ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 17 - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं उघड करणा-या महिला पोलीस अधिका-याची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतका मोठा भ्रष्टाचार उघड केला असताना पाठीवर कौतुकाची थाप देण्याऐवजी हाती बदलीचं पत्र देण्यात आलं. डी रुपा यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. डी रुपा यांच्यावर अधिका-यांना कोणतीही माहिती किंवा पुर्वकल्पना न देता प्रसारमध्यांमध्ये माहिती लीक केल्याचा आरोप करण्यात करण्यात आला होता.
 
संबंधित बातम्या
 
कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प पेप घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचा असा खुलासा डी रुपा यांनी केला होता. त्यांनी यासंबंधी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसंच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहिलं होतं. कर्नाटक सरकारलाही यासंबंधी अहवाल पाठवण्यात आला होता.
 
मात्र अधिका-याने पाठवलेला अहवाल लीक झाला आणि मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली होती. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी डी रुपा प्रसारमाध्यमांकडे गेल्याने त्यांच्याविरोधातही कारवाईचा आदेश दिला होता. नियमाप्रमाणे अधिकारी अशाप्रकारे प्रसारमाध्यमांशी बोलू शकत नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
 
यावर स्पष्टीकरणे देताना डी रुपा यांनी सांगितलं होतं की, "मी कोणताही अहवाल लीक केलेला नाही किंवा कोणतीही गुप्त माहिती उघड केलेली नाही. मी माही तर माझे बॉस कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांसोबत शेअर केली. मग नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत". "प्रत्येकासाठी वेगळा नियम असू शकत नाही. जर माझी चौकशी झाली तर सगळ्यांचीच झाली पाहिजे", असंही डी रुपा यांनी सांगितलं होतं. 
 
 सत्यनारायण राव यांनी मात्र डी रुपा यांचे दावे फेटाळून लावले होते. "कारागृहात कोणालाही व्हीआयपी वागणूनक दिली जात नाही. जर डीआयजींना काही चुकीचं होताना आढळलं होतं, तर सर्वात आधी त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यायला हवं होतं. अशाप्रकारे प्रसामाध्यमांकडे जाण्याची गरज नाही. मला अद्यापही त्यांचं पत्र मिळालेलं नाही", असं त्यांनी सांगितलं होतं.   
 
काय होतं पत्रात - 
"कारागृहात नियमांचं होणारं उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. इतकंच नाही या सर्वांसाठी दोन कोटींचा लाच दिल्याचंही बोललं जात आहे. कृपया तुम्ही तात्काळ कारवाई करत, नियम मोडणा-यांना शिक्षा करावी", अशी विनंती रुपा यांनी पत्रातून केली होती.  याशिवाय रुपा यांनी अन्य गंभीर आरोपही केले होते. 10 जुलै रोजी कारागृहातील 25 जणांची ड्रग टेस्ट करण्यात आली होती. यावेळी 18 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. रुपा यांनी त्या सर्वांची यादीच पत्रात लिहिली होती.