video : कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:58 PM2018-12-23T15:58:48+5:302018-12-23T16:01:16+5:30

‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याच्यासोबत जमलेला गप्पांचा फड

Video: Who will win Maharashtra Kesari? | video : कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब...

video : कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब...

जालना : ज्या क्षणाचे सारे क्रीडाप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. आता काही तासांमध्येच मानाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे. आता गतविजेता अभिजित कटके पुन्हा एकदा बाजी मारणार की त्याला बाला रफिक जोरदार टक्कर देणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

खुराकाचा खर्च दरमहा पन्नास हजार रुपये!
सध्या स्पर्धांचं प्रमाण वाढलं आहे; पण प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावं का असं विचारल्यावर अभिजित उत्स्फूर्तपणे म्हणाला, खेळाची भीती राहत नाही ना मग. मुलांना अशा स्पर्धांतून पैसासुद्धा मिळतो. खुराकाचा खर्च किती असतो?
-मला चाळीस-पन्नास हजार रुपये लागतात दर महिन्याला. वडिलांनी मनावर घेतलंय म्हणून, ते कुठूनही जमवतात. पण तसं सगळ्यांचंच नसतं. शिवाय अशा वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्यानं टेक्निक कळतं. कसं खेळायचं याचा आत्मविश्वास येतो. आम्ही तालमीत सराव करतो त्यामुळे आम्हाला इथल्या कुस्तीचं काहीच वाटत नाही. तसंच बाहेरच्या स्पर्धांमध्ये खेळल्यानं मोठमोठ्या स्पर्धांचंही काही वाटत नाही.’
अभिजितनं एकाचवेळी आर्थिक अडचणीचं वास्तव आणि त्याकडे पाहण्याचा सकारात्मक भाव सांगितला..

..कुस्ती जवळपास कायमचीच संपली होती !
अभिजित वेगवेगळ्या छोट्या स्तरावरच्या स्पर्धा खेळत होता. जिंकणं-हारणं सुरू होतं. पण या दरम्यान नेमकी त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली. अस्थिबंधन- लिगामेंट फाटली. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. ही गोष्ट २०१३ मधली. वयाच्या सतराव्या वर्षातली. डॉक्टरांनी सहा महिने आराम सांगितला. नुसताच आराम नव्हे तर कुस्ती खेळता येईल का नाही याबाबत कुठलीही खात्री त्यावेळेस दिलेली नव्हती. कदाचित खेळताच येणार नाही असाच त्यांचा सूर होता. तो आतून पार कोलमडला. आपण आत्ता कुठं कुस्ती करायला लागलो होतो. स्पर्धा जिंकायच्या, किताब मिळवायचे, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदकं मिळविण्याची स्वप्नं उराशी आणि दुसरीकडे निखळलेल्या खांद्याचं दु:ख. अशा उमेदीच्या काळात माणूस खचल्याशिवाय राहणार नाही. अभिजितही खचला; पण त्यानं उमेद सोडून दिली नाही. स्वप्नांच्या वाटेवर कस्सून धावायला सुरुवात केल्यानंतर अचानक थांबावं लागल्यामुळे तो दुखावला गेला, रडलाही; पण कायम रडत बसला नाही. त्यातून सावरला आणि नव्या जिद्दीनं पेटून उठला.

..मग मारायचो दोन हजार बैठका, करायचो दहा किलोमीटर रनिंग..

अभिजित सांगतो, ‘मी खरं तर खूप आधीच महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकायला हवा होता. म्हणजे जिंकलाच असता, पण खांद्याचं दुखणं आलं. सहा महिन्यात ठीक होईल असं वाटलं होतं; पण दीड वर्ष लागलं. कुस्तीपासून दुरावलोे होतो; पण आतून जिद्द कायम होती. पहिल्या सहा महिन्यात तर आरामापेक्षा रडायलाच जास्त यायचं. स्वत:वर खूप चीड यायची. राग यायचा. नंतर मी सावरलो. रागाचं रूपांतर व्यायामात करू लागलो. अप्पर बॉडी व्यायाम शक्य नव्हता. मग सकाळी १० हजार मीटर पळायचं आणि संध्याकाळी दोन हजार बैठका काढायच्या. राग कशावर तरी काढायचा असायचा. तो असा व्यायामातूनच निघायचा. याचवेळी माझ्या मागाहून तालमीत आलेली मुलं पुढं जाऊ लागली. आपणपण कुस्ती खेळायला पाहिजे म्हणून ईर्षा वाढू लागली. पप्पासुद्धा म्हणायचे, बघ तुझ्यापेक्षा लहान मुलं खेळू लागलीत. जिंकू लागलीत. गदा आणण्याचं स्वप्न राहिलं बघ. मला अजूनच चीड यायची. दीड वर्ष हा संघर्ष केल्यानंतर हळूहळू कुस्तीचा सराव सुरू झाला. २०१५ मध्ये युवा स्पर्धेत उतरलो. गमावलेला आत्मविश्वास परत येऊ लागला..’

Web Title: Video: Who will win Maharashtra Kesari?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.