सीसीटीव्हीमुळे दरोड्याचे आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:42 AM2017-12-06T01:42:03+5:302017-12-06T01:43:01+5:30

जुईनगरमधील बँक आॅफ बडोदावरील दरोड्याने देशभर खळबळ उडाली होती. भुयार खोदून टाकलेल्या देशातील सर्वात मोठ्या दरोड्यातील आरोपींना फक्त पाच दिवसांमध्ये गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

CCTV gang rape accused | सीसीटीव्हीमुळे दरोड्याचे आरोपी गजाआड

सीसीटीव्हीमुळे दरोड्याचे आरोपी गजाआड

Next

नामदेव मोरे, सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : जुईनगरमधील बँक आॅफ बडोदावरील दरोड्याने देशभर खळबळ उडाली होती. भुयार खोदून टाकलेल्या देशातील सर्वात मोठ्या दरोड्यातील आरोपींना फक्त पाच दिवसांमध्ये गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. नवी मुंबईमधील सीसीटीव्हीच्या जाळ्यामुळे आरोपींची ओळख पटविणे व त्यांना गजाआड करणे तपास यंत्रणांना शक्य झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून, बँकेचे एक लॉकर स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून फक्त दहा मिनिटांमध्ये उघडण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी अटक केलेले हाजीद अली मिर्जा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा, श्रावण कृष्णा हेगडे ऊर्फ संतोष तानाजी कदम ऊर्फ काल्या, मोमीन अमिन खान ऊर्फ पिंटू, अंजन आनंद महांती ऊर्फ रंजन, मोईद्दीन अब्दुल सिराजमिया शेख ऊर्फ मेसू हे पाचही कुख्यात दरोडेखोर. सर्वांवर चोरी, घरफोडीचे प्रत्येकी १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल. छोटे-मोठे दरोडे टाकणाºया या आरोपींची तुरूंगात एकमेकांशी ओळख झाली. तुरूंगातून बाहेर पडल्यावर झालेल्या भेटीमध्ये छोटे गुन्हे बास झाले, आता देश हादरविणारा दरोडा टाकायचा संकल्प करतात. घाटकोपरमध्ये एकत्र येवून भुयार खोदून बँक लुटायची असा निर्धार करतात. दरोड्यासाठी बँकेच्या बाजूला गाळा भाड्याने घेणे. भुयार खोदण्यासाठी आवश्यक साहित्य, वाहने, मजुरांचा पुरवठा, चोरी केलेले दागिने कोणाला विकायचे याविषयी नियोजन केले जाते. प्रत्येकावर कामाची जबाबदारी देवून बँकांची व त्याच्या परिसराची रेकी करण्यास सुरवात करतात. मे २०१७ मध्ये जुईनगर सेक्टर ११ मधील बँक आॅफ बडोदाच्या बाजूचा गाळा भाड्याने घेतात. पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरार करण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करतात.
भुयार खोदण्यासाठी उत्तरप्रदेशमधून चार मजुरांना घेवून येतात. त्यांना राहण्यासाठी उलवेमध्ये स्वतंत्र फ्लॅट खरेदी केला जातो. दरोड्यासाठी चायनामेड वॉकीटॉकी, हॅमर मशिन, ड्रिल मशिन, ग्रॅडर मशिन, कटींग मशिन, स्क्रू ड्रायव्हर, पंखा, हेक्सा ब्लेड, घण, पहार, छिन्नी, कटावणी, मारूती इर्टीका, महिंद्रा एक्ययूव्ही, मारूती स्विफ्ट विकत घेतली जाते. मुख्य आरोपी हाजीद अली ऊर्फ लंगडा याने दरोडा टाकण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी, गाळा भाड्याने घेणे, फर्निचर, वाहन खरेदीसाठी तब्बल साडेआठ लाख रूपयांची गुंतवणूक केली होती. जूनमध्ये प्रत्यक्षात खोदकाम करण्यास सुरवात केली. भुयार खोदताना कोणालाही संशय येवू नये यासाठी बँकेच्या बाहेर काही आरोपी कारमध्ये थांबत होते. पोलिसांचे बीटमार्शल किंवा गस्त घालणारी गाडी येताच वॉकीटॉकीवरून आतमधील सर्वांना माहिती दिली जात होती. यानंतर खोदकाम तत्काळ थांबविण्यात येत होते. खोदकाम केलेली माती तत्काळ बाहेर नेवून टाकली जात होती. ११ नोव्हेंबरला लॉकरपर्यंत खोदकाम पूर्ण केले व १२ नोव्हेंबरला पहाटे साडेसातपर्यंत ३० लॉकर फोडून पलायन केले.

