ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० -  सिक्कीमजवळील डोकलाम परिसरात भारत आणि चिनी सैन्यामध्ये निर्माण झालेला तिढा आता अधिकच वाढला आहे. चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानांनी या परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला आहे. या ठिकाणी दोन्हीकडचे सुमारे प्रत्येकी ३०० सैनिक उपस्थित असून, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये केवळ १२० मीटरचे अंतर आहे. असे असले तरी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्याची शक्यता नाही. 
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल दर्जाचे लष्करी अधिकारी दोन्हीकडच्या लष्करांचे नेतृत्व करत आहेत. भारतीय लष्कराच्या परिसरात तंबू उभारल्याचे पाहिल्यावर चिनी सैन्यानेही आपल्या परिसरात तंबू ठोकले आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे १० हजार फूट उंचीवरील या ठिकाणी सध्या उन्हाळ्यामुळे तापमान सुसह्य स्थितीत आहे. या परिसरातील नैसर्गिक परिस्थिती भारताच्या तुलनेत चिनी सैनिकांसाठी प्रतिकूल असल्याचे सांगण्यात येते.  
दरम्यान,चीनच्या आक्रमकतेला ठेंगा दाखवत भारतीय लष्कराने  डोकलाममध्ये तंबू गाडले होते. भारताने आपल्या सैनिकांना या भागातून परत बोलवावं अशी चीनची मागणी आहे. मात्र भारतीय सैन्याने माघार घेण्यास नकार देत तंबू ठोकले.
अधिक वाचा
 चीनच्या धमक्या आणखी वाढल्या
 
सिक्किम सेक्टरमधील जवळपास 10 हजार फूट उंचीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. भारतीय सैन्याने मागे हटावे, यासाठी चीनकडून वारंवार इशारे देण्यात आले आहेत. मात्र तरीही भारतीय सैन्याचे जवान सिक्किम सेक्टरमध्ये पाय रोवून उभे आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 10 हजार फुट उंच या वादग्रस्त भागात तंबू गाडले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तेथून सरकणार नाही, तोपर्यंत आपणही माघार घेणार नाही असा संकल्प या सैनिकांनी घेतला आहे.