चॅपेल म्हणतात ‘बकवास’

By admin | Published: November 5, 2014 12:31 AM2014-11-05T00:31:17+5:302014-11-05T00:31:17+5:30

सचिनने पुस्तकात म्हटले आहे की, ‘चॅपेलची द्रविडचा आदर न करण्याची वृत्ती आश्चर्यचकित करणारी होती. सचिनने २००५ ते २००७ या कालावधीत राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकप

Chappell says 'nonsense' | चॅपेल म्हणतात ‘बकवास’

चॅपेल म्हणतात ‘बकवास’

Next

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरने ‘प्लेर्इंग इट माय वे’ या आत्मचरित्रामध्ये तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर टीका केली आहे. सचिनचे संघसहकारी झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी सचिनचे समर्थन केले तर ग्रेग चॅपेल यांनी
राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याच्या प्रयत्नाबाबतचा दावा फेटाळून लावला. सचिनच्या या आत्मचरित्राचे गुरुवारी प्रकाशन
होणार आहे.
तेंडुलकरने स्पष्ट केले की, ‘चॅपेलने विश्वकप २००७ च्या काही महिन्यांपूर्वी द्रविडच्या स्थानी त्याला कर्णधार करण्याचा प्रयत्न केला.’ चॅपेल यांनी मात्र या विषयावर सचिनसोबत कधीच चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे.
चॅपेल म्हणाले, ‘मी शाब्दिक युद्धात उडी घेण्यास इच्छुक नाही, पण मी भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना द्रविडच्या स्थानी सचिनने कर्णधारपद स्वीकारावे, याबाबत कधीच विचार केला नाही. त्यामुळे आत्मचरित्रातील या दाव्याचे आश्चर्य वाटले. त्या कालावधीत मी केवळ एकदा सचिनच्या निवासस्थानी गेलो होते. सचिन दुखापतीतून सावरत असताना फिजिओ व सहायक प्रशिक्षकाच्या साथीने सचिनच्या घरी गेलो होतो. पुस्तकामध्ये करण्यात आलेल्या दाव्याच्या किमान वर्षभरापूर्वी मी सचिनच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मी सचिनच्या घरी आल्हाददायक सायंकाळचा आनंद घेतला. त्यावेळी कर्णधारपदाच्या मुद्यावर कधीच चर्चा झाली नाही.’
सचिनने पुस्तकात म्हटले आहे की, ‘चॅपेलची द्रविडचा आदर न करण्याची वृत्ती आश्चर्यचकित करणारी होती. सचिनने २००५ ते २००७ या कालावधीत राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणाऱ्या चॅपेल यांच्यावर टीका करताना त्यांना ‘रिंगमास्टर’ म्हटले आहे. चॅपेल आपले मत खेळाडूंवर लादत होते. आपला निर्णय खेळाडूंना मान्य आहे किंवा नाही, याचा ते कधीच विचार करीत नव्हते’, असेही सचिनने म्हटले आहे.
झहीर व हरभजन यांनी मात्र सचिनचे समर्थन केले आहे. चॅपेलच्या ‘हुकूमशाही’चा आम्हाला फटका बसल्याचे झहीर व हरभजनने म्हटले आहे.
झहीरने दावा केला की,‘चॅपेलने त्याचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.’ हरभजनने म्हटले की,‘चॅपेल यांनी भारतीय क्रिकेटला रसातळाला नेले आणि सिनिअर खेळाडूंना टार्गेट केले.’
१४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३११ कसोटी व २८२ वन-डे क्रिकेट घेणारा झहीर पुढे म्हणाला, ‘चॅपेल यांचा स्वतंत्र अजेंडा होता, याची मला कल्पना होती. त्यांच्या काही योजना होत्या आणि तुम्ही जर योजनेचा भाग नसेल तर दुसरा मार्ग निवडण्यासाठी तुम्हाला तयार असावे लागत होते. चॅपेलने माझी कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला, पण २००६ च्या अखेर दक्षिण आफ्रिकेमध्ये मी अधिक दमदार पुनरागमन केले.’
झहीर पुढे म्हणाला, ‘संघातील सिनिअर खेळाडूंची त्याला अडचण भासत होती. मी संघातून जवळजवळ वर्षभर बाहेर होतो. त्यावेळी त्यांनी माझे संघातील पुनरागमन रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी माझ्या पुनरागमनाबाबत चर्चा होत होती, त्यावेळी चॅपेल कुठले ना कुठले कारण पुढे करीत तीन-चार महिन्यांसाठी टाळत होते, असे मला नंतर कळले.’
हरभजननेही सचिनचे समर्थन केले आणि काही खेळाडू चॅपेल यांना चुकीची माहिती देत होते, असेही सांगितले.
हरभजनने असा दावा केला आहे की, ‘ज्यावेळी भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध बुलावयोमध्ये कसोटी सामना खेळत होता त्यावेळी चॅपेल यांनी तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीबाबत बीसीसीआयला ईमेल पाठविला होता. सौरव फलंदाजी करीत होता आणि चॅपेल ड्रेसिंग रुममध्ये बसून सौरववर टीका करणारा ईमेल टाईप करीत होते. त्यांना सामन्यामध्ये काही स्वारस्य नव्हते.’
भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांधिक बळी घेणाऱ्या
गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला हरभजन पुढे म्हणाला, ‘एकूण सात खेळाडूंना ते बदलविण्यास इच्छुक होते. सौरव त्यांचे मुख्य टार्गेट होता. त्यानंतर माझा नंबर होता. त्याचप्रमाणे वीरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा, झहीर खान आणि युवराज सिंग यांचा क्रमांक होता.’
मणिंदर सिंग आणि कीर्ती आझाद यांच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंनीही चॅपेल यांच्यावर टीका केली. चॅपेल यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट रसातळाला गेले, असेही या खेळाडूंनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Chappell says 'nonsense'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.