मरे, फेडरर, कर्बरची घोडदौड

By admin | Published: January 21, 2017 04:50 AM2017-01-21T04:50:35+5:302017-01-21T04:50:35+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू ब्रिटनच्या अँडी मरेने आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेत सहज विजयी कूच करताना सॅम क्वीरेला नमवले.

Murray, Federer, Kerr Hobbit | मरे, फेडरर, कर्बरची घोडदौड

मरे, फेडरर, कर्बरची घोडदौड

Next


मेलबर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू ब्रिटनच्या अँडी मरेने आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेत सहज विजयी कूच करताना सॅम क्वीरेला नमवले. रॉजर फेडररेन बर्डिचवर मात केली. त्याचवेळी महिला क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या एंजलिक कर्बरनेही आपल्या लौकिकानुसार बाजी मारताना सहजपणे पुढची फेरी गाठली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसाठी शुक्रवारचा दिवस संमिश्र यश देणारा ठरला. सानिया मिर्झाने महिला दुहेरीत तिसरी फेरी गाठली तर रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला.

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मरेने आक्रमक खेळ करताना क्वीरेचा दोन तासांमध्ये ६-४, ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. मरेने आपल्या सर्विसवर एकूण ७७ टक्के गुण मिळवताना वर्चस्व मिळवले. त्याचवेळी त्याला केवळ ३ वेळा ब्रेक पॉइंटचा सामना करावा लागला. पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीनंतरही मरेने याचा आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.
याआधी झालेल्या दुसऱ्या फेरीत आंद्रे रुबलेवविरुध्दच्या लढतीत मरेची टाच दुखावली गेली होती. पुढील फेरीत मरेपुढे मिश्चा ज्वेरेवचे आव्हान असेल. टिष्ट्वनिशियाच्या मालेक जाजिरीला धक्का देत ज्वेरेवने आगेकूच केली. विशेष म्हणजे, मरे - ज्वेरेव यांच्यातील विजेत्याची पुढील लढत रॉजर फेडररशी होईल.
आपल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारांच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॉजर फेडररनेही अंतिम सोळा जणांत स्थान पटकावले. त्याने थॉमस बर्डिचवर ६-२, ६-४, ६-४ अशी मात केली.
दुसरीकडे २०१४ साली या स्पर्धेत बाजी मारलेल्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाला विजयासाठी चार सेटपर्यंत झुंजावे लागले. व्हिक्टर ट्रोइकीविरुध्द झालेल्या रोमांचक सामन्यात पिछाडीवरुन बाजी मारताना वावरिंकाने ३-६, ६-२, ६-२, ७-६ असा झुंजार विजय मिळवला. पुढच्या फेरीत वावरिंकापुढे इटलीच्या आंद्रियास सेप्पीचे कडवे आव्हान असेल. सेप्पीने बेल्जियमच्या स्टीव डार्सिसला नमवून कूच केली. तसेच, विल्फ्रेड त्सोंगानेही चार सेटमध्ये झुंजार विजय मिळवताना अमेरिकेच्या जॅस सोकला नमवले.
महिला गटात संभाव्य विजेती कर्बरने आपला धडाका कायम राखताना एकतर्फी झालेल्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या ख्रिस्टिना प्लिसकोवाचा ६-०, ६-४ असा धुव्वा उडवला.
दुसरीकडे रशियाच्या स्वेतलाना कुजनेत्सोवाने अनुभवी खेळाडू येलेना यांकोविच विरुध्द ६-४, ५-७, ९-७ असा रोमांचक विजय मिळवताना दिमाखदार आगेकूच केली. त्याचप्रमाणे, अमेरिकेच्या बलाढ्य व्हिनस विलियम्सने चीनच्या दुआन यिंगयिंगचा ६-१, ६-० असा फडशा पाडून धमाकेदार विजय मिळवला. (वृत्तसंस्था)
>सानिया तिसऱ्या फेरीत, बोपन्ना ‘आऊट’
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंसाठी शुक्रवारचा दिवस संमिश्र यश देणारा ठरला. सानिया मिर्झाने महिला दुहेरीत तिसरी फेरी गाठली तर रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या मानांकित सानिया व चेक प्रजासत्ताकची बारबरा स्ट्रायकोव्हा यांनी आॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर व चीनची शुआई झांग यांचा ६-१, ६-४ ने पराभव केला. सिडनीमध्ये एपिया इंटरनॅशनलमध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीला जपानच्या एरी होजुमी व मियू कातो यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुरुष दुहेरीमध्ये बोपन्ना व उरुग्वेचा पाब्लो कुवास यांना दुसऱ्या फेरीत आॅस्ट्रेलियाच्या एलेक्स बोल्ट व ब्राडले मुसले या जोडीविरुद्ध ६-२, ६-७, ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. अनुभवी लिएंडर पेस व ब्राझीलचा आंद्रे सा यांच्या व्यतिरिक्त दिवीज शरण व पुरव राजा या जोडींना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.६-०, ६-४
कर्बरने आपला धडाका कायम राखताना एकतर्फी झालेल्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या ख्रिस्टिना प्लिसकोवा हिचा केवळ ५५ मिनिटांमध्ये ६-०, ६-४ असा धुव्वा उडवला.

Web Title: Murray, Federer, Kerr Hobbit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.