तपासात सहभागी अधिकारी, कर्मचारी : गुन्ह्याच्या तपासाकरिता पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर, किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० पथके तयार केली होती. त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षक सूरज पाडवी, शिरीष पवार, बाळासाहेब कोल्हटकर, नंदकुमार पिंजन, अजयकुमार लांडगे, संदीपान शिंदे, अशोक राजपूत, सहायक निरीक्षक उल्हास कदम, संतोष जाधव, विजय चव्हाण, प्रतापराव कदम, नीलेश माने, बापू रायकर, उपनिरीक्षक विक्रम साळुंखे, विशाल जाधव, पोलीस नाईक सूर्यभान जाधव, प्रकाश साळुंखे, भास्कर कुंभार, सुधीर चव्हाण, विठ्ठल मदने, संदीप कणसे, हवालदार प्रमोद पाटील, सुनील कानगुडे, विनायक निकम, गणपत पवार, पोलीस शिपाई सूरज जाधव, सम्राट डाकी, लवांकुश शिंगाडे, चंद्रकांत पाटील, पंकज राणे आदींचा समावेश होता. त्यांनी मालेगाव, चेंबुर, उत्तर प्रदेश, हावडा या ठिकाणी सापळा रचून एकूण ११ सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मजुरांना दिले
११ किलो सोने
आरोपींनी दरोडा टाकल्यानंतर भुयार खोदण्यासाठी बोलावलेल्या चार आरोपींना तब्बल ११ किलो सोने देण्यात आले. याशिवाय गावी जाण्यासाठी प्रवासखर्च म्हणून ५ हजार रूपये देण्यात आले होते. दरोड्याच्या दिवशीच त्यांना मूळ गावी पाठविण्यात आले होते. कामगार घेवून येणाºया दीपक मिश्राला सव्वा किलो सोने देण्यात आले. सोने घेवून तोही तत्काळ गावाकडे रवाना झाला असून तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

दहा मिनिटांत एक लॉकर फोडले
बँकेतील लॉकर सुरक्षित नसतात हेच आरोपींनी सिद्ध करून दाखविले आहे. फक्त एक मोठा व एक छोटा स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने दहा मिनिटामध्ये एक लॉकर उघडण्यात येत होता. बँकेतील २२५ लॉकरपैकी ४५ रिकामे होते. लॉकर फोडताना काही लॉकर मोकळे असल्याचे लक्षात येताच प्रथम तार टाकून लॉकरमध्ये काही आहे का हे तपासून ते फोडण्यास सुरवात केली. २४ तासांमध्ये ३० लॉकर फोडून आरोपींनी पलायन केले.

टोळीला
लावणार मोक्का
बँक लुटण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या या टोळीला मोक्का लावण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तयारी चालवली आहे. त्यामध्ये सध्या अटकेत असलेल्या ११ जणांसह फरार असलेल्या चौघांचा समावेश आहे. या टोळीच्या प्रमुख पाचही गुन्हेगारांवर प्रत्येकी शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीला मोक्का लावावा, असा प्रस्ताव न्यायालयापुढे मांडला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

आमचे दागिने मिळावे एवढीच अपेक्षा
बँक आॅफ बडोदा दरोड्यात ३० लॉकर फोडण्यात आले. सर्वांचे मिळून ३ कोटी ४३ लाखांचा ऐवज चोरीला गेला. दागिने, रोख रक्कम व इतर किमती वस्तू चोरीला गेलेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तालयामध्ये हजेरी लावली होती. पोलिसांनी ५० टक्के दागिने व रोख रक्कम हस्तगत केल्याबद्दल त्यांनी स्वागत केले. उर्वरित ५० टक्के मुद्देमाल लवकर हस्तगत करण्यात यावा. जे सापडाणार नाही त्याची भरपाई बँकेने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बँकेमध्ये सुरक्षेविषयी ठोस उपाययोजना केल्या नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. आमच्या कष्टाचे पैसे व दागिने आम्हाला मिळावे एवढीच अपेक्षा असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले असून याविषयी बँकेविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी नोटीस दिल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.

ज्वेलर्सचे दुकानच सुरू केले
दरोड्यातील मुख्य आरोपी हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा याने दरोड्यातील सोने विक्री करता यावे यासाठी जव्हेरी बाजारमध्ये स्वत:चे दुकानच सुरू केले होते. या दुकानामधून चोरीतील दागिन्यांची विक्री करण्यात येणार होती. त्याला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याने स्वत:चे डोके फोडून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

दरोडा घटनाक्रम
मार्च २०१७ मध्ये पाच मुख्य आरोपींनी घाटकोपरमध्ये दरोड्याचे नियोजन केले
एप्रिल २०१७ मध्ये नवी मुंबईमधील बँकांची रेकी करून बँक आॅफ बडोदाची निवड केली
मे २०१७ - गेना बच्चन प्रसाद ऊर्फ भवरसिंग याने बनावट नावाने बँकेच्या बाजूचा गाळा भाड्याने घेतला
मे २०१७ - भुयार खोदण्यासाठी उत्तरप्रदेशमधून चार मजुरांना आणण्यात आले व उलवेमध्ये त्यांना घर घेवून दिले.
जून ते ११ नोव्हेंबर २०१७ - भाड्याने घेतलेल्या गाळ्यापासून बँकेच्या लॉकरपर्यंत २५ फुटांचे भुयार खोदले
१२ नोव्हेंबर २०१७ - ११ नोव्हेंबर सकाळी सात ते १२ नोव्हेंबर पहाटे ७ दरम्यान ३० लॉकर फोडले
१३ नोव्हेंबर २०१७ - सकाळी बँक उघडल्यानंतर दरोडा पडल्याचे झाले उघड
१३ नोव्हेंबर - सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला
१४ नोव्हेंबर - तपासासाठी परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे व गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली दहा टीम तयार
१८ नोव्हेंबर - हाजीद अली ऊर्फ लंगडा, श्रावण हेगडे ऊर्फ काल्या, मोमीन खान ऊर्फ पिंटू, अंजन महांती ऊर्फ रंजन या चार आरोपींना अटक
२० नोव्हेंबर - दागिने विकत घेणारा राजेंद्र जगन्नाथ वाघ याला मालेगाव-नाशिकमधून अटक व १७ लाखांचे सोने जप्त
२० नोव्हेंबर - हावडा पश्चिम बंगालमधून मोईद्दीन अब्दुल सिराजमिया शेख ऊर्फ मेसुला अटक व रोख रकमेसह कार जप्त
२० नोव्हेंबर - उत्तरप्रदेश अलाहाबाद येथून कमलेश रामलखन वर्माला अटक करून १ लाख २७ हजार रूपयांचे दागिने केले जप्त
२१ नोव्हेंबर - मुंबईमधून आरोपी शहनाजबी मोईद्दीन शेखला अटक व साडेसहा लाख रूपये जप्त
२५ नोव्हेंबर - अलाहाबाद उत्तरप्रदेशमधून शुभम गंगाराम निशाद ऊर्फ भैय्याला केली अटक
३ डिसेंबर - वडाळामधून जुम्मन अली अब्दुल समद शेखला केली अटक
३ डिसेंबर - शिवाजीनगरमधून मेहरून्निसा शादाब सैय्यद ऊर्फ सोनिया ऊर्फ मेहरून्निसा सबदरअली मिर्झाला अटक करून ७० लाख रूपये किमतीचे २ किलो ८०० ग्रॅम सोने केले जप्त.

Web Title: CCTV gang rape accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.