मयप्पनवर कठोर कारवाई व्हावी

By admin | Published: November 20, 2014 12:01 AM2014-11-20T00:01:58+5:302014-11-20T00:01:58+5:30

भारताचा माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी आज, बुधवारी ‘आयसीसी’चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावर टीका केली

Strict action should be taken against Meiyappan | मयप्पनवर कठोर कारवाई व्हावी

मयप्पनवर कठोर कारवाई व्हावी

Next

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी आज, बुधवारी ‘आयसीसी’चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावर टीका केली. तसेच, ‘आयपीएल’प्रकरणी श्रीनिवासन यांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘मयप्पनवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हायला हवी. श्रीनिवासन यांना जर काही खेळाडू फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची माहिती होती, तर त्यांनी याविरुद्ध कोणतीही कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे.
श्रीनिवासन यांना फिक्सिंगबाबत सर्व काही माहीत होते. मात्र, त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे मुदगल समितीमध्ये म्हटले असल्याचा रिपोर्ट आहे. असे असेल तर त्यांना माहीत असूनही संबंधित खेळाडूंवर कारवाई का केली नाही, याबाबतचे स्पष्टीकरण द्यायलाच हवे, असे गावसकर या वेळी म्हणाले.
गावसकर म्हणाले, बेटिंगमध्ये बहुतांशवेळा काळ्या पैशाचाच वापर होतो. मात्र, एकदा बेटिंग अधिकृत केले तर यातून सरकारचा महसूलही वाढेल. जर कोणाला बेटिंग करायचे असेल, तर त्याने ते कायदेशीररीत्या करावे. भारताच्या आगामी आॅस्ट्रेलिया क्रिकेट दौऱ्याबाबत ते म्हणाले, भारतासाठी हा दौरा कठीण असणार आहे. भारतीय खेळाडूंनी संयम दाखवायला हवा. आॅस्ट्रेलियात खेळताना खेळाडूंच्या भात्यात नवीन शस्त्रे असायला हवीत. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्या फलंदाजीला पोषक असतात. मात्र, यासाठी खेळाडूंकडे संयम हवा.
गावसकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून आॅस्ट्रेलियामध्ये गेले होते. मेलबोर्न क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉटही त्यांच्या समवेत होते.
गावसकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेला विनोदी किस्साही सांगितला. ते म्हणाले, फोटोसेशनवेळी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी विश्वचषक हाती घेतला होता, तर आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ॅबॉट यांनी गावसकर-बॉर्डर चषक हाती घेतला होता. या वेळी मोदींना म्हणालो की, तुम्ही योग्य चषक हाती घेतला आहे. आपण गावसकर-बॉर्डर चषक जिंकला आहे. मात्र, पुढील वर्षी विश्वचषकच आपल्याला हवा आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Strict action should be taken against Meiyappan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.