतेच्या या फ्यूचर बाइक्स तरुणांच्या हातात आल्यामुळे नवनवी आणि हटके डेस्टिनेशन्स शोधायला त्यांनी सुरुवात केली. शहरात अशाही या बाइक्स चालवणं अवघड, त्यामुळे आपली वेगाची नशा अशा डेस्टिनेशन्सवर भागवायला तरुणांनी सुरुवात केली.
प्रेमात पडलेल्या कॉलेजगोइंग कपल्ससाठी तर ही मोठीच पर्वणी होती. आयटी क्षेत्रातल्या तरुणाईलाही या बाइक्सची भुरळ पडली. संपूर्ण आठवडाभर दिवसरात्र काम केल्यानंतर स्वतर्‍ची स्पेस आणि प्रायव्हसी मिळावी यासाठी त्यांनी, आयटी कपल्सनीही आधार घेतला तो या बाइक्सचाच. कंपन्यांनीही तरुणाईची ही पॅशन एनकॅश करायला सुरुवात केली आणि एकसे हटके एक बाइक्स मार्केटमध्ये येऊ लागल्या. तरुणाई सगळीकडून या बाइक्सवर तुटून पडल्यामुळे रस्त्यांनीही या बायकर्सना मग आपल्या अंगाखांद्यावर खेळवायला सुरुवात केली.
कोणत्याही खेळाला, छंदाला तसं वयाचं बंधन नाही; पण सळसळतं रक्त आहे, समोर फ्यूचर बाइक्स आहेत, पैशाचंही नो टेन्शन, मग कशासाठी थांबायचं आणि कुणाची वाट पाहायची? जे काही जगायचं आहे, ते आत्ताच. तरुणाईच्या या मानसिकतेला वेगवेगळ्या जाहिरातींनीही खतपाणी घातलं. तरणेबांड, स्टायलिश, हॅन्डसम तरुण तितक्याच ‘मॅनली’ बाइक्सवर स्वार होऊन पडद्यावर आणि माध्यमांमध्ये झळकू लागले. त्याचाही परिणाम म्हणून तरुणांनी अलगद या बाइक्स उचलल्या आणि ते सुसाट झाले. 

जयेश सांगतो, बुडाशी पाचशे सीसीची फ्यूचर बाइक आहे, ताशी दीडशेचा स्पीड देणारा, झिंग आणणारा थरार आहे; पण सिटीत तर ही बाइक चालवता येत नाही, मग हा पांढरा हत्ती काय केवळ दारात उभा करण्यासाठी आहे का, असं म्हणत तरुणाईनं या बाइकवर मांड ठोकली. वेग, थ्रिल, स्वातंत्र्य, प्रायव्हसी, निसर्ग, पिकनिक, पर्यटन.  या सार्‍या गोष्टींची जोड त्याला मिळाली आणि चिकन्या रस्त्यांवर बायकर्स तरंगायला लागले. 
एकाच वेळी इतकं काही देणारी ही नशा बर्‍याचदा डोक्यात जातेच. ‘कुठे थांबायचं’ याचा ब्रेक मनाशी नसेल तर गोष्टी भयंकर होतात. मात्र हेदेखील खरं की डोकं ताळ्यावर ठेवून या गाडीवर स्वार झालं तर या वेगाची मजा कशातच नाही!..

****

थरार नंतर.. आधी सेफ्टी!

1. झिंग, थरार, वेग, एन्जॉयमेन्ट या गोष्टी नंतर. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. त्यासाठी हेल्मेट, जॅकेट, नि गार्ड, एल्बो गार्ड, ग्लोव्हज, बूट, अ‍ॅन्टिलॉक ब्रेक्स, स्टॅबिलिटी कन्ट्रोल सिस्टम, एलईडी लायटिंग, सनग्लासेस. यासारख्या गोष्टी वापरल्याच पाहिजेत. 
2. बाइक रिपेअरिंगचं किमान प्राथमिक ज्ञान तरी तुम्हाला हवंच हवं. बाइकची देखभाल तुम्हाला स्वतर्‍ला करता आली पाहिजे.
3. मेन्टेन्ड बाइकच तुमचा आनंद द्विगुणीत करील आणि दुर्दैवी अपघातांपासूनही तुम्हाला दूर ठेऊ शकेल. त्यासाठी सातत्यानं बाइक चेकअप आवश्यक.
4. आपल्या बाइकसाठी तुम्ही कोणतं इंधन वापरता, त्यावरही तुमच्या बाइकचा परफॉर्मन्स ठरतो. 
5. बाइक हातात आली, मग ‘उडवा’ आता, असं न करता, त्यावर अगोदर प्रभुत्व मिळवा, त्यासाठीचा पुरेसा अनुभव घ्या. त्यासाठीचा आत्मविश्वास आल्यावरच रायडिंगला सुरुवात करा. 
6. वार्‍याच्या वेगाशी स्पर्धा न करता निसर्गाची आणि रायडिंगची मजा लुटत स्मूथ रायडिंग हे ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवा.
7. आपण ज्या ठिकाणी बाइक चालवत आहोत, तिथल्या भूभागाचंही भान ठेवा आणि त्याप्रमाणे काळजी घ्या. काश्मीरसारख्या ठिकाणी थंडी खूप असते. अशा ठिकाणी स्पोर्ट्स शूज चालत नाहीत. तिथे गमबूट लागतात. बर्फ आणि थंडगार पाण्यामुळे तुमच्या हातापायाची बोटं गारठू शकतात. 
8. हिमालयासारख्या ठिकाणी तुम्ही रायडिंग करीत असाल, तेव्हा समुद्रसपाटीपासून तुम्ही आठ ते दहा हजार फूट उंचीवर असता. अशा ठिकाणी ऑक्सिजनचीही कमतरता असते. त्याचं भान आणि त्यानुसार काळजी घेतली पाहिजे.
9. अशा  ठिकाणी  हव्या त्या क्षमतेनं तुमची बाइक चालत नाही. त्यामुळे उच्च दर्जाचं इंधन इथे लागतं. यासाठीची तयारी अगोदरच करून ठेवायला हवी. 
10. आपण जे काही करतोय, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, हे ओळखून ‘जबाबदार’ नागरिक म्हणूनच आपलं वर्तन असलं पाहिजे. 

