प्रदर्शनाच्या नावाखाली विकासकांचे स्नेहसंमेलन? सर्वसामान्य ग्राहक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 06:39 AM2018-01-28T06:39:54+5:302018-01-28T06:40:17+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे; परंतु या मालमत्ता प्रदर्शनाने सर्वसामान्य ग्राहकांची पुन्हा निराशा केली आहे. काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांच्या गृहस्वप्नांना या प्रदर्शनाने या वेळीही हुलकावणी दिली आहे. एकूणच आयोजनाचा कॉर्पोरेट थाट पाहता, हे प्रदर्शन म्हणजे बीएएनएमने विकासकांच्या स्नेहसंमेलनासाठी केलेली उधळपट्टी असल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.

In the name of the exhibition, the friendship of the fans? Generic customer confusion | प्रदर्शनाच्या नावाखाली विकासकांचे स्नेहसंमेलन? सर्वसामान्य ग्राहक संभ्रमात

प्रदर्शनाच्या नावाखाली विकासकांचे स्नेहसंमेलन? सर्वसामान्य ग्राहक संभ्रमात

Next

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे; परंतु या मालमत्ता प्रदर्शनाने सर्वसामान्य ग्राहकांची पुन्हा निराशा केली आहे. काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांच्या गृहस्वप्नांना या प्रदर्शनाने या वेळीही हुलकावणी दिली आहे. एकूणच आयोजनाचा कॉर्पोरेट थाट पाहता, हे प्रदर्शन म्हणजे बीएएनएमने विकासकांच्या स्नेहसंमेलनासाठी केलेली उधळपट्टी असल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. तर शनिवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. कार्पोरेट थाटात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात जवळपास ७० विकासकांनी आपले गृहप्रकल्प विक्रीसाठी मांडले आहेत. यात टोलेजंग टॉवर्स, आकर्षक बंगलो, रो हाउसेस, पेन्टा हाउसेस आदी प्रकारच्या महागड्या मालमत्ता येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कमीत कमी १२ लाखांपर्यंतची घरे येथे उपलब्ध असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र तसा एकही गृहप्रकल्प या प्रदर्शनात दिसत नाही. बजेटमधील बहुतांशी घरांचे प्रकल्प अद्यापि कागदावरच आहेत. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षांपासून आयोजकांकडून कमीत कमी १२ लाखांपर्यंतच्या घरांची घोषणा केली जात आहे.
गेल्या वर्षी झालेली नोटाबंदी, जीएसटी तसेच महारेरा कायद्यामुळे नवीन गृहप्रकल्पाला खीळ बसली आहे. मागील दहा वर्षांपासून जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नवीन प्रकल्प उभारले जात नाहीत. शहरातील अनधिकृत घरांच्या किमतीही आता ३० ते ४० लाखांच्या घरात पोहोचल्या आहेत. मग ही १२-१५ लाखांची घरे आली कुठून? आणि येणार कुठून? असा सवाल, या प्रदर्शनाला भेट देणाºया सर्वसामान्य ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
या प्रदर्शनात नवी मुंबईसह पनवेलपासून साधारण पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर सुकापूर, तळोजा, उरण रोड, गोवा रोड व पुणे-माथेरान रोड आणि तळोजा, डोंबिवली येथील आकर्षक गृहप्रकल्प विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सिडकोच्या नैना क्षेत्रातील नियोेजित गृहप्रकल्पही या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांशी प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. ही वस्तुस्थिती असताना, कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून आयोजनाचे प्रयोजन काय, सर्वसामान्य ग्राहकांच्या स्वप्नपूर्ततेसाठी की, विकासकांच्या स्नेहमिलनासाठी? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

गर्दी वाढविण्यासाठीच १२ लाखांची टॅगलाइन

कोट्यवधी रुपये खर्चून कार्पोरेट थाटात भरविण्यात येणाºया या प्रदर्शनाला अधिकाधिक ग्राहकांनी भेट द्यावी, असा आयोजकांचा प्रयत्न असतो. मागील काही वर्षांत बजेटमधील छोट्या घरांची निर्मिती प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. संधी मिळेल तेथे आपल्या बजेटमधील घरासाठी नोकरदारांकडून चाचपणी सुरू आहे. नेमकी ही संधी साधत प्रदर्शनाला गर्दी वाढविण्यासाठी आयोजकांकडून, ‘कमीत कमी १२ लाखांचे घर’ या संकल्पनेचा पंचलाइन म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप या क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांत वन बेड आणि टू बेडची घरे बांधणे, विकासकांनी बंद केले आहे. केवळ बडे गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठीच हे प्रदर्शन भरविले जाते की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. कारण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून प्रदर्शनाचे भपकेबाज आयोजन, नट-नट्यांची रेलचेल, तोकड्या कपड्यातील अस्सखलीत इंग्रजी बोलणाºया स्वागतिका, अशा कार्पोरेट वातावरणात काही लाखांचे बजेट असलेला मध्यमवर्गीय ग्राहक येथे गोंधळून जातो.

Web Title: In the name of the exhibition, the friendship of the fans? Generic customer confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.