९ तारखेपासून खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार; ३६० पैलवान रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 07:24 PM2024-03-07T19:24:36+5:302024-03-07T19:31:33+5:30

येत्या ९ तारखेपासून  लातूर येथे खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

Thrill of Khashaba Jadhav State Level Wrestling Tournament from 9th march | ९ तारखेपासून खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार; ३६० पैलवान रिंगणात

९ तारखेपासून खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार; ३६० पैलवान रिंगणात

लातूर: येत्या ९ तारखेपासून  लातूर येथे खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उदगीर शहरात ९ ते ११ मार्च कालावधीत थरार रंगणार आहे. तब्बल २० वर्षानंतर मराठवाड्यात होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेची उदगीर पंचक्रोशित मोठी उत्सुकता दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात प्रथमच होणार्‍या स्पर्धेत राज्यातील ३६० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. 

उदगीरमधील जिल्हा परिषद मैदानावर या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या नावाने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. स्पर्धेत सहभागी होणार्‍या नामवंत मल्लांची ९ मार्चला सकाळी उदगीर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांच्यासह राज्यातील अर्जुन पुरस्कारार्थी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, नामांकित पैलवान, महाराष्ट्र केसरी पैलवान उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन ९ मार्चला सायंकाळी ६ वाजता ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन  व क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होईल. यावेळी लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी यांसह सांस्कृतिक कार्यक्रमाने हा सोहळा भव्य-दिव्य करण्याचे नियोजन आहे. उदगीरमधील ऐतिहासिक भुईकोट किल्याची पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धेचे आकर्षक असे बोधचिन्ह आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी व स्पर्धा समितीच्या कार्याध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या बोधचिन्हांचे प्रकाशन करण्यात आले.

Web Title: Thrill of Khashaba Jadhav State Level Wrestling Tournament from 9th march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.