खो-खो : दोन्ही विभागांत श्री समर्थ संघ अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 07:20 PM2019-01-20T19:20:25+5:302019-01-20T19:20:49+5:30

महिलांमध्येही गतविजेत्या श्री समर्थाच्या महिलांनी सरस्वती कन्या संघावर निसटता विजय मिळवला.

Kho-Kho: Shree Samarth team in the final round | खो-खो : दोन्ही विभागांत श्री समर्थ संघ अंतिम फेरीत

खो-खो : दोन्ही विभागांत श्री समर्थ संघ अंतिम फेरीत

googlenewsNext

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने व अमर हिंद मंडळ, दादर आयोजित पुरुष-महिला व व्यावसायिक  जिल्हा अजिंक्य स्पर्धेत  पुरुष व महिला संघाचे अटीतटीचे उपांत्य फेरीचे सामने झाले. आज झालेल्या पुरुषांच्या सामन्यात गतविजेत्या ओम समर्थच्या संघाने यजमान अमर हिंद मंडळ, दादरच्या संघावर निसटता विजय नोंदवला तर श्री समर्थने गतउपविजेत्या   सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या   बलाढ्य संघावर अटीतटीच्या लढतीत  रोमहर्षक  विजयाची नोंद केली,  तर महिलांमध्येही गतविजेत्या श्री समर्थाच्या महिलांनी सरस्वती कन्या संघावर निसटता विजय मिळवला. 

 

आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या रोमहर्षक सामन्यात गतविजेत्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या संघाने यजमान अमरहिंद मंडळावर  निसटत्या  विजयाची नोंद केली.   (०५-०६-०९-०७)  १४-१३ असा एक गुण व ३० सेकंड राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मध्यंतराला अमरहिंद मंडळाच्या संघाने एका गुणाची  आघाडी घेतलेली होती. मात्र दुसऱ्या पाळीत ओम समर्थच्या आक्रमकांनी आपला खेळ उंचावत सामना आपल्याकडे झुकवला. दुसऱ्या डावातील अमरहिंदच्या किरण कर्णावार याच्यावर ओम समर्थाच्या प्रफुल तांबेने केलेल्या  अनपेक्षित हल्ल्याने व मारलेला सूराने सामना फिरला.  ओम समर्थतर्फे खेळताना शुभम शिगवण याने १:५०  मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक  बळी मिळवला,  तर प्रयाग कानगुटकर  याने २:२०, १:३० मिनिटे संरक्षण करताना दोन  बळी मिळवत तर आशुतोष शिंदे याने १:३०, १:२० मिनिटे संरक्षण करताना एक  बळी मिळवला तर मयूर भोईर याने तीन गाडी टिपून आपल्या खेळाची चमक दाखविली.   अमरहिंदच्या  प्रसाद राडीये २:२० नाबाद, २:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन  बळी मिळवत अष्टपैलू खेळ केला तर त्याला  आदेश कागडा  याने १:३० मिनिटे संरक्षण करताना तब्बल तीन  बळी मिळवत, किरण कर्णावार याने १:३०,  मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन  बळी मिळवले, तर अभिषेक कागडा   याने  २:१०, १:३० मिनिटे संरक्षण केले मात्र त्यांना  आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.

 

