वडिलांच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:25 AM2018-01-15T03:25:59+5:302018-01-15T03:26:43+5:30

विशेष सीबीआय कोर्टाचे दिवंगत न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा अनुज लोया यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नसल्याचे स्पष्टीकरण दिले

There is no doubt about the death of the father | वडिलांच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही

वडिलांच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही

Next

मुंबई : विशेष सीबीआय कोर्टाचे दिवंगत न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा अनुज लोया यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नसल्याचे स्पष्टीकरण दिले, तसेच मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण या प्रकरणात ओढू नका, अशी विनंतीही त्यांनी माध्यमांपुढे केली.
नरिमन पॉइंट येथील मित्तल टॉवर येथील निवासस्थानी जेमतेम १० मिनिटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनुज म्हणाला, वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही. सुरुवातीला या प्रकरणात संशय वाटत होता. मात्र, त्यानंतर सर्व स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही. या प्रकारामुळे आम्हाला प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे कृपया आम्हाला कोणीही वादात ओढू नका, असे आवाहनही केले.
वडिलांच्या मृत्यूवेळी चौकशीची मागणी का केली होती?, असे विचारले असता, त्यावेळी मी १७ वर्षांचा होतो, मला फारशी समज नव्हती. तेव्हा मानसिक दबावाखालीही होतो. मात्र त्यानंतर सर्व स्पष्ट झाल्याने आता कोणावरही संशय नसल्याचे त्याने सांगितले. आजोबा व आत्याने घेतलेल्या आक्षेपांबाबत तो म्हणाला, ‘त्यावेळी भावनिक परिस्थिती होती.
भावनेच्या भरात आक्षेप
घेतला होता. आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. तेव्हा कृपया एनजीओ, प्रसारमाध्यमांनी आमच्या कुटुंबाला त्रास देऊ नये, असे
आवाहन अनुजने केले. या वेळी अनुजसोबत अ‍ॅड. अमित नाईक व मावस भाऊ प्रतीक भंडारी उपस्थित होते.


दबावामुळे भूमिका
न्या. लोया यांच्या कुटुंबीयांवर प्रचंड राजकीय दबाव आहे. त्यामुळे अनुज लोया यांनी भूमिका मांडली. मात्र आता हे प्रकरण केवळ एका कुटुंबीयांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर तो एक सामाजिक विषय बनला आहे. त्यामुळे त्याची सविस्तर चौकशी होणे अत्यावश्यक आहे; हायकोर्टात आम्ही तेच मांडणार आहोत.
- अ‍ॅड. अहमद आब्दी, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे पदाधिकारी व उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे याचिकाकर्ते

चेहºयावर तणाव
देशभर चर्चेचा विषय बनलेल्या न्या. बी.एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी भूमिका स्पष्ट करताना त्यांचा मुलगा अनुजच्या चेहºयावर तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. दहा मिनिटांच्या पत्रकार परिषदेत जेमतेम २-३ मिनिटे तो बोलला. सोबतच्या वकिलांनी भूमिका मांडली. २१ वर्षांचा अनुज अचानकपणे मीडियाला सामोरे जावे लागत असल्याने काहीसा गोंधळून गेला होता.
गुजरातमध्ये २००५ साली घडलेल्या सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणी सुनावणी करणारे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती बी.एच. लोया यांचा २०१४ मध्ये नागपुरात हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूवर अनेकांनी संयश व्यक्त केला आहे. या मृत्यूची चौकशी करावी, अशी विनंती करणाºया याचिका मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. उद्या १५ जानेवारी रोजी यावर सुनावणी आहे.

Web Title: There is no doubt about the death of the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.