 वेडे स्टंट आणि जीवघेण्या कसरती 


1. बाइक राइड आपण छंद म्हणून करतोय, हे कायम लक्षात ठेवा. त्यासाठी कुठलीही टाइमलाइन नाही. उशीर झाला तर कोणी तुम्हाला फासावर लटकवणार नाही, त्यामुळे बाइकवर असताना वेगाशी आणि वेळेशी स्पर्धा करू नका.
2. ग्रुपसोबत बाइक राइड करणं चांगलंच, कुठे रिमोट ठिकाणी गेल्यावर ही सोबत खूप कामाला येते; पण ग्रुपसोबत असताना एकानं अ‍ॅक्सिलेटर पिळलं की दुसरा त्याच्यापेक्षा जोरात पिळतो, त्यामुळे आपापसांतच स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा आपल्या आणि इतरांच्याही जीवाशी खेळ ठरू शकतो. त्यामुळे कोणाशीही स्पर्धा करणं टाळा.
3. बाइक हातात आली की अनेकांना आकाश ठेंगणं होतं. रोड सेन्स ते कायम विसरतात. रोडचा हा सेन्स कधी विसरता कामा नये.
4. ड्राइव्ह करीत असताना बर्‍याचदा घाटमाथा, वळणावळणाचे रस्ते. काही टर्न तर अगदी 180 डिग्रीमध्ये असतात, अशावेळी वेगावर नियंत्रण हवं आणि हॉर्नचाही वापर करावा.  आजवर वळणाच्या ठिकाणीच खूप अपघात झाले आहेत.
5. तुम्ही कुठलीही गोष्ट करता, त्यावेळी त्याची किमान ढोबळ फ्रेमवर्क ठरलेली असते. ती मोडू नका, त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका.
6. बाइकवर असताना कुठलेही स्टंट, कसरती, उगाच लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. हा शुद्ध वेडेपणा बर्‍याचदा अंगाशी येतो आणि आयुष्याचाच खेळ होतो.
7. बाइक चालवत असताना कितीही मोठा, छोटा उतार असला तरी बाइक बंद किंवा न्यूट्रल करू नये. इंधन वाचवण्याच्या नादापायी अनेक जण हा उद्योग करतात. त्यामुळे बाइकवरचा तुमचा कन्ट्रोल पूर्णपणे संपतो आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. 

लक्षात ठेवा.

1. रायडिंग करीत असताना तुमचं चित्त थार्‍यावर असणं अत्यंतिक महत्त्वाचं.
2. टेन्शनमध्ये असाल,  विचारांनी तुमच्या मनात कल्लोळ झालेला असेल तर अशावेळी राइड करणं शक्यतो टाळाच.
3. सुपरबाइकवर बर्‍याचदा तुमचा वेग वार्‍याशी स्पर्धा करणारा असतो, शंभरच्या पुढेही गेलेला असतो, अशावेळी एका क्षणाची चूकही घात करू शकते.
4. राइड करीत असताना मन स्थिर हवं. अनावश्यक विचारांना प्रयत्नपूर्वक कसं दूर ठेवायचं याचंही एक शास्त्र आहे. ते शास्त्र शिकून घेतलं पाहिजे. 
5. शरीर, मन कायम रिलॅक्स्ड हवं. त्यासाठी श्वासाची तंत्रं खूप उपयोगी पडतात. 
6. सुपरबाइक चालवत असताना बर्‍याचदा तुम्ही लॉँग डिस्टन्स आणि भन्नाट वेगानं जात असता. शरीर आणि मनावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे ‘केव्हा थांबायचं?’ याचं आपलं भान जागतं ठेवावं लागतं. 
7. अचानक पुढे आलेला धोका आणि इमर्जन्सीच्या वेळी ‘काउन्टर स्टीअरिंग’ टेक्निक शिकून घेतलं पाहिजे आणि योग्यवेळी त्याचा उपयोगही केला पाहिजे. 
8. राइड करताना बार ग्रिप आणि तुमची बॉडी पोझिशन योग्यच असली पाहिजे. नाहीतर ही गोष्ट अपघातांनाही निमंत्रण देऊ शकते. 
9. भन्नाट वेगानं जात असताना कायम अलर्ट असणं महत्त्वाचं. झोप ही गोष्ट त्यासाठी अत्यंतिक महत्त्वाची. पुरेशी झोप झाल्याशिवाय आणि झोप, डोळ्यावर झापड येत असल्यास राइड करू नये.
10. बाइकचं वजन, वेग आणि जितका वेळ तुम्ही एकाच जागी एकाग्रचित्तानं बसलेला असता, त्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते, त्यामुळे दैनंदिन व्यायाम महत्त्वाचा!
 

Web Title: Bike Riding: addiction of speed -safe or dengerous?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.