श्रीसंत, अंकित, चंदिला यांच्या भविष्याचा निर्णय २५ जुलै रोजी

By Admin | Published: June 30, 2015 02:11 AM2015-06-30T02:11:43+5:302015-06-30T02:11:43+5:30

दिल्लीतील एक न्यायालयाने आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत, अंकित चव्हाण

Sreesanth, Ankit and Chandila's decision on the future of 25 July | श्रीसंत, अंकित, चंदिला यांच्या भविष्याचा निर्णय २५ जुलै रोजी

श्रीसंत, अंकित, चंदिला यांच्या भविष्याचा निर्णय २५ जुलै रोजी

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीतील एक न्यायालयाने आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंदिला यांच्यावरील आरोप निश्चित करण्याबाबतच्या सुनावणीला आगामी २५ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.
पतियाळा हाऊस कोर्टामध्ये या प्रकरणाची आज सकाळी सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी पुढील सुनावणीसाठी २५ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. सुनावणीदरम्यान श्रीसंत उपस्थित होता.
न्यायाधीशांनी म्हटले, की या प्रकरणाचे निकालपत्र अद्याप तयार झालेले नसल्यामुळे सुनावणी व आरोप निश्चित करण्यासाठी स्थगिती देण्यात येत आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंग करण्याच्या आरोपाखाली मे २०१३मध्ये अटक केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी या तीन क्रिकेटपटूंविरुद्ध तांत्रिक आधारावर न्यायालयात अद्याप आरोप निश्चित होऊ शकले नाहीत.
न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीसंत म्हणाला, ‘‘माननीय न्यायाधीशांनी २५ जुलैला पुढील तारीख निश्चित केली आहे. निर्णय आल्यानंतर मला न्याय मिळेल, अशी आशा आहे.’’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर २०१३मध्ये श्रीसंत व चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घातली, तर चंदिलाचे प्रकरण बोर्डाच्या शिस्तपालन समितीकडे अद्याप प्रलंबित आहे. पतियाळा हाऊस कोर्टाच्या बाहेर आज सकाळपासून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्यांत श्रीसंतचे गृहराज्य केरळच्या टीव्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींची गर्दी अधिक होती. श्रीसंत न्यायालयाबाहेर पडला त्या वेळी शांत दिसत होता. तो म्हणाला, ‘‘सुनावणी आता जवळजवळ महिनाभरानंतर होणार आहे. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजू की कमनशिबी, हे कळत नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून मला नक्की न्याय मिळेल, अशी आशा आहे. या प्रकरणाला आता जवळजवळ दोन वर्षे झाली असून, मी क्रिकेटला ‘मिस’ करीत आहे. पुढील सुनावणीदरम्यान निर्णय होईल आणि मला सामान्य जीवन जगता येईल, अशी आशा आहे.’’
श्रीसंत व चव्हाण यांना या प्रकरणात १० जून २०१३ रोजी जामीन मिळाला, तर चंदिलाने आणखी तीन महिने तुरुंगात घालविले. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर श्रीसंत विवाहबंधनात अडकला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्ण यांनी गेल्या २३ मे रोजी या प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी २९ जूनची तारीख दिली होती आणि आरोपींच्या वकिलांना ६ जूनपर्यंत लेखी युक्तिवाद देण्यास सांगितले होते. या प्रकरणात या तीन क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा सहकारी छोटा शकील यांच्यावरही आरोप आहेत. दिल्ली पोलीस विभागाच्या विशेष शाखेने आरोपपत्रात ४२ जणांना आरोपी केले होते. त्यांत ६ फरारी आरोपींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sreesanth, Ankit and Chandila's decision on the future of 25 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.