जिगरबाज युवराज !

By admin | Published: January 20, 2017 06:56 AM2017-01-20T06:56:46+5:302017-01-20T07:42:05+5:30

देश, काल आणि परिस्थिती यांच्यासमोर सर्वांनाच शरण जावे लागते.

Jigger Yuvraj! | जिगरबाज युवराज !

जिगरबाज युवराज !

Next

- बाळकृष्ण परब
देश, काल आणि परिस्थिती यांच्यासमोर सर्वांनाच शरण जावे लागते. त्यांच्यासमोर कुणीच टिकत नाहीत, असे म्हटले जाते. पण काही माणसं मात्र वेगळीच असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजबच रसायनाचा मिलाफ झालेला असतो, ज्याच्या जोरावर ही मंडळी आपल्यासमोरील परिस्थितीवर लिलया मात करतात. अशा मोजक्या जिगरबाज माणसांपैकी एक म्हणजे युवराज सिंग. काल इंग्लंडविरुद्ध कठीण परिस्थितीत केलेल्या झंझावाती खेळीनंतर युवी पुन्हा चर्चेत आलाय. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. युवीचा एकेकाळचा सहकारी आणि सध्याचा आघाडीचा समालोचक वीरेंद्र सेहवागच्या भाषेत सांगायचं तर जो कॅन्सरला हरवू शकतो, त्याच्यासमोर इंग्लंडचे गोलंदाज काय चिज! खरंच, युवीच्या या जिगरबाजपणाला दाद द्यावी तितकी थोडीच!
खरंच आहे ते, क्रिकेटपटू म्हणून युवराजने केलेली कामगिरी जेवढी कौतुकास्पद आहे, तेवढाच कदाचित त्याहून अधिक त्याने कॅन्सरशी दिलेला लढा लोकांसाठी प्रेरणादायी आहे. २०११ साली युवी विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. पण यशोशिखरावर असतानाच त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले. एखाद्यासाठी इथे सर्व काही संपले असते. कुणी आजारातून सावरले असते, पण खेळाच्या मैदानात परतण्याचा विचारच केला नसता, पण गंभीर आजार आणि वेदनादायी उपचार या सर्वांवर मात करून वर्षभरातच क्रिकेटच्या मैदानात उतरला होता.
खरंतर युवीचा जन्म एका क्रिकेटपटूच्या सुखवस्तू कुटुंबातला. पण त्याच्या जन्मानंतर काही वर्षांतच त्याची आई शबनम सिंग आणि वडील योगराज सिंग एकमेकांपासून वेगळे झाले. हा मानसिक आघात पेलून युवी लहानाचा मोठा झाला. दरम्यान, वडिलांच्या पावलावर पावले टाकत क्रिकेटच्या मैदानात आलेल्या युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्याआल्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण कामगिरीत सातत्य राखणे मात्र त्याला कधीच जमले नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच संघातून आत-बाहेर होणं, त्याच्या सवयीचे झाले. तरीही तो जेव्हा जेव्हा खेळला तेव्हा त्याची लढाऊ वृत्ती मात्र वेळोवेळी दिसून आली. मग ते २००२ साली झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने असोत वा त्याचवर्षी लॉर्डस् वर इंग्लंडविरुद्ध झालेली नॅटवेस्ट ट्रॉफीची
ऐतिहासिक फायनल असो, त्याने वेळोवेळी आपल्यातील लढावू वृत्तीचे दर्शन घडवले आहे.
भारतीय संघ अडचणीत असताना युवीची बॅट हमखास चालते. २००४ साली व्हीबी तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका लढतीत आघाडीचे रथी महारथी गडगडल्यावर युवीने १३९ धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. युवी कसोटी क्रिकेटमध्ये कधीच रुळला नाही. पण २००७ साली पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या कसोटीत त्याने १६९ धावांची खेळी करताना सौरव गांगुलीसोबत त्रिशतकी भागीदारी रचली होती.
मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगे घेणं आणि त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवणं यातही युवीचा हात कुणी धरू शकत नाही. ट्वेंटी-२० विश्वचषकात फ्लिंटॉफने पंगा घेतल्यावर युवीने स्टुअर्ट ब्रॉडला दिलेला मार इंग्रज अजूनही विसरले नसतील. २०११ च्या विश्वचषकातील त्याची कामगिरी तर बावनकशीच!
पण कॅन्सरमधून सावरल्यानंतर तो जुना युवी कुठेतरी हरवला. त्याने संघात पुनरागमन केले, पण जुना फॉर्म त्याला कधीच दाखवता आला नाही. त्यामुळे निवड समितीने वनडे संघासाठी त्याच्या नावाचा विचार करणे बंद केले. ट्वेंटी-२० तही त्याचा फॉर्म तितकासा चांगला नव्हता. २०१४ च्या विश्वचषकातील अंतिम लढतीत केलेल्या कासवछाप खेळीमुळे तो टीकेचा धनी झाला. संघातले स्थानही त्याला गमवावे लागले. पण त्यातून सावरत गतवर्षी युवीने पुन्हा ट्वेंटी-२० संघात पुनरागमन केले. यंदाच्या रणजी हंगामातही त्याने दणदणीत खेळी केल्या. त्याच्या जोरावर वनडे संघात स्थानही मिळवले. पण युवीच्या संघात झालेल्या निवडीवर टीकाही झाली. या मालिकेत अपयशी ठरला असता तर त्याच्या संघातील निवडीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असते. साहजिकच युवीवर दबाव होता. पण अशा परिस्थितीतही त्याने काल दबाव झुगारून खेळ केला. संघ संकटात असताना जिगरबाज खेळाचे प्रदर्शन घडवले. भारतीय फलंदाजांना जखडण्यासाठी इंग्लिश गोलंदाजांकडून शॉर्ट चेंडूंचा मुक्तहस्ते मारा झाला. पण फॉर्मात आलेल्या युवीसमोर त्यांची ही रणनीती अगदीच 'शॉर्ट' ठरली. या खेळीमध्ये त्याने कट आणि पुलचे जे जबरदस्त फटके मारले, ते पाहून सात आठ वर्षांपूर्वीच्या युवीची आठवण ताजी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण तंदुरुस्त आणि परिपक्व युवी काल पाहायला मिळाला. त्यामुळे पुढच्या काही काळात त्याच्या बॅटकडून अशाच धमाकेदार खेळींची अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. 

Web Title: Jigger Yuvraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.