धुवाधार पावसात रविवारची धम्माल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:00 AM2018-06-25T02:00:14+5:302018-06-25T02:00:16+5:30

पावसाने सलग दुसऱ्या रविवारी हजेरी लावून निसर्गप्रेमींच्या उत्साहात भर टाकली आहे. नवी मुंबईत दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे

Sunday's rains in the rainy season | धुवाधार पावसात रविवारची धम्माल'

धुवाधार पावसात रविवारची धम्माल'

Next

नवी मुंबई : पावसाने सलग दुसऱ्या रविवारी हजेरी लावून निसर्गप्रेमींच्या उत्साहात भर टाकली आहे. नवी मुंबईत दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर मोरबे परिसरातही कोसळणाºया पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
शनिवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात सुरू झालेला पाऊस रविवारी रात्रीपर्यंत सुरू होता. यामुळे निसर्गप्रेमींचा रविवारच्या सुट्टीचा दिवस पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यात गेला. नवी मुंबईत रविवारी दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बेलापूर विभागात ३५ मि.मी., नेरुळ विभागात ३८.४ मि.मी., वाशी विभागात ४०.२ मि.मी. तर ऐरोली विभागात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस पडला. मात्र दिवसभर पाऊस कोसळत असताना वारे नसल्याने वृक्ष कोसळल्याची अथवा इतर कोणती दुर्घटना घडल्याचा गंभीर प्रकार घडला नाही, तर अपवादात्मक ठिकाणे वगळता कुठेही पाणी तुंबल्याचाही प्रकार घडला नाही.
मोरबे धरण परिसरातही अद्यापपर्यंत एकूण ४५३. ६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून ७६ मीटर झाली आहे. मात्र धरणातील पाण्याची क्षमता ८८ मीटरपर्यंतची असल्याने ते भरून वाहण्यासाठी परिसरात अद्यापही अधिक पावसाची आवश्यकता आहे.

दिवसाची सुरवातच ढगाळ वातावरणामुळे झाल्याने अनेकांनी सकाळीच पावसाळी सहलीचा बेत आखून छोट्या-मोठ्या ठिकाणांकडे धाव घेतली. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे. याकरिता त्याठिकाणी पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
यामुळे काहींनी घराच्या आवारातच पावसात भिजून आनंद घेतला. त्यात लहान मुला-मुलींसह तरुणांचाही उत्साह दिसून आला. नवी मुंबईसह लगतच्या मुंबई, ठाणे परिसरातही दिवसभर पाऊस होता. यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर
पडलेल्यांची मात्र दैना होवून, ओलेचिंब
होवूनच त्यांना प्रवास करावा लागला.

रविवारी सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. अनेक भागातील बैठ्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. नोसिल नाका येथील झोपडपट्टी जलमय झाली होती, तर घणसोली गवळीदेव डोंगर परिसरात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या परिस्थितीत पालिकेच्या आपत्कालीन विभागाची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
वादळी पावसाने आज सकाळपासून दिवसभर थैमान घातले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ऐरोली सेक्टर २0 येथील स्मशानभूमीलगतचे गटार, दिघा बिंदुमाधव नगरातील मुकुंद कंपनीकडून आलेला नाला भरून ओसंडून वाहत होता. रबाले, कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वे स्थानकाच्या पादचारी आणि वाहतूक भुयारी मार्गात पाणी साचल्याने पादचाºयांचे आणि वाहनधारकांचे हाल झाले. घणसोली गावातील गुनाले तलाव आणि छत्रपती शिवाजी महाराज तलाव भरल्याने त्यातील पाणी रस्त्यावर आले होते. घणसोली गावात ताराई नगरात सखल भागात पाणी साचले होते. ऐरोली सेक्टर ३ येथील बस स्थानकात सुमारे एक ते दीड फूट पाणी साचले होते. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-नेरूळ, ठाणे-पनवेल आणि वाशी-ठाणे लोकलचे वेळापत्रक काहीसे कोलमडले.


पावसाचा जोर वाढल्याने सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला फटका बसला आहे. कळंबोली, खारघर, हिरानंदानी, बेलपाडा, उरण फाटा या ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे कोपरा उड्डाणपूल, कळंबोली, कामोठे बस थांबा, बेलपाडा आदी ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.

Web Title: Sunday's rains in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.