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या जादा डावा पर्यंत चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात  श्री समर्थ व्यायाम मंदिर दादरच्या संघाने गतउपविजेत्या  सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या संघाचा (०६-०८-०९-०७-०९-०७) २४-२२ असा दोन  गुणाने व ५० सेकंड राखून पराभव केला व  अंतिम  फेरीत प्रवेश निश्चित केला. मध्यंतराला सरस्वतीकडे दोन गुणांची  आघाडी घेतली होती मात्र  श्री समर्थच्या संघाने दुसऱ्या डावात उत्तम खेळ  करत सामना बरोबरीत आणला आणि मग जादा डावात दोन गुणांनी  विजयश्री खेचली. या सामन्यात जादा डावात श्री समर्थाच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या तेजस शिरसकर याने केलेली १:२० मिनिटांचे नाबाद संरक्षण तर जादा डावात सरस्वतीच्या रोहन टेमकर याची समर्थच्या विराज कोठाम्रकर याने  सूर मारून अनपेक्षित हल्यात मिळवलेला बळी सामना फिरवून गेला.   श्री समर्थच्या संघातर्फे खेळताना प्रणय मयेकर याने २:००, २:००, १:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन बळी मिळवले,  वेदांत देसाई याने १:४० मिनिटे संरक्षण केले व तीन गाडी मारले तर  सिध्वीक भगत  याने  आक्रमण करताना तब्बल चार  बळी मारले तर पीयूष घोलम यांने पाच गडी बाद केले तर तेजस शिरसकर याने १:२० मिनिटांचे नाबाद संरक्षण करत तीन गडी बाद केले.  सरस्वती तर्फे खेळताना श्रेयस राऊळ याने १:३०, १:२०, २:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार बळी मिळवले, श्रीकांत वल्लाकाठी  याने १:२०  मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन  बळी मिळवले,  प्रसाद पाठाडे  याने २:३०, २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक  बळी मिळवले, तर  रोहन टेमकर  याने २:००  मिनिटे संरक्षण केले व  आक्रमण करताना पाच  बळी मारले तर निखिल कांबळे याने तब्बल पाच गडी बाद केले मात्र त्यांना  आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.  

 

महिलांच्या आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत यजमान अटीतटीच्या लढतीत गतविजेत्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरच्या संघाने सरस्वती कन्याच्या महिला संघावर  (०५-०८-०६-०२) ११-१०७ असा अवघ्या एक गुणाने निसटता विजय हासील केला व अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. पहिल्या डावात श्री समर्थाची राष्ट्रीय खेळाडू साजल पाटील हि घसरून पडल्याने मध्यंतराला सरस्वती कडे तब्बल तीन गुणांची आघाडी होती मात्र दुसऱ्या डावात श्री समर्थने उत्तम संरक्षण करत बाजी पलटवली. श्री समर्थ तर्फे साजल पाटील ०:३०, ३:३० नाबाद संरक्षण केले व एक गडी बाद केला, अनुष्का प्रभू १:३०, ३:०० मिनिट्स व आक्रमणात दोन गडी तर भक्ती धंगडे २:००, २:३० व एक गडी तर प्राजक्ता ढोबळे हिने चार गडी बाद केले.    सरस्वतीच्या तर्फे खेळताना शिवानी परब २:५०, २:०० मिनिटे व एक गडी, सेजल यादव  हिने २:००, १:३०  मिनिटे संरक्षण केले तर नम्रता यादव  हिने २:१० संरक्षण केले व  आक्रमणात दोन गडी बाद केले  व चांगली लढत दिली.

 

महिलांच्या आज झालेल्या पहिल्या  सुमार उपांत्य लढतीत शिवनेरीच्या संघाने यजमान अमर हिंद मंडळ, दादर च्या महिला  संघावर  (०८-०३-०१-०५)  ०९-०८ असा एक गुण व सात मिनिटे राखून  दणदणीत विजय मिळवला.  शिवनेरी तर्फे खेळताना अक्षया गावडे हींने २:३०, १:५० मिनिटे नाबाद व आक्रमणात तीन गडी  मारत अष्टपैलू खेळ केला. तिला दर्शन सकपाळ हिने ३:०० ; २:१० व एक गडी तर प्रतीक्षा महाजन हिने आक्रमणात तीन गडी बाद करत उत्तम साथ दिली. अमरहिंदच्या संजना कुडव हिने २:५० मिनिटे संरक्षण केले तर मधुरा पेडणेकर हिने २:०० संरक्षण केले व  आक्रमणात एक गडी बाद केला तर तन्वी उपलकर हिने  २:३०, १:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन  बळी मिळवले   व चांगली लढत दिली.   

त्यामुळे आता अंतिम फेरीच्या लढती अश्या होतील पुरुष मध्ये ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर विरुद्ध  श्री समर्थ व्यायाम मंदिर अशी असेल तर महिलांच्या लढतीत श्री समर्थ व्यायाम मंदिर विरुद्ध   शिवनेरी सेवा मंडळ ह्यांची लढत  होईल. 

Web Title: Kho-Kho: Shree Samarth team in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो