राज्यात दुष्काळ, नवी मुंबईत मात्र पाण्याचा सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:33 PM2019-05-22T23:33:16+5:302019-05-22T23:33:25+5:30

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव; उपाययोजनांअभावी हजारो लीटर पाणी जातेय वाहून

Drought in the State, but in Navi Mumbai, the water cooled | राज्यात दुष्काळ, नवी मुंबईत मात्र पाण्याचा सुकाळ

राज्यात दुष्काळ, नवी मुंबईत मात्र पाण्याचा सुकाळ

Next

योगेश पिंगळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरू असताना नवी मुंबई शहरात मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. शहरात सुरू असलेली बांधकामे, वाहने धुणे, सोसायट्यांमधील बाग-बगिचे, सोसायटीचे आवर पाण्याने धुऊन स्वच्छ करणे आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी केली जात आहे. या वर्षी पाणी वापराबाबत महापालिकेच्या माध्यमातूनही जनजागृतीचा केली जात नसून पाण्याच्या होणाऱ्या नासाडीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्यांत, तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई सुरू असून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणात मात्र पाण्याचा मुबलक साठा असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडीही होत आहे. मुबलक पाणीसाठा असलेल्या शहराशेजारील पनवेल महापालिका हद्दीमध्येही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, आदिवासी पाड्यांमधील भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नवी मुंबई शहरात दरवर्षी पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते; परंतु यावर्षी राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही शहरातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा आभाव आहे. अवघ्या ५० रु पयांत ३० हजार लीटर पाणीवाटप करणाºया नवी मुंबई शहरातील शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी, सिडको आणि खासगी वसाहतींमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात असून दररोज हजारो लीटर पाणी वाया घालविले जात आहे. शहरातील हॉटेल्समध्येही आवाराची स्वच्छता करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली जात आहे. शहरात सुरू असलेली बांधकामे, वाहनांची व सोसायट्यांच्या आवाराची स्वच्छता, सोसायट्यांमधील बाग-बगिच्यांना पाणी, पाणीगळती आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असून याकडेदेखील महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने शहरात सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली आहे.


या शौचालयांमध्ये पाण्याची सोय करण्याच्या अनुषंगाने टाक्या बसविण्यात आल्या आहेत; परंतु पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरल्यावर पाणी बंद करण्याची सुविधा आणि यंत्रणा नसल्याने अनेक टाक्या ओव्हर फ्लो होऊन पाण्याची नासाडी होत आहे, तसेच अनेक खासगी सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होत असून, पाण्याची नासाडी होत आहे. शहरात पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.


मोरबेच्या पाण्याचा तपशील
नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घन मीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाण्याची शहराला गरज आहे.
गेल्यावर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात ७४.६६ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा नवी मुंबई शहराला सुमारे १२ सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे.

Web Title: Drought in the State, but in Navi Mumbai, the water cooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.