पोलीस आयुक्तालय परिसरात नो-पार्किंगमध्ये गाड्यांची पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:40 AM2017-12-03T02:40:27+5:302017-12-03T02:40:40+5:30

बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते अग्रोळी गावाकडे जाणाºया मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहेत.

Parking car in no-parking area in the police commissioner's neighborhood | पोलीस आयुक्तालय परिसरात नो-पार्किंगमध्ये गाड्यांची पार्किंग

पोलीस आयुक्तालय परिसरात नो-पार्किंगमध्ये गाड्यांची पार्किंग

Next

नवी मुंबई : बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते अग्रोळी गावाकडे जाणा-या मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नो पार्किंगची पाटी समोर लावली असतानाही वाहनचालक स्वत:च्या सोयीनुसार हव्या तिथे गाड्या उभ्या करण्याचे प्रकार पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते.
रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. उभ्या केलेल्या वाहनांमुळे रस्ता अडविला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणी उभ्या केलेल्या या वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याने वाहनचालक बेफिकीरपणे नो पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करत असल्याचे दिसून येते. कामानिमित्त कोकण भवन, सिडको तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, बेलापूर कोर्टात येणारे प्रवासी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्ग तसेच अर्बन हाट येथून अग्रोलीकडे जाणाºया मार्गावर वाहने उभी करून पुढील कामासाठी जातात, त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही पुन्हा तीच परिस्थिती पाहायला मिळते. नो पार्किंग झोनमधील वाहनांवर रोजच कारवाई केली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
अर्बन हाट परिसरात स्वतंत्र पार्किंगची सोय केलेली असूनही, अग्रोली तलावाच्या समोरील रस्त्यावर वाहने उभी केलेली पाहायला मिळतात. सीबीडी हायवे लगत असलेल्या अग्निशमन दलाच्या बाहेरील रस्त्यावरील अवैध पार्किंगमुळे प्रवासी हैरण झाले आहे. बेलापूर रेल्वेस्थानकालगत असलेल्या पे अ‍ॅण्ड पार्कचा वापर न करता, प्रवासी रिक्षातळाच्या शेजारी असलेल्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जात आहे. या मार्गावरील पादचारी तसेच इतर प्रवाशांच्या मार्गात अडथळे येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या गाड्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. अर्बन हाट येथील प्रदर्शनाला भेट देणारे ग्राहकही अनेकदा मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या करत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नसल्याने मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जातात. पार्किंगच्या बाबतीत शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया किशोर ठाकरे या स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली.

Web Title: Parking car in no-parking area in the police commissioner's neighborhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.