जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:43 AM2017-07-18T02:43:11+5:302017-07-18T02:43:11+5:30

पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेल्या २९ महसुली गावातील एकूण ५१ जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव

Zilla School schools have been transferred | जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण रखडले

जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण रखडले

Next

- अरुणकुमार मेहत्रे । लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेल्या २९ महसुली गावातील एकूण ५१ जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव पडून आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा हजार विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच पावणेतीनशे शिक्षक संभ्रमात आहेत. या सर्व शाळा महापालिकेकडे वर्ग होणार आहेत, परंतु या कार्यवाहीला किती वेळ लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेत वर्ग झाल्यावर शाळांना अतिरिक्त निधी तसेच उत्तम पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
गतवर्षी १ आॅक्टोबर रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर सिडको, ग्रामपंचायतीच्या ताब्यातील वसाहती हस्तांतरित करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. त्याशिवाय ग्रामपंचायती बरखास्त करून त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून कामकाज सुरू करण्यात आले.
पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २९ गावांमधील आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून त्याचेही महापालिकेकडे हस्तांतरण होणे अपेक्षित आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली होत नसल्याने शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकवर्ग संभ्रमात आहेत.
पनवेल नगरपालिकेच्या एकूण अकरा शाळा होत्या ज्या महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. शाळा हस्तांतरणाबाबत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिका स्थापनेच्या सुरुवातीलाच तालुका गटशिक्षण कार्यालयाकडून याबाबत माहिती मागितली होती. तसेच या विषयी अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली होती. शिक्षण विभागाने शाळांची संख्या विद्यार्थी व शिक्षकांची आकडेवारी लेखी स्वरूपात महापालिकेला दिली होती. परंतु त्यानंतरही अद्याप शाळा हस्तांतरणाबाबत हालचाली दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

काही काळ जिल्हा परिषदेतच शाळांचा समावेश
पनवेल महापालिका क्षेत्रात येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे त्वरित वर्ग होणे सध्या तरी शक्य नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडे पुरेसा निधी नाही. तसेच शाळांकडूनही कोणत्याही स्वरूपात उत्पन्न मिळणार नसून उलट शिक्षकांचे वेतन व इतर गोष्टींवर मोठा खर्च करावा लागणार आहे. ही बाब महापालिका प्रशासनाला आजघडीला शक्य नाही. त्यामुळे काही काळासाठी या शाळा रायगड जिल्हा परिषदेकडेच ठेवाव्या लागणार आहेत.

पनवेल महापालिकेकडून सुरुवातीला आमच्याकडे माहिती मागितली होती. त्यानुसार त्यांच्या हद्दीत येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची आकेडवारी व इतर माहिती त्यांना सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाकडून आमच्या कार्यालयाकडे कोणताही पत्रव्यवहार झाला नाही किंवा विचारणाही झालेली नाही.
- नवनाथ साबळे,
गटशिक्षण अधिकारी,
पनवेल तालुका

Web Title: Zilla School schools have been transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.