शहरात ३५३ मद्यपी चालकांवर कारवाई; परवाना निलंबनासाठी न्यायालयाकडे होणार मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:29 AM2019-01-02T00:29:09+5:302019-01-02T00:29:21+5:30

थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे.

 353 drunken drivers in the city; Demand for suspension of license to court | शहरात ३५३ मद्यपी चालकांवर कारवाई; परवाना निलंबनासाठी न्यायालयाकडे होणार मागणी

शहरात ३५३ मद्यपी चालकांवर कारवाई; परवाना निलंबनासाठी न्यायालयाकडे होणार मागणी

googlenewsNext

नवी मुंबई : थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे. त्यामुळे या चालकांना थर्टीफर्स्टची नशा चांगलीच भोवणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यपान करून वाहन चालवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते; परंतु अनेक जण पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडतात, त्यामुळे थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाया केल्या जातात, त्याकरिता सोमवारी रात्री संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३५० ठिकाणी बॅरिकेड्स लावून मद्यपी चालकांची शोधमोहीम सुरू होती. त्याशिवाय पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा, विशेष शाखा, दोन्ही परिमंडळ तसेच गुन्हे शाखेचे उपआयुक्त यांच्याकडून शहरातल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. या दरम्यान, ३५३ जणांवर मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांचे चालक परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून न्यायालयाकडे मागणी केली जाणार आहे, त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना नशा करून वाहन चालवण्याचे केलेले धाडस त्यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच भोवणार आहे. गतवर्षी थर्टीफर्स्टच्या रात्री संपूर्ण आयुक्तालयात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या ४२४ कारवाया झाल्या होत्या. यंदा त्यात ७१ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून होता, त्याकरिता वाहतूक शाखेचे २७१ पोलीस, इतर शाखेचे ८९ पोलीस व अधिकारी असा सुमारे ३६० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त थर्टीफर्स्टच्या रात्री परिमंडळ एक व दोन मध्ये लावण्यात आला होता, त्याकरिता ३५० ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते, त्यापैकी ४० ठिकाणी ब्रेथ अ‍ॅनेलायझर मशिनचा वापर करण्यात आला. उर्वरित ठिकाणी वाहनचालकाला नाव विचारण्याच्या बहाण्याने त्याला बोलते करून मद्याचा वास हुंगण्याची शक्कल पोलिसांना लढवावी लागली. संभाव्य कारवाईच्या भीतीनेही अनेकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळले, त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या कारवाईत घट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता वाहतूक शाखा उपआयुक्त सुनील लोखंडे, परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे व परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशोध दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त लावण्यात आला होता, त्यानुसार एकूण ३५३ कारवायांपैकी परिमंडळ एक मध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७६ कारवाया झाल्या आहेत, त्यामध्ये सर्वाधिक ५८ कारवाया तुर्भे एमआयडीसी पोलीसठाणेच्या हद्दीत झाल्या आहेत. त्याशिवाय दारूबंदी कायद्यांतर्गतही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर एनआरआय पोलीसठाण्याच्या हद्दीत अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिफ शेख हे दिवाळे गावातून कारने जात असताना रस्त्यात आडवी रिक्षा उभी होती, त्यांनी हॉर्न वाजवून रिक्षा हटवण्यास सांगितले असता, त्यामध्ये बसलेल्या चौघांनी कारवर दगडफेक करून तसेच शेख यांना मारहाण करून पळ काढला. यामध्ये ते बेशुद्ध झाले असता, उपचारानंतर ते शुद्धीवर आले आहेत.

Web Title:  353 drunken drivers in the city; Demand for suspension of license to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.