जयपूर कबड्डी चॅम्पियन

By admin | Published: September 1, 2014 04:24 AM2014-09-01T04:24:47+5:302014-09-01T04:24:47+5:30

२००८ साली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या नव्या अध्यायाच्या जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला होता आणि रविवारी प्रो कबड्डी लीगचा पहिला मान राजस्थानची राजधानी जयपूरने पटकावला

Jaipur Kabaddi champion | जयपूर कबड्डी चॅम्पियन

जयपूर कबड्डी चॅम्पियन

Next

स्वदेश घाणेकर, मुंबई
कबड्डीतही असे होऊ शकते.... आपला मऱ्हाटमोळा खेळ जागतिक स्थरावर गेला खरा, परंतु तो प्रसिद्धीपासून नेहमी अलिप्त राहिला... मात्र प्रो कबड्डी लीगने या खेळाला संजीवनी दिली.... याला केवळ योगायोगच म्हणावे लागेल... २००८ साली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या नव्या अध्यायाच्या जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला होता आणि रविवारी प्रो कबड्डी लीगचा पहिला मान राजस्थानची राजधानी जयपूरने पटकावला. बॉलिवुड स्टार अभिषेक बच्चन याच्या जयपूर पिंक पँथर्स संघाने यजमान यू मुंबावर ३५-२४ असा एकहाती विजय मिळवला.
यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील अंतिम लढत पाहण्यासाठी मुंबईचे एनएससीआय स्टेडियम खचा खच भरले होते. याच उभय संघांनी या नव्या अध्यायाचा श्री गणेशा केला होता, परंतु त्या लढतीत मुंबाने सलामी दिली आणि रविवारी समारोपाच्या लढतीत पँथर्संनी त्याची सव्याज परतफेड केली. यू मुंबा.... यू मुंबा... यू मुंबा अशा जयघोषाने स्टेडियम दणाणले होते... जणू त्यांनी मुंबईला जेतेपद बहालचे केले होते. मात्र, पँथर्सला उशिरा सापडलेली लय अखेरच्या लढतीपर्यंत कायम होती.
मनिंदर सिंह याने पहिल्याच चढाईत त्याची प्रचिती दिली. मात्र मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने त्याला उत्तर दिले. अनुपने दुसऱ्या चढाईत पँथर्सचा कर्णधार नवनीत गौतम, राजेश नरवाल आणि प्रशांत चव्हाण या हुकमी एक्क्यांना बाद करून मुंबईला आघाडी मिळवून दिली. चौथ्या मिनिटात ४-२ अशा आघाडीवर असलेल्या मुंबाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले, परंतु मनिंदर सिंह याने एका चढाईत मुंबाचे दोन गडी टिपून सामना ४-४ असा बरोबरीत आणला. दोन्ही संघ तुल्यबळ खेळ करत होते. सामन्यात चुरस पाहायला मिळणार हे निश्चित असल्याने प्रेक्षकांमधला जल्लोष ओसंडून वाहत होता. पहिल्या हाफमध्ये जयपूरने १८-१४ अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या हाफमध्ये मैदानावर त्यांचे केवळ ४ खेळाडूच उपस्थित असल्याने मुंबाकडे लोन चढवण्याची संधी होती, परंतु जयपूरने आखलेल्या योजनेसमोर त्यांला यातही अपयश आले. जयपूरने दमदार खेळ करत हळूहळु सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. ३०व्या मिनिटाला त्यांनी पुन्हा एक लोन चढवून २७-१५ अशी आघाडी घेत विजय जवळपास पक्का केला. त्यानंतर मुंबईचे मनोबल खचले... जयपूरने ही लढत ३५-२२ अशी जिंकून प्रो कबड्डीच्या जेतेपदाचा मान आपल्या पारड्यात पाडला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पटना पाइरेटस् संघाने
बेंगलूर बुल्सवर ७ गुणांनी विजय मिळविला.

Web Title: Jaipur Kabaddi champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.