नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणात क्रीडा उपसंचालक पदावर असलेल्या शिवदत्त बक्षी याला एक लाखाची लाच स्वीकारल्याबद्दल सीबीआय पथकाने अटक केली.
कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये अत्याधुनिक साहित्य आणि आयात बंदूक एका पत्रकाराला बेकायदेशीररीत्या पुरविल्याप्रकरणी सीबीआयने बक्षी याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून एक लाख रोख आणि मद्याची बाटली देखील ताब्यात घेण्यात आली. बक्षी हा कर्णिसिंग रेंजमध्ये प्रशासक होता. १७ जुलै रोजी करण्यात आलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये बक्षी याने हा प्रकार केल्याचे वृत्त हिंदी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर साईच्या मुख्य दक्षता अधिकाºयाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या टेपमध्ये बक्षी हा पत्रकाराला आधुनिक वॉल्थर रायफल देताना दिसत आहे. पत्रकाराकडे कुठलाही शस्त्रपरवाना नव्हता हे विशेष. बक्षी हा त्या पत्रकाराला अवैधरीत्या शस्त्र आणि इतर क्रीडा साहित्य पुरवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सीबीआय पथकाने बक्षी याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.(वृत्तसंस्था)