तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:08 AM2018-02-03T07:08:37+5:302018-02-03T07:08:48+5:30

शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

 Swimming With eight years of paperwork, Navi Mumbai Municipal Depression | तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.
सिडकोने २००९ साली वाशी सेक्टर १२ येथील १९६ क्रमांकाचा सुमारे चार हजार चौ.मी.चा भूखंड जलतरण तलावासाठी पालिकेकडे हस्तांतर केला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणतलाव उभारण्याच्या हालचाली पालिकेने चालवल्या होत्या. त्याकरिता २०११च्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आठ वर्षांनंतरही तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही.
जागतिक स्तरावर महापालिकेचे नाव उंचावणारे जलतरणपटू शहरात राहायला आहेत. त्यांची सरावासाठी दर्जेदार तरणतलाव नसल्याने गैरसोय होत असून आर्थिक फटकाही बसत आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या जलतरणपटूंमध्ये सुरभी टिपरे, लेखा कामत, ज्योत्सना पानसरे, विराज प्रभू, नचिकेत वाघमारे, शुभम वनमाळी आदींचा समावेश आहे. त्यांनी आशियाई तसेच राष्टÑकुल स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत; परंतु अपेक्षित यश गाठण्यासाठी त्यांना सरावाकरिता आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरण तलावाची आवश्यकता आहे, असा तलाव व चांगले प्रशिक्षक शहरात नसल्याने अवघ्या काही तासांच्या सरावाकरिता त्यांना मुंबई, पुणे अथवा बंगळुरूला जावे लागत आहे. त्यापैकी बहुतांश जलतरणपटू पुण्यातील बालेवाडी येथे जातात. यामध्ये प्रवासातच जास्त वेळ जातो.
शहरात काही खासगी क्रीडा संस्थांचे तरणतलाव असून, त्यांची लांबी २५ मीटरची व शुल्कही अधिक आहे; परंतु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा ५० मीटर लांबीच्या तरणतलावात होतात. यामुळे स्पर्धकांना सरावासाठी तेवढ्याच लांबीचा तरणतलाव आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात खासगी व पालिकेचे तरणतलाव आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवणारे सर्वाधिक जलतरणपटू नवी मुंबईत असतानाही, त्यांना पालिकेच्या तरणतलावाची प्रतीक्षा करावी लागत आहे. २०१३मध्ये तलावाच्या कामाची काढलेली सुमारे ४० कोटींच्या कामाची निविदा अतिक्रमणामुळे रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. तलावासाठी राखीव भूखंडावरील शिवसेनेच्या अनधिकृत शाखेमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.

महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्याकरिता दर्जेदार शिक्षणाबरोबरच उत्तम खेळाडू घडवण्यावरही भर दिला जातो; परंतु स्वत:चे जलतरण तलाव नसल्याने पालिकेतर्फे होणाºया जलतरण स्पर्धाही खासगी तलावांमध्ये घ्याव्या लागतात, ही शोकांतिका आहे.

तरणतलावासाठी भूखंड राखीव असतानाही त्यावरील अतिक्रमण हटवून प्रत्यक्षात कामाला वेळीच सुरुवात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव दिसून येत आहे. परिणामी, शहरातील राष्टÑीय, आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरणपटूंची गैरसोय होत असून, त्यांच्या यशाच्या मार्गात अनधिकृत बांधकामाचा अडथळा निर्माण झाला आहे.

नवी मुंबईत ५० मीटर लांबीचा तलाव नसल्याने सरावासाठी मुंबईत जावे लागते. प्रवासातच वेळ जात असून, सरावादरम्यान थकवाही जाणवतो. पालिकेने सरावासाठी दर्जात्मक तरणतलाव उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
- जोत्सना पानसरे,
आंतरराष्टÑीय जलतरणपटू
अनधिकृत शाखेमुळे गेली अनेक वर्षे तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तसेच वेळेत कामाला सुरुवात न झाल्याने काढलेली निविदाही रद्द करावी लागली आहे; परंतु लवकरच एनएमएमटी डेपो व जलतरण तलाव यांचा एकत्रित आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाईल.
- मोहन डगावकर,
शहर अभियंता-न.मु.म.पा.

Web Title:  Swimming With eight years of paperwork, Navi Mumbai Municipal Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.