मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:03 AM2018-05-25T04:03:19+5:302018-05-25T04:03:19+5:30

स्थानकांच्या कामाला गती : दोन महिन्यांत येणार कोच

Metro project work in progress | मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

googlenewsNext

पनवेल : विविध कारणांमुळे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाने पुन्हा गती घेतली आहे. स्थानकांच्या कामाने वेग घेतला असून, पुढील दोन महिन्यांत चिनी बनावटीचे मेट्रो कोच सिडकोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने साधारण मे २०१९पर्यंत या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याचा मानस आता सिडकोने व्यक्त केला आहे.
२०११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरु वात झाली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे. या स्थानकांच्या कामालाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, ट्रॅकवर धावणाऱ्या मेट्रोचे डबे थेट दोन महिन्यांत चीनमधून भारतात आयात होणार आहेत. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर ही कामे प्रगतिपथावर आहेत. तळोजा पाचनंद येथे दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर मेट्रोसाठी पूल बांधावा लागणार आहे. हा अडथळाही आता दूर झाला असून, पूल उभारणीच्या कामालाही गती देण्यात आली आहे.
पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला डिसेंबर २०१४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु विविध कारणांमुळे कामाचा वेग मंदावल्याने ही मुदत २०१५ व नंतर जानेवारी २०१७पर्यंत वाढविण्यात आली; परंतु विविध अडथळ्यांमुळे मेट्रोचे काम लांबणीवर गेले. सध्याच्या घडीला मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक कामे सुरू असल्याने वर्षभरात हे काम पूर्ण होणार असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने मेट्रोचे पहिल्या टप्प्याचे कामदेखील महत्त्वाचे आहे. त्यातच येऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खुद्द मुख्यमंत्रीही लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. येऊ घातलेल्या निवडणुकीवेळी मेट्रो हादेखील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो.

डेपोचे काम पूर्ण
या मेट्रोकरिता सुमारे २६ हेक्टर जागेवर १३२ कोटी रु पये खर्चून अद्ययावत कारशेड, डब्यांची देखरेख, दुरु स्ती आदीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. या डेपोचे काम पूर्णत्वाला आलेले आहे. या व्यतिरिक्त स्टेशन कॉम्प्लेक्सचे काम जवळ जवळ पूर्णत्वाला आलेले आहे.

वाहतूककोंडी होणार कमी
बेलापूर ते पेंधर या ११ कि.मी.च्या मेट्रो मार्गामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण निश्चितच कमी होणार आहे. सध्याच्या घडीला बेलापूर, खारघर, ते तळोजा, पेंधर या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन, टॅक्सी, आॅटो, एनएमएमटी आदीचा वापर करावा लागतो. हा प्रवास वेळखाऊ असल्याने मेट्रो सुरू झाल्यावर या पट्ट्यातील रहिवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार असून, मेट्रोची सफरदेखील प्रवाशांना घडणार आहे.

नवी मुंबई मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्याने कामाला गती प्राप्त झाली आहे. पुढील दोन महिन्यांत चीनवरून मेट्रोचे डब्बे आणले जाणार आहेत. एकूणच मे २०१९पर्यंत या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
- मोहन निनावे,
जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Metro project work in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो