- नामदेव मोरे

नवी मुंबई : आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे पुरातत्त्व विभागाने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. वाडा उभारला; परंतु आतमधील साहित्य व तैलचित्रांचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. स्मारकामधील माहितीफलकावरील अक्षरेही धुसर झाली आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावर शासनाने हुतात्मा स्मारक उभारले असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
पनवेल तालुक्यातील शिरढोण हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्यामुळेच शासनाने त्यांचा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला. मोडकळीस आलेल्या वाड्याचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. नूतनीकरणानंतर वाड्यामध्ये क्रांतिकारकांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी भित्तीचित्रे लावण्यात येणार होती; परंतु दोन वर्षांमध्ये त्याविषयी काहीही कार्यवाही झालेली नाही. वाड्यामध्ये पाहण्यासाठी काहीच नाही. जमीन सारवली जात नाही. जुन्या वस्तू वाड्याच्या वरील भागात धूळ खात पडून आहेत. जयंती व पुण्यतिथीलाच वाडा उघडला जात आहे. वाड्याच्या आवारातील जुनी विहीर मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी जयंतीनिमित्त वाड्याच्या परिसरातील गवत काढून साफसफाई केली असली, तरी पुरातत्त्व विभागाकडून फारशी देखभाल केली जात नाही. वाड्याच्या समोरील बाजूला क्रांतिकारकांचे स्मारक असून, त्यामधील एका खोलीत माहितीपट उलगडून दाखविणारे चित्र व माहितीफलक लावलेले आहेत; परंतु त्यावरील मजकूर अस्पष्ट झाला असून, तो वाचता येत नाही. देशाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याची व स्मारकाची दुरवस्था थांबविण्यासही पुरातत्त्व विभागाला अपयश आले आहे. नूतनीकरण केलेला वाडा अद्याप अधिकृतपणे नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही.
मुंबई-गोवा रोडला लागून शिरढोण गाव आहे. गावचा देदीप्यमान इतिहास सर्वांना माहीत व्हावा, यासाठी शासनाने महामार्गाला लागून गावाच्या प्रवेशद्वारावर हुतात्मा स्मारक उभारले आहे. हुतात्मा स्तंभ व येथील इतिहासाची माहिती देणारी टुमदार वास्तू उभारण्यात आली आहे; परंतु या स्मारकाची देखभाल करण्यासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही. आद्यक्रांतिकारकांच्या जयंतीदिवशीही स्मारकाच्या आवारातील गवत काढण्यात आलेले नाही. कचरा साफ करण्यात आलेला नाही. हुतात्मा भवनच्या दरवाजाचे टाळे तुटलेले आहे. खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. आतमध्ये प्रचंड धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जयंतीनिमित्त अनेक नागरिकांनी या स्मारकाला भेट दिली व त्याची दुरवस्था पाहून प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. १८५७च्या बंडानंतर शांत झालेला स्वातंत्र्यलढा वासुदेव बळवंत फडके यांनी पुन्हा सुरू केला. या क्रांतिवीरांच्या जन्मगावातील स्मारकाची दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी जपलाय वारसा
शिरढोण गावातील वाड्याचे बाह्यकाम पूर्ण झाले असून आतील काम करण्याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करत आहे. स्मारकाची दैनंदिन देखभाल करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. प्रवेशद्वारावरील हुतात्मा स्मारकाकडेही दुर्लक्ष झाले आहे; परंतु ग्रामस्थांनी मात्र त्यांच्या परीने आद्यक्रांतिवीरांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. जयंतीनिमित्त पूर्ण वाड्याभोवती दीप लावून परिसर उजळला जातो. वाड्याच्या परिसराची साफसफाई केली जात आहे.

आद्यक्रांतिवीरांचा जीवनपट पुढीलप्रमाणे...
- ४ नोव्हेंबर १८४५मध्ये शिरढोण, पनवेल येथे जन्म
- १८५० ते ६० दरम्यान कल्याण, पुणे व मुंबई येथे शिक्षण
- शिक्षण अर्धवट सोडून रेल्वेमध्ये जीआयपी म्हणून नोकरी
- रेल्वेतील नोकरी सुटल्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये क्लार्कची नोकरी
- १८६३ मध्ये लष्कराच्या हिशेब खात्यात झाले भरती
- २१ फेब्रुवारी १८७९मध्ये इंग्रजांविरोधात बंडाची घोषणा
- २२ ते २७ फेब्रुवारी १८७९ला लोणी व खेडवर सावकारांच्या घरावर दरोडा
- ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकून बंदुका व रोख रक्कम केली हस्तगत
- रामोशी, धनगर, कोळी व इतर समाजातील तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देऊन उभारले लष्कर
- इंग्रजांविरोधात युद्ध पुकारून खेड, शिरूरमध्ये लुटले सरकारी खजिने
- पुणे शहरावर हल्ला करून काही दिवस पुणे शहरावर मिळविला ताबा
- २० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदुगी गावाजवळ इंग्रजांनी पकडले
- सार्वजनिक काकांनी त्यांचे स्वीकारले वकीलपत्र
- इंग्रजांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावून अरेबियातील एडन येथे टाकले तुरुंगात
- १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडन येथील तुरुंगामध्ये मृत्यू

स्मारकांची सद्यस्थिती
- प्रवेशद्वारावरील हुतात्मा स्मारकाची प्रचंड दुरवस्था
- हुतात्मा स्मारकाच्या वास्तूचे खंडरात रूपांतर, धुळीचे साम्राज्य
- हुतात्मा स्मारक परिसराची साफसफाई करण्यासाठी यंत्रणाच नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.