उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

By नामदेव मोरे | Published: May 1, 2024 06:59 PM2024-05-01T18:59:09+5:302024-05-01T18:59:23+5:30

तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे.

15 beds reserved in 3 hospitals to fight heat stroke First Aid facility in 24 Civil Health Centres | उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या तीन रुग्णालयांत १५ बेड आरक्षित केले असून, तेथे वातानुकूलित यंत्रणा बसविली आहे. याशिवाय सर्व २४ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराची सोय केली आहे. नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमान ३५ अंशांवर आले असले, तरी वातावरणातील उकाडा कायम आहे. पुढील एक महिना तापमान वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

उष्माघातामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला, तर उपचारासाठी प्रत्येक विभागात सुविधा करण्याचे सुचित केले आहे. आरोग्य विभागाने ऐरोली, वाशी व नेरूळ या तीन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड आरक्षित केले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे व तज्ज्ञ मनुष्यबळाचीही सोय केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची दिघा ते दिवाळेदरम्यान २४ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्येही उष्माघाताच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. ऐरोली, वाशी व नेरूळ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. नागरी आरोग्य केंद्रामध्येही प्राथमिक उपचारांची सोय केली आहे. - डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका
 
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

  • पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली, तरी अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
  • घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
  • दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. अशक्तपणा, डोकुदुखी, सतत घाम येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
  • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे टाळावी, जास्तीत जास्त कामे सकाळी व सायंकाळी करावी.

Web Title: 15 beds reserved in 3 hospitals to fight heat stroke First Aid facility in 24 Civil Health Centres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.