कळंबोली : नवीन पनवेल सेक्टर ७ मधील खेळाच्या मैदानावर सेंट जोसेफ हायस्कूलने एक प्रकारे कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतरही हे मैदान स्थानिक मुलांना खेळण्याकरिता खुले करून दिले जात नाही. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता सिडको योग्य उत्तर देत नसल्याने याविरोधात राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे स्थानिक रहिवासी आनंद भंडारी यांनी सांगितले.
सिडकोने शैक्षणिक संकुलांना भूखंड देत असताना त्यांना बाजूला खेळाचे मैदानही उपलब्ध करून देण्यात आले. शाळेच्या कालावधीत ते क्रीडांगण म्हणून विद्यार्थ्यांकरिता वापरायचे आणि त्यानंतर स्थानिक मुलांकरिता ते खुले करून देण्याची अट सिडकोने त्यावेळीच घातलेली आहे. परंतु बहुतांशी शाळांनी अटी शर्ती पालन न करता अशा मैदानावर एक प्रकारे कब्जा केला आहे. नवीन पनवेल सेक्टर ७ मध्ये सेंट जोसेफ हायस्कूल आहे. या शाळेने सुध्दा बाजूच्या प्ले ग्राऊंडमध्ये भिंत टाकून बंदिस्त केले आहे. त्याचबरोबर गेट बांधून त्याला टाळा ठोकला आहे. स्थानिक मुलांना शाळा सुटल्यानंतही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही.
सिडकोने प्लॅनमध्ये हे प्ले ग्राऊंड दाखविण्यात आले आहे. परंतु त्याचा सेक्टर ७मधील रहिवाशांना कोणताच फायदा नाही. याबाबत स्थानिक रहिवासी आनंद भंडारी यांनी माहिती अधिकारांतर्गत सिडकोकडे अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांनी हा भूखंड आहे तो कोणाच्या मालकीचा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी संरक्षक भिंत कोणी बांधली आहे. या व्यतिरिक्त मुलांना खेळण्याकरिता या सेक्टरमध्ये कुठे कुठे भूखंड शिल्लक आहेत ही माहिती मागितली होती. परंतु सिडकोने या सर्व प्रश्नांची उत्तरे टाळत फक्त कंपाउंड सिडकोने बांधले नाही इतकेच उत्तर दिले आहे. १ नोव्हेंबर रोजी जी.एस. देशपांडे आणि १० आॅक्टोबर रोजी विद्या रोकडे या दोनही सहायक कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाºयांनी एकच उत्तर दिले आहे. त्यामुळे बाकीचे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. याबाबत अर्जदाराने संबंधित कार्यालयात जावून विचारणा केली असता या विषयी सेंट जोसेफ हायस्कूलकडे विचारणा करा असे सांगितले. एकंदरीत सिडको खरी माहिती टाळत आहेच, त्याचबरोबर संबंधित शाळा व्यवस्थापनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या संदर्भात सहायक कार्यकारी अभियंता विद्या रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.