ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 19 - आयपीएल 10च्या पर्वातील दुस-या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विरोधात पहिल्यांदा फलंदाजी करणा-या कोलकातानं 18.5 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या आहेत. कोलकाताकडून सूर्यकुमार यानं 31 तर इशांक जग्गीनं 28 धावा बनवल्या आहेत. मुंबईकडून कर्ण शर्मानं 4 गडी, तर जसप्रीत बुमराहनं 3 बळी मिळवले आहेत. सहाव्या विकेटसाठी इशांक जग्गी आणि सूर्यकुमार यांनी 56 धावांची भागीदारी केली आहे.

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या कोलकाताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. कोलकातानं दुस-याच षटकात पहिला बळी गमावला आहे. बुमराहनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर ख्रिस लिन(4)ला घरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर मुंबईच्या कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेलनं यष्टिचीत करत सुनील नारायण(24)चा बळी मिळवला. मैदानावर आलेल्या उथप्पाला एक धावेवर समाधान मानून माघारी परतावं लागलं आहे. बुमराहनं रॉबिन उथप्पाला (1) पायचीत केलं.

सातव्या षटकांत मुंबईच्या कर्ण शर्मानं फिरकीच्या जोरावर दोन चेंडूंत दोन बळी घेऊन कोलकाताला नामोहरम केले. सातव्या षटकांत कर्णच्या गोलंदाजीवर गौतम गंभीर(12) हार्दिक पंड्याकरवी झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्ण शर्मानं कोलिन ग्रँडहोम याला शून्यावरच बाहेरचा रस्ता दाखवला. सहावा बळीही कर्ण शर्मानंच मिळवला. कर्णनं 15व्या षटकांत इशांक जग्गी(28)ला मिशेल जॉनसनकरवी झेलबाद केले. जग्गीनं 31 चेंडूंत 3 चौकार लगावले.