महापालिका सुरू करणार सीबीएसई बोर्डाच्या शाळा, पहिल्या टप्प्यात दोन शाळा प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:38 AM2017-09-20T02:38:39+5:302017-09-20T02:38:44+5:30

महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमानंतर आता सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात दोन शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

The CBSE board school will start the municipal corporation, proposed two schools in the first phase | महापालिका सुरू करणार सीबीएसई बोर्डाच्या शाळा, पहिल्या टप्प्यात दोन शाळा प्रस्तावित

महापालिका सुरू करणार सीबीएसई बोर्डाच्या शाळा, पहिल्या टप्प्यात दोन शाळा प्रस्तावित

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमानंतर आता सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात दोन शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गरजेप्रमाणे पालिकेने मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. नेरूळ व ऐरोलीमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येही विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी राज्य व देशपातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवू लागले आहेत.
शहरातील सीबीएसई बोर्डाच्या खासगी शाळांची फी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे महापालिकेनेच या बोर्डाच्या शाळा सुरू केल्यास खासगी संस्थांच्या फी आकारणीलाही आळा बसेल, अशी मागणी नागरिकांनी केली होती. यामुळे शहरात दोन शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे लवकरच सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याविषयी कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
प्रस्तावावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले. परंतु अशाप्रकारची शाळा सुरू करण्यापूर्वी मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामधील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी केली. अनेक नगरसेवकांनी मनपा शाळांमधील गैरसोयींचा पाढाच यावेळी वाचून दाखविला. माजी महापौर मनीषा भोईर यांनी मनपा शाळांमधील गैरसोयींवर जोरदार टीका करून प्रशासनाला धारेवर धरले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सूरज पाटील यांनीही शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका केली. कुकशेतमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. त्या शाळेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिले नाहीत. शिक्षक नसल्यामुळे काही वेळा विद्यार्थ्यांची गैरसोय होते. वारंवार पाठपुरावा करूनही योग्य दखल प्रशासनाने घेतली नसल्याची टीका त्यांनी केली. ऐरोलीतील शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनीही प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
वाढीव वर्गखोल्या बांधण्यासाठी पाच वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. परंतु वर्गखोल्या बांधण्याकडे लक्ष दिले जात नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. रामचंद्र घरत व इतर नगरसेवकांनीही शाळांविषयी प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले.

पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस नाहीत. संगणक, प्रयोगशाळा व इतर अत्यावश्यक गोष्टी नाहीत. विद्यार्थ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहेत. सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा विचार चांगला आहे, पण त्यापूर्वी आहेत त्या शाळांमध्ये चांगल्या सुविधा देण्यात याव्यात.
- मनीषा भोईर, माजी महापौर

Web Title: The CBSE board school will start the municipal corporation, proposed two schools in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.