एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:39 AM2024-01-24T07:39:32+5:302024-01-24T07:39:45+5:30

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे.

Maratha protesters will strike in APMC; Expectation of mobile toilets from the municipality | एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

नवी मुंबई : मराठा आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. एपीएमसी मार्केटसह मैदानांचा आधार घेतला जाणार आहे. त्यासाठी फिरत्या शौचालयासह पाणी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा केली असली तरी अद्याप त्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना पालिका प्रशासनाने  केलेली नाही. 

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. २५ जानेवारीला दुपारी आंदोलक पनवेलमध्ये येणार आहेत. सायंकाळी सर्वांचा मुक्काम नवी मुंबईत होणार आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या राहण्याची, जेवणाची व सर्व प्रकारची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले आहे. 

पालिकेची मैदाने, सिडको प्रदर्शन केंद्र व इतर ठिकाणीही सोय करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नियोजनासाठीची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. महानगरपालिकेकडून फिरते शौचालय, पाणी व इतर सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, अद्याप प्रशासनाकडून बैठक झालेली नाही. यामुळे  पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त हाेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत. 

स्थानिकांचा मदतीचा हात
आंदोलकांना जेवण पुरविण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागातील मराठा नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. नवी मुंबई केमिस्ट असोसिएशननेही वैद्यकीय मदत देण्याची तयारी केली आहे. सर्वांनी त्यांचे योगदान देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

मुंबई बाजार समिती २५ला राहणार बंद 
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईत मुक्कामाला येणार आहेत. बाजार समितीमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. येथील लिलावगृह, गोडावून व माेकळ्या जागा आंदोलकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने बाजार समितीची सर्व मार्केट एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी पाणी, प्रसाधनगृह, जेवण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची तयारी सकल मराठा समाजाने सुरू केली आहे.

Web Title: Maratha protesters will strike in APMC; Expectation of mobile toilets from the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.