खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा! पहिल्याच दिवशी झाल्या प्रेक्षणीय लढती, प्रेक्षकांसाठी ६ स्क्रिनची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 08:22 PM2024-03-09T20:22:58+5:302024-03-09T20:26:28+5:30

लातूरमधील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे.

Khashaba Jadhav State Level Wrestling Tournament Spectacular fights were held on the first day, 6 screens for the audience | खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा! पहिल्याच दिवशी झाल्या प्रेक्षणीय लढती, प्रेक्षकांसाठी ६ स्क्रिनची सोय

खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा! पहिल्याच दिवशी झाल्या प्रेक्षणीय लढती, प्रेक्षकांसाठी ६ स्क्रिनची सोय

उदगीर (लातूर): लातूरमधील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. लातूरचा आकाश गट्टे, अहमदनगरचा ओंकार रोडगे, कोल्हापूरचा रणजित पाटील व सोलापूरचा विशाल सुरवसे या मल्लांनी आपापल्या वजनी गटातील कुस्त्या जिंकून स्वर्गीय खाशाबा जाधव राजस्तरीय कुस्ती स्पर्धेत शनिवारचा उद्घाटनाचा दिवस गाजवला. उदगीर येथे शनिवारी या बहुचर्चित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला दिमाखदार वातावरणात प्रारंभ झाला.  उदगीर तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अहमदनगरचा ओंकार रोडगे आणि गौरव मोहिते यांच्यातील ५५ किलो गटातील लढतीने स्पर्धेची सलामी झडली. ओंकारने या एकतर्ळी लढतीत गौरवला १०-२ गुण फरकाने लोळविले. याच गटात कोल्हापूरच्या रणजित पाटीलने नाशिकच्या तुषार घारेचा १०-० गुण फरकाने धुव्वा उडवित रूबाबदार विजयारंभ केला. 

५७ किलो गटातील चूरशीच्या कुस्तीत सोलापूरच्या विशाल सुरवसेने कोल्हापूरच्या ओंकार पाटीलचा १२-९ गुणफरकाने पराभव केला. ओंकारने पहिल्या फेरीत ९-३ अशी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, विशालने दुसर्‍या फेरीत ९ गुणांची कमाई करीत बाजी मारली, हे विशेष. याच गटात लातूर येथील आकाश गट्टेने अहमदनगरच्या ओम वाघवर ६-० गुण फरकाने विजय मिळवित आगेकूच केली. 

कुस्त्या बघण्यासाठी ६ स्क्रिनची सोय
ही स्पर्धा बघण्यासाठी आलेल्या कुस्तीशौकिनांसाठी सुलभतेने कुस्त्या पाहता यावी यासाठी जवळपास ४००० प्रेक्षक बसतील अशी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर प्रेक्षकांना चालू असलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सहा मोठ्या स्क्रिनची सोयदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे उपस्थितीत कुस्तीप्रेमींना मोठा आनंद झाला.

Web Title: Khashaba Jadhav State Level Wrestling Tournament Spectacular fights were held on the first day, 6 screens for the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.