...तर भारताची आयसीसी टी-२0 रँकिंगमध्ये घसरण

By admin | Published: August 25, 2016 08:46 PM2016-08-25T20:46:47+5:302016-08-25T20:46:47+5:30

भारतीय संघ २७ आणि २८ आॅगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-२0 मालिकेत जर दोन वेळेसचा वर्ल्डचॅम्पियन वेस्ट इंडीजकडून 0-२ फरकाने पराभूत झाला

... then India's T20 ranking slipped | ...तर भारताची आयसीसी टी-२0 रँकिंगमध्ये घसरण

...तर भारताची आयसीसी टी-२0 रँकिंगमध्ये घसरण

Next

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 25 : भारतीय संघ २७ आणि २८ आॅगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-२0 मालिकेत जर दोन वेळेसचा वर्ल्डचॅम्पियन वेस्ट इंडीजकडून 0-२ फरकाने पराभूत झाला, तर ते आयसीसी टी-२0 आंतरराष्ट्रीय टीम रँकिंगमधील आपले दुसरे स्थान गमावतील.
भारतीय संघाचे अद्याप १२८ गुण आहेत आणि ते अव्वल स्थानी असणाऱ्या न्यूझीलंड संघाच्या चार गुणांनी मागे आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वेस्ट इंडीजचे १२२ गुण आहेत.

नवीन कर्णधार कार्लोस ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघ जर भारताला २-0 असा नमवू शकला, तर ते १२७ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचतील आणि भारतीय संघाची तिसऱ्या क्रमांकावर घसरण होईल व तेव्हा त्यांचे १२४ गुण होतील; परंतु जर कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा संघ २-0 विजय मिळविण्यात यशस्वी ठरला, तर ते रँकिंगवर नंबर वनवर असणाऱ्या न्यूझीलंड संघाच्या गुणांची बरोबरी करतील. त्यांचे १३२ गुण आहेत; परंतु रेटिंगची गणना दशांश गुणांत केली जाईल तेव्हा त्यांना दुसऱ्या स्थानावरच कायम राहावे लागेल. अशा परिस्थितीत वेस्ट इंडीजचा संघ ११८ गुणांसह चौथ्या स्थानावर जाईल आणि ते एका गुणाने दक्षिण आफ्रिकेच्या मागे राहतील. भारतीय संघाने ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली, तर भारताचे १२८ गुण होतील आणि वेस्ट इंडीजचे १२३ गुण होतील.

या मालिकेत वैयक्तिक कामगिरीदेखील महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली टी-२0 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ८३७ गुणांसह अव्वल स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच त्याच्यापेक्षा ३४ गुणांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे कोहली आपले अव्वल स्थान मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न करील.

रोहित शर्मा २३ व्या स्थानावर आहे आणि धोनी ५0 व्या स्थानी आहे; परंतु फलंदाजीची संधी मिळाल्यास त्यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा होऊ शकते. वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आठव्या, अनुभवी फलंदाज मर्लोन सॅम्युअल्स १७ व्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे लेंडल सिमन्स (३१ व्या), ड्वेन ब्राव्हो (३७ व्या), आंद्रे फ्लेचर (४८ व्या) स्थानावर असून, त्यांचा त्यांचे रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न असेल.

भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-२0 गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. रविचंद्रन आश्विन सातव्या स्थानावर आहे, तर फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा १९ व्या स्थानावर आहे. मर्लोन सॅम्युअल्स अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.

 

Web Title: ... then India's T20 ranking slipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.