यंदाच्या गुजरात निवडणुकीत कुठलाही पक्ष मुस्लिमांच्या मुद्यावर का नाही बोलत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 05:21 PM2017-11-27T17:21:56+5:302017-11-27T17:31:35+5:30

नरेंद्र मोदी 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून   2012 पर्यंत तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिमांचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी होता.

Why does not any party in the current Gujarat elections talk about Muslims? | यंदाच्या गुजरात निवडणुकीत कुठलाही पक्ष मुस्लिमांच्या मुद्यावर का नाही बोलत ?

यंदाच्या गुजरात निवडणुकीत कुठलाही पक्ष मुस्लिमांच्या मुद्यावर का नाही बोलत ?

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाने थेट मुस्लिमांच्या मुद्याला हात घातलेला नाही.182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 20 जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे.

अहमदाबाद - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीतून मुस्लिमांचा मुद्दा जणू गायब झाला आहे. नरेंद्र मोदी 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून   2012 पर्यंत तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिमांचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. मुस्लिमांवरील अन्याय, पक्षपाती वागणुकीला मुद्दा बनवून विरोधी पक्ष नरेंद्र मोदींना टार्गेट करायचे. 

पण यंदाच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाने थेट मुस्लिमांच्या मुद्याला हात घातलेला नाही. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 20 जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. या 20 मतदारसंघांमध्ये उमदेवाराच्या जय-पराजयामध्ये मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. मुस्लिमबहुल वीस मतदारसंघांमध्ये अहमदाबाद जिल्ह्यात चार, भरुच आणि कच्छमध्ये प्रत्येकी तीन मतदारसंघ आहेत. 

आतापर्यंत गुजरातमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार आणि जी राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरु आहे त्यामध्ये जातीय राजकारणाचा प्रभाव जास्त दिसतोय. पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलिता नेता जिग्नेश मेवानी यांच्याभोवती राजकारण फिरत आहे. मुस्लिमांऐवजी आरक्षण मुख्य मुद्दा बनला आहे.  

- 2002 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गुजरात दंगलीला मुख्य मुद्दा बनवले होते. त्यावेळचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या दंगलीला कसे जबाबदार होते. त्यांच्या धोरणांमुळे गुजरातमधल्या मुस्लिमांवर अन्याय झाला. एकूणच मोदी आणि भाजपा मुस्लिमविरोधी असल्याच्या अंगाने काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता.     

- त्यानंतर पाचवर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही 2007 साली काँग्रेसने गुजरात दंगलीच्या मुद्दा सोडला नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोदींना 'मौत का सौदागर' म्हटले होते. त्याचा उलटा फायदा भाजपाला झाला. 

- 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. पण परिस्थिती पहिल्या दोन निवडणुकांसारखी नव्हती. काँग्रेसला त्याचा फारसा फायदा झाला नाही आणि तिस-यांदा मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आले.                                                                                                                                                                   
- 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा मुस्लिमांच्या सुरक्षिततेच्या मुद्याला प्राधान्य दिले. नरेंद्र मोदींचे नाव न घेता सोनिया गांधी गुजरातमध्ये 'जेहेर की खेती' होते असे म्हणाल्या. त्यावेळी सुद्धा भाजपालाच फायदा झाला. भाजपाने इथे लोकसभेच्या सर्वच्या सर्व 26 जागा जिंकल्या. 

यावेळी काँग्रेसने आपल्या प्रचाराच्या रणनितीमध्ये मोठा बदल केला आहे. राहुल गांधी अधिक सावध आणि सतर्क आहेत. राहुल गांधींनी मोठया प्रमाणावर गुजरातमधल्या मंदिरांना भेटी दिल्या आहेत. काँग्रेसने मुस्लिमांच्या विषयावर थेट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे गुजरातमध्ये यंदाच्या निवडणुकीत मुस्लिमांचा मुद्दा गायब झाल्याचे चित्र आहे. 
 

Web Title: Why does not any party in the current Gujarat elections talk about Muslims?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.