सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम; सार्वजनिक वाहतूक यंत्रणाही कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 11:32 PM2019-07-01T23:32:02+5:302019-07-01T23:52:32+5:30

सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईमधील जनजीवन विस्कळीत झाले. सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

 Rains for the fourth consecutive day; The public transport system collapsed | सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम; सार्वजनिक वाहतूक यंत्रणाही कोलमडली

सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम; सार्वजनिक वाहतूक यंत्रणाही कोलमडली

Next

नवी मुंबई : सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईमधील जनजीवन विस्कळीत झाले. सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. कोकण भवन इमारतीच्या तळमजल्यात पाणी शिरल्यामुळे काही कार्यालयांमधील कागदपत्रेही भिजली. येथील कामकाजही ठप्प झाले होते.
नवी मुंबईमध्ये २८ जूनपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मोसमामध्ये आतापर्यंत ८१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सायन - पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे दोन फूट पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. उरण फाट्यापासून नेरूळपर्यंत रांगा लागल्या होत्या. सीबीडीजवळ रोडवर खड्डे पडले असल्यामुळे पुणे व मुंबई दोन्ही बाजूकडे जाणाºया मार्गिकेवर वाहतूककोंडी झाली होती. नागरिकांच्या सुविधेसाठी शिरवणे, नेरूळ व इतर ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले आहेत. फिफा वर्ल्डकपच्या दरम्यान महानगरपालिकेने स्वत:च्या खर्चाने या मार्गांचे नूतनीकरण केले असून त्यामध्येही पाणी भरले आहे. भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहे. कोपरखैरणेसह शहरातील इतर भुयारी मार्गांमध्येही पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत होता.
पावसाचा सर्वाधिक फटका कोकण भवन इमारतीला बसला आहे. इमारतीच्या परिसरामध्ये दोन फूटपेक्षा जास्त पाणी साचले होते. तळमजल्यावरील जात पडताळणी कार्यालय, पोस्ट आॅफिस, उपाहारगृह, कोषागार कार्यालयामध्येही पाणी शिरले होते. वाहतूक पोलिसांच्या कार्यालयामध्येही पाणी गेले होते. इमारतीमध्येही पाणी शिरू लागल्यामुळे सुरक्षिततेसाठी येथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. संपूर्ण इमारतीमध्ये अंधार असल्यामुळे दिवसभर येथील कामकाज ठप्प झाले होते. येथे कामानिमित्त गेलेल्या नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पावसामुळे कामकाजावर परिणाम झाला असून ज्यांचे कोकणभवनमध्ये काम असेल त्यांनी सोमवारी येथे येणे टाळावे असे संदेश पाठविण्यास सुरवात झाली होती.

एपीएमसीमध्येही पाणी साचले
बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्येही सलग चौथ्या दिवशी पाणी साचले होते. मार्केटमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे दोन्ही मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचत आहे. मुसळधार पाऊस असूनही भाजी मार्केटमध्ये तब्बल ५०६ वाहनांची आवक झाली होती. पावसामुळे माल खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला असून २० टक्केपेक्षा जास्त मालाची विक्री झाली नाही. असाच पाऊस राहिला तर मंगळवारपासून आवकवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यात पाणीकपात
राज्यातील सर्व शहरात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. बहुतांश ठिकाणी पाणीकपात करण्यात आली होती. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने उन्हाळ्यात पाणीकपात केली नव्हती. मात्र पाऊस सुरू होताच धरणातील पाणीसाठा कमी झाला असल्याचे कारण सांगत दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी सायंकाळी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमामध्ये धरण परिसरामध्ये ६५४ मिमी पाऊस पडला आहे. धरणाची पातळी ७२.८० मीटरपर्यंत वाढली आहे. चार दिवसात पाण्याची पातळी दोन मीटरने वाढली आहे.

पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत
डुंगी गावात तीन फूट पाणी जमा झाले आहे. कित्येक घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहेत. लहान मुले तसेच वृद्धांचेही हाल झाले. शाळा परिसरात पाणी साचल्याने लहान मुलांना सोमवारी शाळेत पाण्यातून जावे लागले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उलवे नदीचे प्रवाह बदलणे त्याचबरोबर कृत्रिम चॅनलची खोली नैसर्गिक पात्रापेक्षा कमी करण्यात आली आहे. भरावामुळे विमानतळाजवळचे डुंगी गाव पाण्यात गेले आहे. सिडको आणि विमान प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
उलवे टेकडी तोडून भरावासाठी वापरण्यात आली. हा भराव नैसर्गिक पातळीपासून जवळपास आठ मीटर उंच करण्यात आला आहे. उलवे नदी प्रवाह बदलण्यात आला आहे. याठिकाणी डोंगराचे सपाटीकरण करून ३.२ किलोमीटरचा कृत्रिम चॅनल तयार केला आहे. पण त्याची खोली नैसर्गिक पात्रापेक्षा कमी आहे.
पाटनोली, मुसारा, नानोसी यासह इतर गावच्या डोंगरावरील पाणी वाहून जाण्यास मार्गच राहिला नाही. त्यामुळे डुंगी गावात पाणी आले आहे. शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीतील पाणी चॅनलमध्ये वाहू लागले. सिडकोकडून योग्य नियोजन झाले असल्याचा दावा केला असला तरी डुंगी गावात पाणी साचल्याने तो फोल ठरला आहे.

विमानतळालगतच्या गावांत शून्य आपत्ती नियोजन
विमानतळाच्या भरावयाचे काम घाईघाईने करण्यात आले. उलवे टेकडी तसेच नदीचे पात्र बदलण्यात आले. पण बाजूला असलेल्या गावांचा विचार केला नसल्याचे, डुंगी गावात पाणी साचल्याने उघड झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत उपाययोजनेकडेही दुर्लक्ष केले आहे.

तीन दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने गावात पावसाचे पाणी साचले आहे. घराघरात पाणी शिरले आहे. त्यामुळे लहान मुले तसेच वृद्धांचेही हाल झाले आहे. सिडको व प्राधिकरणाकडून योग्य उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून अशी परिस्थिती उद्भवली आहे.
- आदेश नाईक, ग्रामस्थ डुंगी

Web Title:  Rains for the fourth consecutive day; The public transport system collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.