पेटीमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:22 AM2018-05-03T04:22:23+5:302018-05-03T04:22:23+5:30

वाशी गावालगत सापडलेल्या पेटीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे

The body of an unknown woman found in the box | पेटीमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

पेटीमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

Next

नवी मुंबई : वाशी गावालगत सापडलेल्या पेटीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सायन-पनवेल मार्गालगत झाडीमध्ये पडलेल्या या पेटीमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पेटी उघडली असता, त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायन-पनवेल मार्गालगत वाशी गावापासून काही अंतरावर झाडीमध्ये मोठी लोखंडी पेटी पडलेली होती. त्यामधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार वाशी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथक, श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी दोन टाळे लावलेली मोठी लोखंडी पेटी त्या ठिकाणी पडलेली होती. पोलिसांनी ही पेटी उघडली असता, त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुमारे ३० ते ३५ वयाच्या महिलेचा असून अंगात कुर्ता घातलेला आहे. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला होता. त्याच्या अहवालात सदर महिलेची हत्या गळा आवळून झाल्याचे उघड झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. मात्र, तिची ओळख पटेल असा कसलाही ठोस पुरावा त्या ठिकाणी सापडलेला नाही. शिवाय दोन दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याने इतर ठिकाणी हत्या केल्यानंतर तो त्या ठिकाणी टाकण्यात आल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बेडशिटमध्ये गुंडाळून हा मृतदेह पेटीमध्ये कोंबण्यात आलेला होता.

Web Title: The body of an unknown woman found in the box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.