पनवेलमधील अनधिकृत गोदामांचा प्रश्न ऐरणीवर, कळंबोली-मुंब्रा मार्गावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:03 AM2017-11-30T07:03:08+5:302017-11-30T07:03:16+5:30

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत गोदामांमुळे सुरक्षेबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पालिका क्षेत्रातील धरणा कॅम्प याठिकाणी टायरच्या गोदामाला आग लागली होती.

    The issue of unauthorized warehouses at Panvel, encroaching on the Ernakulam, Kalamboli-Mumbra road | पनवेलमधील अनधिकृत गोदामांचा प्रश्न ऐरणीवर, कळंबोली-मुंब्रा मार्गावर अतिक्रमण

पनवेलमधील अनधिकृत गोदामांचा प्रश्न ऐरणीवर, कळंबोली-मुंब्रा मार्गावर अतिक्रमण

Next

वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत गोदामांमुळे सुरक्षेबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पालिका क्षेत्रातील धरणा कॅम्प याठिकाणी टायरच्या गोदामाला आग लागली होती. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. विशेष म्हणजे तपासात हे संपूर्ण गोदाम अनधिकृत सुरू असल्याचे उघड झाले. या गोदामाच्या मालकावर पालिकेने गुन्हा देखील दाखल केला. मात्र या प्रकरणाने या मार्गावरील शेकडो अनधिकृत गोदामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
कळंबोली-मुंब्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून ही अनधिकृत गोदामे सुरू आहेत. पालिका क्षेत्रातील खुटारी, धानसर, किरवली, रोहिंजन या गावाजवळ मोठ्या संख्येने ही अनधिकृत गोदामे वसली आहेत. या गोदामात कपडे, टायर्स, इंधन, ज्वलनशील पदार्थ, प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियमच्या वस्तू आदी व्यतिरिक्त विविध टाकाऊ वस्तूंचा साठा केला जातो. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात पाचशेपेक्षा जास्त लहान-मोठी गोदामे पालिका क्षेत्रात अस्तित्वात आहेत. मोठ्या जागेत व्यवसाय थाटणाºया या गोदामांच्या मालकांकडे अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे परवाने नसताना कोणत्या आधारावर हे व्यवसाय सुरु आहेत. तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्था ते वर्षापूर्वी स्थापन झालेली महानगरपालिका या गोदाम मालकांकडे का दुर्लक्ष करते हा प्रश्न उपस्थित होत आहे. यापैकी अनेक गोदामात रासायनिक पदार्थांचे साठे केले जातात. धरणा कॅम्प येथे लागलेल्या आगीच्या दोन महिन्यांपूर्वी शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार करून अशा गोदामात कशाप्रकारे अनधिकृत व्यवसाय चालतात याची माहिती दिली होती. कोणत्याही क्षणी पालिका क्षेत्रात अनुचित घटना घडू शकते हे भाकीत व्यक्त करीत त्यांनी संबंधित गोदामांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे केणी यांनी यावेळी सांगितले.
अशाप्रकारे अनधिकृत गोदामांचे व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून सुरु आहेत. संबंधित ग्रामपंचायती असोत वा शासनाच्या इतर यंत्रणा असोत या सर्वांनी या गोदाम मालकांना पाठीशी का घातले? असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

सरकारी यंत्रणेवर ताण
रविवारी धरणा कॅ म्प येथे टायर्सच्या गोदामाला लागलेल्या घटनेच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खारघरमध्ये एका खासगी कार्यक्र माला आले होते. त्याच वेळी ही घटना घडली असल्याने सरकारी अधिकारी, यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त यांसह सर्व सरकारी यंत्रणेतील अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्र माला उपस्थित होते.

गोदामांना रीतसर परवानगी देणे गरजेचे
पालिका क्षेत्रात पाचशेपेक्षा जास्त लहान-मोठी गोदामे आहेत. अनेक वर्षांपासून ही गोदामे सुरु आहेत. अनेक गोदामे बिनधास्त विनापरवाना सुरु आहेत. अशा गोदामांना रीतसर परवानगी देणे गरजेचे आहे. अनेक गोदामे ही टाकाऊ वस्तू एकत्रित करण्याचे काम करीत असतात, तर अनेक गोदामात ज्वलनशील पदार्थांचा साठा केला जातो. या गोदामांमध्ये हजारो बेरोजगार कामगार काम करीत असतात. त्यामुळे या गोदामांना रीतसर परवानगी देणे गरजेचे आहे.

ज्वलनशील पदार्थ साठवणाºया गोदामांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज
या गोदामांमध्ये अनेक गोदामे सर्रास ज्वलनशील पदार्थ बाळगत असतात. यामुळे कोणत्याही क्षणी मोठी अनुचित घटना घडू शकते. विशेष म्हणजे अनेक कामगारांना या ज्वलनशील पदार्थांबाबत माहीत नसल्याने ते त्या पदार्थांना हाताळत असतात. अशा वेळी त्यांच्यासह संपूर्ण परिसरात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

दोन महिन्यांपूर्वीच नगरसेवकाचे पालिका आयुक्तांना पत्र 
पालिका क्षेत्रातील अनधिकृत गोदामांमध्ये कशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केले जात आहे यासंदर्भात सविस्तर माहिती शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना सप्टेंबर महिन्यात दिलेल्या पत्रात स्पष्ट माहिती दिली आहे .या पत्राला उत्तर म्हणून पालिकेच्या मार्फत काय उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत याबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे केणी यांनी सांगितले. 

अनेक गोदामात आग प्रतिबंधक उपाययोजना नाहीत
पालिका हद्दीतील सुरु असलेल्या या गोदामांच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय होत असतात. याकरिता मालाची साठवणूक याठिकाणी केली जाते. मात्र अनुचित घटना घडल्यास आग प्रतिबंधकसारख्या उपाययोजना याठिकाणी असणे गरजेचे असताना देखील अनेक गोदामे याकडे दुर्लक्ष करतात.

पालिका हद्दीतील धरणा कॅम्प याठिकाणी गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेची दखल घेत आम्ही संबंधित अनधिकृत गोदामात व्यवसाय करणाºया मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पालिका हद्दीतील सर्व अधीक्षकांना त्यांच्या परिसरातील गोदामांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये कोणकोणत्या गोदामांकडे अधिकृत परवानगी आहे, किती गोदाम मालकांनी आग प्रतिबंधक उपाययोजना केलेली आहे यासंदर्भात माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका

Web Title:     The issue of unauthorized warehouses at Panvel, encroaching on the Ernakulam, Kalamboli-Mumbra road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.