नवी मुंबई : काँग्रेसचे परिवहन सदस्य सुधीर पवार व इतर दोघांवर १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मनपा शाळेत शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराने ही तक्रार दाखल केली आहे. या तिघांनी खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये केला असून, या घटनेमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुधीर पवार यांच्यासह रवि मदन व संतोष काळे यांचा समावेश आहे. कोपरखैरणेमध्ये राहणारे जयंतीलाल लक्ष्मणभाई राठोड यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे त्यांचे वाशी सेक्टर १०, १७ व ६मध्ये मंगलदीप, रेड विंग व रेनबो अशी तीन कपड्यांची शोरूम आहेत. २००४ पासून ते महापालिकेच्या शाळेमध्ये गणवेश पुरविण्याचा ठेका घेत आहेत. जुलै २०१६मध्ये महापालिकेने २०१६- १७ व २०१७-१८ या वर्षाकरिता शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. राठोड यांच्या रेडस्टार कंपनीला हे काम मिळाले होते. नोव्हेंबर २०१६मध्ये रवि मदन व संतोष काळे यांनी शिक्षण मंडळ परिसरामध्ये भेटून आम्हाला सुधीर पवार यांनी पाठविले असून, तुम्ही सदरचे टेंडर हे कायदेशीर बाबींची पूर्तता न करता प्राप्त केले आहे. आमच्या सोबत पैसे देऊन तडजोड करा, अन्यथा आम्ही तुम्हाला व तुमच्या परिवाराला संपवून टाकू, अशी धमकी दिली. पुढचे काम व्यवस्थित चालू ठेवायचे असल्यास त्याची सुरुवात म्हणून पन्नास हजार रुपयांची मागणी केली व मदन यांच्याकडे ती रक्कम दिल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये केला आहे.
तक्रारीमधील उल्लेखाप्रमाणे डिसेंबर २०१६च्या शेवटच्या आठवड्यामध्ये राठोड यांच्या मोबाइलवर संपर्क साधून त्रास देण्यास सुरुवात केली. मदन यांनी मंगलदीप शॉप दुकानामध्ये येऊन अनावश्यक प्रश्न उपस्थित करून त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मदन व काळे यांनी मनपा मुख्यालयात भेटून तुमची कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकू, तुम्हाला कोर्टात खेचू, अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी जयंतीलाल राठोड यांचा मुलगा दिनेशला फोन करून हे प्रकरण मिटवून घ्या, नाहीतर तुला किंवा तुझ्या परिवारातील सदस्यांना जीवे ठार मारू व त्याला अपघाताचे स्वरूप देऊ, तुमच्या विरुद्ध चुकीचे गुन्हे दाखल करू, पोलीस आमचे काहीच करू शकत नाहीत, अशी धमकी दिली. जानेवारी २०१७मध्ये वाशीतील नवरत्न हॉटेलमध्ये भेटून दीड कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर १० जानेवारीलाही पैशांसाठी संपर्क केला. नोव्हेंबर २०१६ ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान वारंवार संपर्क साधून १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राठोड यांनी तक्रार केली. या तक्रारीआधारे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल संभाषण उपलब्ध
जयंतीलाल लक्ष्मण राठोड याने तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करताना दिलेल्या तक्रारीमध्ये नोव्हेंबर २०१६पासून तक्रार दाखल करेपर्यंतच्या घटनाक्रमाचा उल्लेख केला आहे. रवि मदन, संतोष काळे व इतरांशी वेळोवेळी झालेल्या मोबाइल संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचा उल्लेख केला आहे. मदन व काळे यांनी पैसे मागितल्याचे या संभाषणामध्ये असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. याविषयी संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासासाठी पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

राठोड याच्याकडे आम्ही खंडणी मागितलेली नाही. त्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. त्याने खोटी कागदपत्रे दाखवून महापालिकेचे कंत्राट मिळविले होते. माहिती अधिकाराचा वापर करून त्याने सादर केलेली कागदपत्रे आम्ही मिळविली असून, त्याच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामुळेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- संतोष काळे

मी दिल्लीला असून दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी काहीही माहिती नाही. जयंतीलाल राठोड माझ्या घरी यापूर्वी मदत मागण्यासाठी आले होते. मी त्यांना त्यांच्या प्रकरणामध्ये मदत केली होती; परंतु नंतर त्यांनी मलाच त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे मे २०१७मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्याकडे खंडणी मागण्याचा प्रश्नच येत नाही.
- रवि मदन

माझ्याविरूद्ध षडयंत्र
- पवार
या प्रकरणी माहिती घेण्यासाठी काँगे्रसचे परिवहन सदस्य सुधीर पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी माझा काहीही संबंध नाही. जयंतीलाल राठोड या व्यक्तीला मी कधीही भेटलेलो नाही. राठोडने बोगस अनुभवाचे दाखले आणि खोटी प्रमाणपत्रे दाखल करून मनपा शिक्षण मंडळामधून करोडो रूपये लाटले आहेत. त्याविरोधात मी तक्रारी करूनदेखील प्रशासनाने कानाडोळा केल्याने टेक्सास लेदर्स प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांनी या तोतया कंत्राटदारांविरूद्ध उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. टेक्सास लेदर्सचे संचालक संतोष काळे यांचा मी शिक्षण विभागात केलेल्या तक्रारी निमित्ताने परिचय असल्याने सदर कुणीतरी राठोड नामक व्यक्तीने स्वत:ची बोगस डॉक्युमेंट प्रकरणातून सुटका होण्यासाठी हे कुंभाड रचले आहे. विनाकारण प्रकरणामध्ये मला गोवण्याचा प्रयत्न केला आहे. मी कायद्याचे पालन करणारा जबाबदार व्यक्ती असून कोणतेही कृत्य माझ्याकडून घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.